मुक्तपीठ टीम
मुंबईत आज सकाळी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांना पोलिसांकडून ताब्यात घेतलं जात असताना त्यांनी पळ काढला. तसं करताना झालेल्या झटापटीत एक महिला पोलीस जखमी झाल्या. संदिप देशपांडे ज्या गाडीने पळाले, ती गाडी त्या पोलिसांच्या पायावरून गेल्याचा आरोप झाला आहे. याप्रकरणी संदीप देशपांडेंच्या अडचणी वाढल्या आहेत. या प्रकरणात मुंबई पोलिसांकडून देशपांडे यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात येऊ शकतो, अशी माहिती मिळत आहे.
राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंगे हटवण्यासंदर्भातला अल्टिमेटम संपल्यानंतर आज सकाळपासूनच मनसे कार्यकर्त्यांकडून मशिदीसमोर हनुमान चालिसा लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांकडून संदीप देशपांडे यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र यावेळी देशपांडे यांनी घटनास्थळावरून पळ काढला. यावेळी देशपांडे यांच्या गाडीचा धक्का लागून एक महिला पोलीस कर्मचारी जखमी झाल्या आहेत.
याप्रकरणी सीसीटीव्ही फुटेज तपासून पोलीस संदीप देशपांडे यांच्यावर गुन्हा दाखल करतील, असे समजत आहे. त्यामुळे देशपांडेंच्या अडचणी वाढण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
आता राज ठाकरे यांनी त्या महिला पोलीस शिपायाला घरी बोलावले आहे. ते समजूत काढण्याचा प्रयत्न करतील, अशी शक्यता आहे.