मुक्तपीठ प्रतिनिधी
एमपीएससी परीक्षा पास होऊनही नियुक्ती मिळत नसल्याच्या नैराश्यातून आत्महत्या केलेल्या स्वप्निल लोणकरच्या आईचा हंबरडा कोणत्याही संवेदनशील माणसाला अस्वस्थ करील असाच आहे. “सरकारच्या नाकर्तेपणामुळे माझ्या मुलाने आत्महत्या केलीय. सरकारने जर उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नियुक्ती दिली असती तर आमच्या स्वप्निलने आत्महत्या केली नसती, असा आरोप स्वप्निलच्या कुटुंबीयांनी केला आहे. तसेच त्याच्या आईनं फोडलेला टाहो अनेकांना खुपणारा पण तिच्या मनातील असह्य वेदना दाखवणाराच आहे, ती म्हणाली, “एखाद्या मंत्र्याच्या, अधिकाऱ्याच्या पोरानं आत्महत्या करावी. करावी. करावी. त्याशिवाय त्यांना कळणार नाही, एखाद्या गरीबाचं पोरगं मेल्यावर त्यांना काय वेदना होतात”.
स्वप्निलच्या आईचा टाहो
“आई तुला लई त्रास होतो का ग. मला नोकरी लागली की तुला नाय पाठवायचो कामाला. आपण घर बांधू. आपल्या पूजाचं लग्न चांगलं करु. आपण गाडी घेऊ. खूप बोलायचा हो. सरकारला नाही जाग आली. मी म्हणते एखाद्या मंत्र्याच्या, अधिकाऱ्याच्या पोरानं आत्महत्या करावी. करावी. करावी. त्याशिवाय त्यांना कळणार नाही, एखाद्या गरीबाचं पोरगं मेल्यावर त्यांना काय वेदना होतात. जोपर्यंत त्यांच्या घरात असं काही होत नाही तोपर्यंत त्यांना कळणारच नाही दुसऱ्याचं दु:ख काय असतं.”
एमपीएससीच्या विद्यार्थ्यांची अस्वस्था समजून घ्या…
- एमपीएससीच्या परीक्षांमध्ये प्रामुख्याने ग्रामीण निमशहरी भागातील तरुण सहभागी होतात.
- त्यांच्या विभागांमध्ये रोजगाराच्या चांगल्या संधी नसल्याने एमपीएससी उत्तीर्ण होऊन सरकारी नोकरी असं त्यांचे लक्ष्य असते.
- त्यासाठी अनेक विद्यार्थी प्रसंगी कर्ज काढून पुण्यात राहतात.
- पुण्यातील अनेक व्यावसायिक शिक्षणसंस्थाही अशा मुलांना वास्तवाची माहिती न देता आपल्या चक्रात ओढतात.
- ग्रामीण मुलं क्लासचा खर्च, पुण्यातील राहण्याचा, खाण्याचा खर्च यात अडकतात.
- खर्च वाढत राहतो, परीक्षा वेळेवर नाहीत, नियुक्त्यांचा पत्ता नाही, यामुळे पिचतात.
- गेली दोन वर्षे कोणतीच परीक्षा झाली नाही.
- एमपीएससीवर नियुक्त्याही नाहीत.
- जे एमपीएससी उत्तीर्ण झाले आहेत त्यांनाही नियुक्ती नसल्याने इतरांमध्येही नैराश्य वाढत आहे.
- विद्यार्थी आता हतबलतेने पछाडले आहेत. विद्यार्थ्यांना एक प्रकारचं नैराश्य आले आहे.
- सरकारला आता तरी जाग आली पाहिजे, या मुलांना दिलासा देणारी पावलं त्वरित उचलली पाहिजेत.