मुक्तपीठ टीम
राज्य सरकारने सोमवारी कोरोना निर्बंधाबाबत सुधारीत नियमावली जाहीर केली आहे. त्याआधारे काही जिल्ह्यांमध्ये काही प्रमाणात निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मुंबईतही निर्बंधांमध्ये चांगली सूट देण्यात आली आहे, मात्र, राज्य सरकारने लोकल प्रवास अद्याप सामान्यांसाठी सुरु केलेला नाही. राज्य सरकारच्या या निर्णयाबद्दल मनसेचे सरचिटणीस आणि प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर उपरोधात्मक टीका केली आहे. कार्यालये सुरु केली, पण लोकल बंद. आमचा सीएम जगात भारी”, अशी टीका संदीप देशपांडे यांनी केली आहे.
राज्य सरकारच्या निर्णयावर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी टीकास्त्र सोडलं आहे की, “सीएम साहेब, आपण सर्व आस्थापना चालू केल्याबद्दल आपले आभार. लोकल बंद आहेत. बसला प्रचंड वेळ लागतो, गर्दी ही असते. आपल्याला विनंती आहे; या सर्व लोकांच्या पाठीवर जर आपण शिव पंख’लावून दिलेत, तर त्यांना कामावरही जाता येईल आणि त्रास पण नाही. मला खात्री आहे, आपण हे करु शकता. आमचा सीएम जगात भारी”, अशा शब्दात संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
सी.एम साहेब आपण सर्व आस्थापना चालू केल्याबद्दल आपले आभार.लोकल बंद आहेत बस ला प्रचंड वेळ लागतो गर्दी ही असते.आपल्याला विनंती आहे या सर्व लोकांच्या पाठीवर जर आपण “शिव पंख लावून दिलेत तर त्यांना कामावर ही जाता येईल आणि त्रास पण नाही.मला खात्री आहे आपण हे करू शकता आमचा सीएम जगात भारी
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) August 3, 2021
राज ठाकरेंनी केली होती मागणी
लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना तरी मुंबई लोकलने प्रवासास परवानगी द्या अशी मागणी केली होती. गेल्याच आठवड्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना याविषयी पत्र लिहिलं होतं. त्याचबरोबर सरकारने योग्य निर्णय न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशाराही दिला होता.