जगदिश ओहाळ
ज्यांच्या धावण्याच्या वेगाची तुलना लोकांनी कायम वाऱ्याशी केली, असे खेळ जगतातील वादळ म्हणजे ‘मिल्खासिंग.’ अखेर आज ते वादळ शमलं! आणि त्यांच्या आठवणी वाऱ्याच्या वेगाने जनामनावर घोंगावू लागल्या. ५ दिवस अगोदरच त्यांच्या पत्नी निर्मल कौर यांचं ही निधन झालं आहे, त्याही आंतरराष्ट्रीय खळाडू होत्या. मृत्यूनंतर त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. म्हणजे एकप्रकारे “धावणाऱ्या मिल्खासिंगलाही अखेर कोरोनाने गाठलं” असंच म्हणावं लागेल.
आज २१ व्या शतकात खेळ आणि खेळाडूला भारतात आणि जगात एक उंची व स्थैर्य प्राप्त झालेलं, खेळ ही एक करिअरचं क्षेत्र झालेलं आपण पाहत आहोत. पण मिल्खासिंग यांची गोष्ट यापेक्षा खूप वेगळी आहे. ज्या काळात एक मॅच खेळाल्यावर खेळाडूला दोन रुपये मिळायचे, त्या काळात मिल्खासिंग यांनी आपली ही आवड आणि छंद जोपासला आणि देशाचं नाव जगात गाजवलं!
भारताच्या या सुपुत्राचा जन्म १९२९ मध्ये पंजाब प्रांतातील मुझ्झफरगढ या गावात झाला. पण पुढे भारत-पाकिस्तान फाळणीनंतर मुझफरगढ हे ठिकाण पाकिस्तान हद्दीत गेले. या फाळणीच्या अनेक जखमा मिल्खा सिंग यांच्या आयुष्याला कलाटणी देणाऱ्या ठरल्या, फाळणी वेळी मिल्खासिंग यांच्या कुटुंबात १२ सदस्य होते, पण तेव्हा झालेल्या संहारात त्यांच्या कुटुंबातील चौघेच जिवंत राहिले होते. आणि सर्वात वेदनादायी म्हणजे त्यात त्यांनी त्यांचे आई आणि वडील ही गमावले.
या संहारातून स्वतःला सावरत मिल्खासिंग भारतात निघून आले व भारतात स्थायिक झाले. पण त्या जखमा ताज्या होत्या. त्यांनी भारतीय सैन्य दलात जाण्यासाठी प्रयत्न सुरू केले. तीन वेळा त्यांना डावललं गेलं पण मिल्खासिंग थांबले नाहीत आणि चौथ्या प्रयत्नात त्यांची निवड भारतीय सैन्यदलात झाली.
मग भारतीय सैन्य दलातून त्यांनी ऑलिम्पिकपासून अनेक स्पर्धांसाठी भारताचं प्रतिनिधित्व केलं. १९५६ च्या ऑलिम्पिक मध्ये त्यांचं मेडल केवळ एका क्षणाने हुकलं आणि भारत हळहळला! त्या स्पर्धेत धावताना एका क्षणासाठी त्यांनी मागे वळून पाहिलं आणि त्यांचं स्वप्न भंगले हे जग कधीच विसरू शकत नाही. पण त्यावेळी मिल्खा सिंग यांनी कुठल्याही सरावाशिवाय ऑलिम्पिकमध्ये ४०० मीटरचं अंतर केवळ ४५.९ सेकंदात पार केलं होतं. त्यांचा विक्रम अद्याप कोणत्याही भारतीयाला मोडता आलेला नाही. गेल्याच वर्षी एका कार्यक्रमात बोलताना मिल्खासिंग म्हणाले की, १२५ कोटी लोकसंख्येच्या भारतात एक तरी नवा मिल्खासिंग निर्माण व्हावा आणि त्याने माझं रेकॉर्ड मोडावं तेव्हा वाटेल की खेळ क्षेत्रात बदल होतोय!
मिल्खा सिंग…विक्रमांचा वेग!
• पटियाला येथे १९५६ साली झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत ते पहिल्यांदा खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आले होते.
• २०० व ४०० मीटर शर्यंतीत त्यांनी विक्रमी वेळ नोंदवली होती. १९५८ साली टोकियोत झालेल्या आशियाई स्पर्धत त्यांनी आपली कामगिरी कायम ठेवत २०० व ४०० मीटर शर्यतीत नवा आशियाई विक्रम नोंदवला.
