मुक्तपीठ टीम
राजस्थानच्या राजकारणात आमदारकीची परीक्षा दोनवेळा उत्तीर्ण झाल्यानंतरही फुलसिंह मीणा यांच्या मनात इच्छा होती ती बीएची परीक्षा देण्याची. त्यामुळेच त्यांनी बीएला प्रवेश घेतला. राज्यशास्त्राचा ते अभ्यास करु लागले. नुकतीच त्यांनी बीएची परीक्षा एखाद्या सामान्य विद्यार्थ्यासारखी दिली.
आता फुलसिंह मीणा राज्यशास्त्राची पुस्तके वाचतात. प्रॅक्टिकल तर रोजच अनुभवतात. नवे धडे ते शिकवतात, आणि शिकतात. खरंतर त्यांना हे तारुण्यात करायचे होते. पण घरची परिस्थिती बेताची असल्यानं त्यांना शाळा सोडावी लागली. पुढे ते नगरसेवक झाले, आमदार झाले परंतु, शिक्षण घेता आले नसल्यांची खंत त्यांच्या मनात होती. त्याच वेळी त्यांना त्यांच्या मुलींकडून प्रेरणा मिळाली आणि त्यांनी पुन्हा अभ्यास सुरू केला.
वर्धमान महावीर मुक्त विद्यापीठाच्या उदयपूर सेंटरवर पेपर देण्यापूर्वी ते म्हणाले, “राजकारणाबरोबरच शिक्षणही फार महत्वाचे आहे. हे लक्षात घेऊन मी ४० वर्षानंतर पुन्हा अभ्यास करण्यास सुरवात केली. बीए उत्तीर्ण झाल्यानंतर मी पीएचडीची तयारी करणार आहे”.
मीणा म्हणाले की, “प्रथमच आमदार झाल्यानंतर मला शाळांमध्ये होणाऱ्या कार्यक्रमास आमंत्रित केले गेले. यादरम्यान, मुलांसमोर भाषण देताना मला खूप लाज वाटली. मला असे वाटायचे की मी स्वत: शिक्षित नाही आणि मी त्यांना वाचन करण्यास सांगतो. आता मला असं वाटत नाही. मी जिथेही गेलो तिथे लहान मुलांसह पालकांनाही शिक्षण घेण्याची मी शिफारस करतो.”
‘विद्यार्थी’ मीणांच्या मुलीच शिक्षिका
फुलसिंहांच्या शिक्षणाचे श्रेय त्याच्या मुलींनाही जाते. मुलींनी २०१३ मध्ये ओपन स्कूलमधून मीणांचा दहावीसाठी फॉर्म भरला होता. आमदार झाल्यानंतर काम वाढली आणि २०१४ मध्ये त्यांना परीक्षा देता आली नाही. मुलींनी २०१५ मध्ये पुन्हा फॉर्म भरला. त्यावेळी त्यानी दहावीची परीक्षा दिली. यानंतर ते २०१६-१७ मध्ये १२ वी उत्तीर्ण झाले. आता ते अंतिम वर्षाचा अभ्यास करत आहेत.
गुणवंत विद्यार्थ्यांना विमान प्रवास
आमदार मीणांच्या मतदारसंघतील ज्या विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळतात त्यांना विमानात प्रवास करण्याची संधी मिळते. ते २०१६ पासून ही मोहीम चालवत आहेत. ते आतापर्यंत ५० हून अधिक विद्यार्थ्यांना विमानातून जयपूरला घेऊन गेले आहेत. तेथे ते त्यांना विधानसभा इमारतीत घेऊन जातात. या विद्यार्थ्यांची मुख्यमंत्री आणि अधिकाऱ्यांशीही ओळख करून दिली जाते.
पाहा व्हिडीओ: