मुक्तपीठ टीम
खासदार संभाजी छत्रपती यांनी संयंम आणि शिस्त पाळायलाच लागेल, हे बजावतानाच, ठरवलं तर दोन मिनिटांत महाराष्ट्र पेटून उठू शकतो असे सांगून पुन्हा एकदा लढा सुरु करण्याचा राज्य सरकारला इशारा दिला आहे. पुण्यातील मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यव्यापी बैठकीत खासदार संभाजी छत्रपती आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. मराठा आरक्षण विषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नांदेडमध्ये पुढचं मूक आंदोलन होणार असल्याची घोषणा यावेळी त्यांनी केली आहे.
खासदार संभाजी छत्रपती पुण्यात मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीमध्ये बोलत होते. यात मराठा समाजाकडून सरकारकडे करण्यात आलेल्या मागण्यांचा ज्या त्या जिल्ह्यातील समन्वयकांकडून विषयवार आढावा घेण्यात आला. या बैठकीत काही काळ गोंधळ पाहायला मिळाला. या बैठकीला राज्यातील १७५ तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
काय म्हणाले खासदार संभाजी छत्रपती?
- राज्यातील कोरोना परिस्थिती आणि काही दिवसांपूर्वीची पूरस्थिती पाहता आम्ही शांत राहिलो.
- परिस्थितीचं भान आम्ही राखलं पण आमच्या प्रश्नांचं काय, याचं उत्तर सरकारला द्यावंच लागणार आहे.
- जो वंचित आहे त्याला आरक्षण मिळालंच पाहिजे ही माझी स्पष्ट भूमिका असून मराठा समाजाला टिकणारं आरक्षण कसं द्यायचं हे सरकारने ठरवायला हवं.
- ती सरकारचीच जबाबदारी आहे.
- त्यासाठी डोकं लावा.
- मी मॅनेज होणारा नेता नाही, माझ्यावर विश्वास ठेवा.
- आंदोलन करायचं की काय करायचं हे तुम्ही सगळ्यांनी ठरवा.
- तुम्ही जे म्हणाल ते करायला मी तयार आहे.
- तुम्ही सांगितलं तर मी उपोषणाला बसायलाही तयार आहे.
- तुम्ही सांगाल तितके दिवस मी उपोषणाला बसेन.मंत्र्यांसोबत २२ मागण्यांसाठी बैठक घेण्यात आली होती.
- आता त्या मागण्यांबाबत काय झाले.
- वसतिगृहांबाबत राज्य सरकारने जीआर काढून दाखवावा.
- आता दोन महिन्यांचा कालावधी पुर्ण झाला आहे.
- आता मराठा आरक्षणासाठी एक आंदोलन करावे लागणार आणि ते आंदोलन नांदेडला करु.