मुक्तपीठ टीम
स्वित्झर्लंड असं नुसतं म्हटलं तरी पर्यटनप्रेमींच्या मनात एक सुखद गारवा पसरतो. मात्र, परदेश प्रवास, त्यात पुन्हा युरोपातील. सर्वांनाच परवडतो असं नाही. अशांसाठी एक खूशखबर. स्वित्झर्लंडसारख्याच निसर्ग सौंदर्याची मिनी उधळण आपल्या भारतातही आहे. त्यासाठी जावं लागेल हिमाचल प्रदेशातील खज्जियारला.
असे म्हणतात की जर तुम्हाला निसर्ग सौंदर्याची अतुलनीय उधळणं अनुभवायची असेल तर स्वित्झर्लंडला एकदा तरी नक्कीच जा. पण तिथं जाणं शक्य नसेल तर स्वित्झर्लंडची मिनी आवृत्ती खज्जियारच्या रुपानं आपल्या हिमाचल प्रदेशातही आहे. तिथल्या निसर्गाच्या सुंदर दृश्यांपेक्षा चांगले दुसरे काहीही नाही. ते निसर्ग सौंदर्य केवळ डोळ्यांना सुख देत नाही तर मनालाही शांत करते.
‘भारताचे मिनी-स्वित्झर्लंड’ म्हणून ओळखले जाणारे, खजियार हे डलहौसीजवळील एक छोटेसे शहर आहे जे पर्यटकांना जंगल, तलाव आणि नैसर्गिक सौंदर्याच्या अनोख्या संगमाचे दर्शन घडवते. तिथं जाणारे रस्तेही निसर्गाच्या बाहूतूनच पुढे जातात. काही ठिकाणी दूरच्या पर्वत शिखरांवरील बर्फही लक्ष वेधून घेतं. या ठिकाणाच्या सौंदर्याने पूर्वीच्या राजेरजवाड्यांपासून बॉलिवूडलाही प्रभावित केले आहे. साडेसहा हजार फूट उंचीवर वसलेले, खजियार हे नऊ-होल असलेल्या गॉल्फ कोर्ससाठी ओळखले जाते. खजियार हे एक लहान पठार आहे ज्यामध्ये एक लहान तलाव देखील आहे. हे ठिकाण हिमाचलमधील सर्वात आवडत्या पर्यटन स्थळांपैकी एक आहे. खजियारच्या या मैदानाला उंच झाडांच्या घनदाट जंगलांनी वेढलेले आहे. ते तेथील सुंदर मंदिरांसाठीही ओळखले जाते.
खज्जियारच्या या मैदानात पॅराग्लायडिंग, मुव्हिंग बॉलमधील गोल गोल मज्जा घेण्याचीही संधी आहे. एकीकडे पहाडी गायींचे कळप हिरव्यागार गवतावर ताव मारत असतानाच हे खेळ रंगतात. त्यांची मजा थेट अनुभवावी अशीच…
खजियारमध्ये फिरण्यासाठी असणारे जबरदस्त थ्रिलर पॉईंट्स
१. खजियार तलाव
हिरव्यागार देवदारच्या जंगलांनी वेढलेले, खजियार तलाव १९२० मीटर उंचीवर वसलेले नैसर्गिकतेने परिपूर्ण आहे. हिमाचल प्रदेशात भेट देण्यासाठी सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक, आणि मन शांतीसाठी एक चांगले ठिकाण आहे.
२. पंच पांडव वृक्ष
खजियार तलावाच्या सभोवतालच्या घनदाट देवदार जंगलांच्या आत, पंच पांडव वृक्ष हे पाहण्यासारखे एक वैशिष्ट्यपूर्ण ठिकाण आहे. या झाडाला ६ डहाळ्या आहेत आणि स्थानिक लोक मानतात की ते ५ पांडव आणि द्रौपदीचे प्रतिनिधित्व करतात. एका विश्रामगृहाजवळ हे पंच पांडव वृक्ष आहे.
३. सुभाष बाओली
डलहौसीपासून फक्त १ किमी आणि खजियारपासून सुमारे ३२ किमी अंतरावर, सुभाष बाओली हे उंच देवदार जंगलांमध्ये एक सुंदर ठिकाण आहे. प्रसिद्ध स्वातंत्र्यसैनिक सुभाषचंद्र बोस यांच्या नावावरून हे नाव देण्यात आले आहे.