गौरव संतोष पाटील
महाराष्ट्रातील सत्तेच्या महासंघर्षात राजकारण्यांची अनेक रुपं दिसली. काही राजकारणी गुजरात-गुवाहाटी-गोवा करताना मज्जा करताना दिसले. काही परतल्यावर शक्तीप्रदर्शनात दंग झाले. पण आमदार श्रीनिवास वनगांनी मात्र वेगळंपण जपलंय. ते सध्या आपल्या घरच्या शेतीत राबताना दिसतायत.
महाराष्ट्रात २० जूननंतर सुरु झालेलं राजकीय सत्तानाट्य आताही सुरुच असलं तरी ते पडद्यामागे जास्त आहे. महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी एकनाथ शिंदे गटाचे आमदार देश पर्यटनासाठी गेले होते. कधी गुजरात, कधी गुवाहाटी तर नंतर गोवा…अशी राजकीय 3G यात्रा करून ते मुंबईत परतले. या यात्रेवर असताना आणि संपवतानाही अनेकांनी वेगवेगळी मज्जा केल्याचे महाराष्ट्राने नाही तर देशाने पाहिले. परतल्यावर सत्तास्थापनेनंतरही काही आमदार आता सत्तास्थापनेत गुंतले आहेत. त्याचवेळी आमदार श्रीनिवास वनगा मात्र बंडखोरांमध्ये असूनही बाकी उपद्व्यापांपासून दूर राहिले. आता ते स्वत:च्या शेतीत राबत आहेत.
सध्या पालघरच्या तलासरी तालुक्यातील कवाडा गावी कुणी गेले तर तिथं शेतकरी भाताच्या लावणीत गुंतलेले दिसतात. अशाच एका शेतात सामान्य तरुणासारखी वावरणारी व्यक्ती म्हणजे आमदार श्रीनिवास वनगा. अतिशय साध्या कपड्यांमध्ये ते खरोखर शेतीकाम करत असल्यानं चेहरा पाहिल्याशिवाय ओळखताही येत नाहीत. ते दरवर्षी ही कामं करतात. समरसून करतात. आताही घरी परतल्यानंतर ते थेट आपल्या शेतीत उतरलेले पाहायला दिसतात.
सध्या पालघर जिल्ह्यात चांगला पाऊस होतोय यामुळे शेतकरी शेतात उतरून आपली काम जोमाने करू लागलाय त्याचप्रमाणे आमदार श्रीनिवास वनगा ही आपल्या कुटुंबियांसोबत शेतात उतरून कामाला लागले आहेत. तर आम्ही कोणतेही बंड केलेलं नसून जो अन्याय होत होता त्याबाबत उठाव केला. जरी मुख्यमंत्री उद्धवजी होते तरी राष्ट्रवादी काँग्रेसच सर्व चालवत होती. त्यामुळे सर्वच आमदार नाराज होते. त्यामुळे आम्हाला हे करावं लागलं. तर जो आदर उद्धवजींच्या बाबत होता तो आजही आहे. आम्हाला मिळेल त्यात आम्ही समाधानी असू, असं आमदार श्रीनिवास वनगा म्हणाले.