मंगेश सुधाकरराव बेले
आतापर्यंत आपण पाहत आलेलो आहे की, दिवसेंदिवस स्पर्धा वाढत चालली आहे आणि त्यासोबतच जबाबदाऱ्यासुध्दा वाढत चालल्या आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याचे स्वप्न आहे की, आपण या क्षेत्रात अधिकारी होण्यासाठी आलो आहे आणि अधिकारी बनूनच येथून जाणार आहोत. पण वास्तवात सर्वच अधिकारी होतात असे नाहीच. कारण विद्यार्थ्यांची संख्या आणि निघणाऱ्या जागेचा ताळमेळ जर लावला तर आपल्याला दिसून येईल की, सर्वच अधिकारी होणे अशक्य आहे. कारण आताच्या परिस्थितीत तसेच सरकारच्या उदासीनपणाचा विचार केल्यास प्रत्येक वर्षी जागा निघेल असे नाही आणि जागा निघाल्या तरीही त्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत कमीच असतात. कारण जागा या बोटावर मोजण्याइतक्या असतात आणि विद्यार्थी लाखोच्या घरात आहे, आता सध्यातरी असेच दिसून येत आहे.
यामुळे विद्यार्थी खचत चालला आहे. कारण एकीकडे वय वाढत जात आहे आणि 5 ते 6 वर्ष अभ्यास करूनही पद मिळत नाही आहे. ज्यांनी परीक्षा उत्तिर्ण झालेत त्यांना नियुक्ती नाही.
विद्यार्थ्यांच्या आई वडिलांनी लावलेला पैसा वाया तर जात नाही आहे ना असे प्रश्न अभ्यास करत असताना विद्यार्थ्यांना पडतात. आणि आता तर आपण बघतच आहे, की विद्यार्थी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करत आहे. कालचीच बातमी वाचली आणि एक प्रकारचा झटकाच बसला आणि एक स्वतःलाच प्रश्न पडला की आपलं कस होईल? कारण सरकारकडे विद्यार्थ्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याची तयारी दिसून येत नाही. कोणीही राजकारणी उठले की पदभरतीच्या विषयावर राजकारण करत आहे. अरे हो राजकारण करा. आम्हा विद्यार्थ्यांना काहीच समस्या नाही, पण दिलेल्या शब्दाची अंमलबजावणी तर करा.
मागे महापोर्टल या खाजगी कंपनीने परीक्षा घेतल्या त्यामध्ये मोठ्याप्रमाणात खाजगी कंपन्या चा घोटाळा बाहेर आला.
किती दिवसापासून विद्यार्थ्यांची मागणी आहे की, पदभरतीत पारदर्शकता आणली पाहिजे. त्यासाठी एमपीएससीकडे परीक्षा देण्यात यावी. आयोग परीक्षा घेण्यासाठी तयार आहे. पण सरकारचीच तयारी नाही. अशा प्रकारच्या अनेक समस्यांनी एमपीएससी विद्यार्थी त्रस्त आहेत. आणि दाटलेलं नैराश्य जेव्हा असह्य होतं, त्यातूनच मग स्वप्निलसारखी घटना घडते. आमच्या वेदना समजून घ्या. उपकार नको पण आमचा हक्क द्या. आम्हालाही सन्मानानं जगायचं आहे. तेवढेच हक्काचे तेच द्या!
( मंगेश सुधाकरराव बेले हे यवतमाळचे असून एमपीएससी विद्यार्थी आहेत )
सुंदर विवेचन