मुक्तपीठ टीम
महाराष्ट्राच्या ग्रामीण संस्कृतीचा महत्वपूर्ण ठेवा असणाऱ्या बैलगाडा शर्यती पुन्हा सुरु व्हाव्या यासाठी बैल या प्राण्यास संरक्षित प्राण्यांच्या यादीतून वगळावे अशी मागणी केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांच्याकडे केली.
बैल या प्राण्याचा संरक्षित दर्जा काढून घेण्यात यावा यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. यावेळी बैलगाडा शर्यतीबाबत रुपाला यांना माहिती दिली. यासोबत अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शेतकरी बैलांची कशी काळजी घेतात हे केंद्रीय मंत्र्यांना व्हिडिओद्वारे समजावून सांगितले.
डॉ. कोल्हे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील अधिवेशनात तत्कालिन केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री गिरीराज सिंह यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सह-सचिवांसमवेत बैठक आयोजित करुन एक पाऊल पुढे टाकले होते. आता विद्यमान पशुसंवर्धनमंत्री देखील या विषयी सकारात्मक निर्णय घेतील असा विश्वास आहे.
महाराष्ट्राच्या ग्रामिण संस्कृतीचा महत्वपूर्ण ठेवा असणाऱ्या बैलगाडा शर्यती पुन्हा सुरु व्हाव्या यासाठी बैल या प्राण्यास संरक्षित प्राण्यांच्या यादीतून वगळावे अशी मागणी केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री पुरुषोत्तमजी रुपाला यांच्याकडे केली. pic.twitter.com/CT0mxVbJLv
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) August 5, 2021
खा. डॉ. कोल्हे म्हणाले की, केंद्रीय पशुसंवर्धनमंत्री परशोत्तम रुपाला यांनी एकूणच विषय समजावून घेतला आहे. यापूर्वी झालेल्या चर्चेची माहिती गिरीराज सिंह व सचिवांकडून घेऊन आजवर काय कार्यवाही झाली त्याचा आढावा घेऊ असे रुपाला यांनी सांगितले आहे. या विषयात लक्ष घालून मार्ग काढण्याचा प्रयत्न करण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू होण्यासाठी नक्कीच सकारात्मक निर्णय होईल, अशी अपेक्षा आहे. त्यासाठी आपण कुठेही कमी पडणार नाही असे त्यांनी सांगितले.
बैलगाडा शर्यत, इतिहास, परंपरा आणि खिलारांवरील दुष्परिणाम
- बैलगाडा शर्यती बंद पडल्याने यात्रा-उत्सव ओस पडू लागले असून त्याचा परिणाम ग्रामीण अर्थव्यवस्थेवर होत आहे.
- देशी खिलार जातीचा बैल केवळ बैलगाडा शर्यतीसाठी वापरला जातो, त्याचा शेतीसाठी वापर होत नाही.
- बैलगाडा शर्यतीच नसल्याने देशी खिलार जातीच्या बैलांची संख्या पशुगणनेत ५५ टक्क्यांनी कमी झाली आहे.
- खिलार जातीचा हा देशी गोवंश वाचविणे व त्याचे संवर्धन करण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलण्याची आवश्यकता आहे. हा देशी
- गोवंश वाचविण्यासाठी ‘बैल’हा प्राणी संरक्षित प्राण्यांच्या यादीतून वगळणे आवश्यक आहे.