मुक्तपीठ टीम
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विज्ञान प्रसारासाठी कार्यरत विज्ञान भारती आणि केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरशालेय प्रश्नमंजुषा स्पर्धेचे विजेतेपद पुण्यातील मिलेनियम नॅशनल स्कूलने पटकाविले. मयूर कॉलनीतील मएसो बालशिक्षण मंदिर (इंग्लिश मिडीयम) शाळेने द्वितीय, तर नऱ्हे येथील सिग्नेट पब्लिक स्कूलने तृतीय क्रमांक पटकावला.
प्रथम क्रमांकास १० हजार रुपये, द्वितीय क्रमांकास ७ हजार, तृतीय क्रमांकास ५ हजार रुपयांचे रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन या गुणवान विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. मिलेनियम नॅशनल स्कुल आणि अराईज इंटरनॅशनल स्कुल या शाळांना अडीच हजार रुपये रोख व प्रमाणपत्र उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. स्पर्धेत सहभागी प्रत्येकाला प्रमाणपत्र देण्यात आले. फर्ग्युसन महाविद्यालयाच्या अँफी थिएटरमध्ये ही स्पर्धा पार पडली.
‘स्वातंत्र्यलढ्यात भारतीय शास्त्रज्ञ आणि वैज्ञानिक संस्थांचे योगदान’ या संकल्पनेवर आधारित ही प्रश्नमंजुषा स्पर्धा झाली. मराठी, इंग्लिश, सेमी इंग्लिश आणि हिंदी माध्यमातील आठवी व नववीच्या मुलांच्या ३९ संघांनी यात उत्स्फूर्त सहभाग घेतला. प्रसिद्ध क्विझ मास्टर राजीव संन्याल यांनी अतिशय मनोरंजक पद्धतीने ही स्पर्धा घेतली.
राष्ट्रीय कोशिका विज्ञान केंद्राचे (एनसीसीएस) संचालक डॉ. मोहन वाणी, विज्ञान भारतीचे ज्येष्ठ कार्यकर्ते डॉ. क. कृ. क्षीरसागर, फर्ग्युसन महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ. स्वाती जोगळेकर, डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या सदस्य डॉ. सविता केळकर, विज्ञान भारती पश्चिम महाराष्ट्र प्रांत सचिव डॉ. मानसी माळगावकर, डॉ. रमेश जोशी, श्रीकांत कुलकर्णी, डॉ. प्रमिला लाहोटी आदी उपस्थित होते.
डॉ. मोहन वाणी यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. अशा प्रकारच्या स्पर्धांतून विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडते. आपल्या भारतीय शास्त्रज्ञ, संशोधन संस्थांचे योगदान सहजपणे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यात हा उपक्रम महत्वपूर्ण ठरेल, असे त्यांनी नमूद केले.
राजिब संन्याल यांनी विद्यार्थ्यांच्या प्रतिसादाबद्दल, तसेच त्यांच्यातील गुणवत्तेबद्दल कौतुक केले. विद्यार्थ्यांना भारतीय शास्त्रज्ञ, महापुरुष, संस्कृती आणि वारसा, भारतमाता याची माहिती असावी. त्यासाठी देशभर अशा प्रकारच्या स्पर्धा, उपक्रम राबविणार असल्याचे सांगितले.