मुक्तपीठ टीम
मुक्तपीठची ‘आरोग्य अव्यवस्थेचा पंचनामा’ मालिका विधानसभेतही गाजली आहे. भाजपा – शिवसंग्रामच्या आमदार भारती लव्हेकर यांनी आरोग्य अव्यवस्थेमुळे महिलांना होणाऱ्या जीवघेण्या त्रासाकडे सरकारचे लक्ष वेधले. पुढे जावू द्या…पुढे जावू द्या…करत स्थानिक आरोग्य केंद्र ते ग्रामीण रुग्णालय ते असलंच तर जिल्हा नाहीतर थेट मुंबईतील रुग्णालय…असं करता करता गरोदर महिला, तिच्या पोटातील बाळही स्मशानात पोहचतात. स्थानिकांची ही व्यथा आमदार लव्हेकरांनी कळवळून मांडली. त्यांच्या जोडीने आमदार अमीत साटम यांनी रुग्णवाहिका समस्या मांडत त्याचा त्रास सांगितला. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सर्वांच्या प्रश्नांना अधिवेशन संपेपर्यंत समाधानकारक कारवाईच्या रुपाने उत्तर मिळेल, असं सांगितलं.
मुक्तपीठची ‘आरोग्य अव्यवस्थेचा पंचनामा’ ही मालिका कशासाठी?
ठाणे जिल्ह्यातील शहापूर आणि पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा, विक्रमगड, वाडा या तालुक्यांमधील सार्वजनिक आरोग्य अव्यवस्थेचा पंचनामा करण्यासाठी मुक्तपीठने मालिका सुरु केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून सातत्याने प्रसुतीच्यावेळी गरोदर महिला आणि तिच्या पोटातील बाळाचे मृत्यू होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे वास्तव जाणून घेण्यासाठी मुक्तपीठचे संपादक तुळशीदास भोईटे थेट त्या त्या गावांमध्ये जावून पीडित कुटुंबांना भेटत आहेत.
मंगळवार, १ मार्चपासून या मालिकेत त्या कुटुंबांच्याच नाही तर परिसराच्या व्यथा वेदना मांडण्यात येत आहेत.
आपण आरोग्य अव्यवस्थेचा पंचनामा मालिकेतील प्रत्येक व्हिडीओ नक्की पाहा.
रोज संध्याकाळी ५ वाजता मुक्तपीठच्या यूट्युब, फेसबूक पेजवर हे व्हिडीओ पाहायला मिळतील. तसेच www.muktpeeth.com वेबपोर्टलवरही उपलब्ध असतील.
या वास्तव तपासणीसाठी मुक्तपीठ टीमला जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेचे सहकार्य मिळाले.
या मालिकेचे छायाचित्रण पत्रकार मितेश घाडी यांनी केले. तर व्हिडीओ एडिटिंग किशन महाजन यांनी केले आहे.
मुक्तपीठ टीममधील अपेक्षा सकपाळ, रोहिणी ठोंबरे, सुश्रुषा जाधव आणि गौरव भंडारे यांनीही मालिकेच्या कामात सहभाग घेतला.