मुक्तपीठ टीम
मुसळधार पावसाच्या संततधारेनं सर्वत्रच पाणीकोंडी झाली आहे. त्या पाण्याचा रंग कुठे काळा, कुठे मातकट आहे. तर डोंबिवलीतील एका नाल्यातील पाण्याचा रंग चक्क हिरवागार झाला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा डोंबिवलीतील प्रदूषणाचा प्रश्न भर पावसात उघड झाला आहे. या हिरव्या नाल्याचा व्हिडीओही आता सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. मनसेचे आमदार राजू पाटील यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचं लक्ष या हिरव्या नाल्यानं उघड केलेल्या प्रदूषण समस्येकडे वेधले आहे.
नाला कसा झाला हिरवा?
- डोंबिवली पूर्व येथील गांधीनगर परिसरातील नाल्यातील पाणी हिरवे झाले आहे.
- डोंबिवलीत प्रदूषणाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून आहे.
- या हिरव्या रंगाचा नाला पाहून नागरीकांना लगेच कळले की हा पावसाच्या पाण्याचा रंग नसून प्रदूषणाचा आहे.
- परिसरातील नागरिकांनी त्याच्या विरोधात आवाज उठविला.
- काही नागरिकांनी या हिरव्या रंगाचा नाल्याचे व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केले.
मनसे आमदार राजू पाटील यांचं ट्विट
- संबंधित नाल्याच्या व्हायरल व्हिडीओंची दखल कल्याण पूर्व ग्रामीणचे मनसे आमदार राजू पाटील यांनीही घेतली.
- त्यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर करत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना ट्विट करून जीवघेण्या प्रदुषणापासून डोंबिवलीकरांची सुटका कधी होणार? असा प्रश्न केला आहे.
डोंबिवलीकरांची या जीवघेण्या प्रदुषणापासून सुटका कधी होणार ? गांधीनगरचा हा नाला बंधिस्त करावा किंवा पाईपलाईन द्वारे केमिकलयुक्त पाणी सोडण्यात यावे यासाठी @KDMCOfficial आयुक्तांकडे सतत पाठपुरावा करूनही काहीच होताना दिसत नाहीत. पर्यावरण मंत्री श्री.@AUThackeray जी , जरा लक्ष द्या. pic.twitter.com/Pj8HFw3eHO
— Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) (@rajupatilmanase) July 19, 2021
“डोंबिवलीकरांची या जीवघेण्या प्रदुषणापासून सुटका कधी होणार? गांधीनगरचा हा नाला बंधिस्त करावा किंवा पाईपलाईनद्वारे केमिकलयुक्त पाणी सोडण्यात यावे यासाठी केडीएमसी आयुक्तांकडे सतत पाठपुरावा करूनही काहीच होताना दिसत नाहीत. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेजी जरा लक्ष द्या”, असं राजू पाटील म्हणाले.
संबंधित कंपनीविरोधात कठोर कारवाई
- नाल्याच्या हिरवेकरणाची गंभीर दखल कल्याण-डोंबिवली मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी घेतली आहे.
- त्यांनी एमआयडीसीकडे संपर्क साधला असता एमआयडीने याप्रकरणी नाल्यात केमिकल सोडणाऱ्या रायबो फाम या कंपनीचा पाणी पुरवठा खंडीत केला आहे.
- तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाने या कंपनीच्या विरोधात कठोर कारवाई करावी, असे आदेश दिले आहे.
डोंबिवलीसाठी प्रदूषण नेहमीचेच!
- २०१४ साली डोंबिवली प्रदूषणामुळे हिरवा पाऊस पडला होता. २०१९ मध्ये डोंबिवलीत प्रदूषणामुळे रस्ता गुलाबी झाला होता.
- त्याची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली होती.
- त्यानंतरही प्रदूषण करणाऱ्या कंपन्या सुधारल्या नाही तर त्यांना टाळे ठोकण्याचा इशारा दिला गेला होता.