मुक्तपीठ टीम
एमपीएससी पूर्व परीक्षा २१ मार्च रोजी होणार आहे. राज्य लोकसेवा आयोगाने ही नवी तारीख जाहीर केली आहे. १४ मार्च रोजी होणारी एमपीएससी पूर्व परीक्षा लोकसेवा आयोगाने कोरोनामुळे लांबणीवर टाकली. त्यानंतर राज्यभरात उमेदवारांकडून निर्णयाविरोधात संतप्त पडसाद उमटले. त्यानंतर नवी तारीख शुक्रवारी जाहीर केली जाणार असल्याचे आश्वासन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते.
आता एमपीएससी पूर्व परीक्षा १४ मार्चऐवजी २१ मार्च रोजी होणार आहे. खरंतर येत्या रविवारी ही परीक्षा होणार होती, पण वाढत्या करोना संक्रमणामुळे राज्य लोकसेवा आयोगाने ती लांबणीवर टाकली. याचे राज्यभर उमेदवारांमध्ये तीव्र पडसाद राज्यात उमटले.
मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी सायंकाळी महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधताना सुरुवातीलाच एमपीएससी परीक्षेविषयीचे स्पष्टीकरण दिलं होतं, “मी विद्यार्थ्यांच्या भावनांशी सहमत आहे. केवळ काही दिवसांसाठी परीक्षा पुढे ढकलत आहोत. शुक्रवारी आयोगामार्फत ही तारीख जाहीर केली जाईल. जो कर्मचारी वर्ग परीक्षेच्या कामाला लागणार होता, तो सध्या करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे त्या कामी लागला आहे. या कर्मचारी वर्गाची या काही दिवसात तयारी करावी लागेल. परीक्षार्थींनी आपली तयारी ठेवावी, येत्या ८ दिवसांत परीक्षा होणार.”
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या आश्वासनानुसार आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. त्यानुसार आता रविवार, २१ मार्च रोजी पूर्व परीक्षा होणार आहे.