• ६ सप्टेंबर १९६० साली रोम ऑलिम्पिकमध्ये त्यांनी ४०० मीटर शर्यतीत चौथा क्रमांक पटकावला होता.
• त्यावेळी ०.१ सेकंदानं त्यांचं कास्य पदक हुकलं होतं.
• त्या स्पर्धेत सराव न करता आणि बुटांशिवाय ते धावले होते, हे विशेष!
एका कार्यक्रमात मिल्खासिंग यांनी त्यांचा सांगितलेला एका किस्सा, आजच्या पिढीसाठी खूप प्रेरणादायी आहे. ते म्हणतात, जेव्हा १९५८ च्या कॉमनवेल्थ मध्ये मी पहिलं सुवर्ण पदक मिळवलं तेव्हा ते मेडल मला प्रदान करण्यासाठी इंग्लंड ची राणी आली. तेव्हा त्या मैदानावर एक लाखापेक्षा जास्त इंग्रज प्रेक्षक होते, भारतीय मात्र मोजकेच होते. ती इंग्लंडची राणी मला सुवर्ण पदक मला देऊन मागे फिरली तशी त्यांच्या सोबत असणारी एक साडी घातलेली स्त्री माझ्याकडे धावत आली आणि म्हणाली, मिल्खाजी भारतसे पंडितजी (म्हणजे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू) ने पुछा है की, मिल्खा से पुछो उसे क्या चाहीये ? तेव्हा मिल्खा सिंग यांनी भारताच्या पंतप्रधानांना काय मागावं? खेळ आणि खेळाडूंची आजची परिस्थिती आणि तेव्हाची परिस्थिती याचा अंदाज या उत्तरातून येतो. मिल्खासिंग यांनी नेहरूंना उत्तर दिलं ‘मुझे एक दिन की छुट्टी दो’ त्या क्षणाला लाखो रुपये, गाडी, बंगला, अथवा खासदारकी मागितली असती तरी ती नक्की मिळाली असती मिल्खासिंग यांना, पण नाही मागितली कारण मिल्खासिंग यांना जाणीव होती, ते ज्या आपल्या भारतीय सैन्यात शिपाई पदावर नोकरीला होते, तिथे त्यांना महिन्याला पगार होता ३९ रुपये आठ आणे!
क्रीडा क्षेत्रात इतकी गरिबी अनुभवल्याने मिल्खासिंग आणि त्यांच्या पत्नीने ठरवलं की आपला मुलगा जीव सिंग याला इंजिनिअर, डॉक्टर करायचं पण क्रीडा क्षेत्रात नाही ठेवायचं. पण मिल्खाचाच पुत्र तो, शालेय जीवनात त्याने गोल्फ मध्ये आपली चमक दाखवली आणि पुढे देशासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर तो खेळू लागला. त्यालाही भारत सरकारने पद्मश्री प्रदान केला आहे.
पुढे १९६० मध्ये भारत-पाकिस्तान मैत्रीच्या निमित्ताने पाकिस्तानात अॅथलेटिक्स स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेला जाण्याची इच्छा नसतानाही पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या शब्दाखातर मिल्खा सिंग यांना पाकिस्तानात जावे लागलं. पाकिस्तानात पोहोचताच ‘मिल्खा – अब्दुल खालिद की टक्कर’ असे या स्पर्धेचे वर्णन होऊ लागले. पण वाऱ्याच्या वेगाने धावून भारताचा तिरंगा फडकावणाऱ्या मिल्खाला पाकिस्तानचे राष्ट्रपती आयूब खान यांनी ‘फ्लाईंग शिख’ ही उपाधी दिली. असा हा भारत देशप्रेमी मिल्खा भारतीयांच्या मनात कोरला गेला आणि लाखो भारतीयांना प्रेरणा देऊ लागला. भारत सरकारने या महान जिद्दी सुपुत्राचा पद्मश्री देऊन गौरव केला.
१९५८ साली झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेतही २०० व ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत त्यांनी सुवर्ण पदक मिळवलं होतं. मनं जिंकून घेणारी मिल्खा सिंग यांची आणखी एक कृती म्हणजे जिंकलेली सर्व पदकं, चषक, ब्लेझर व आपले विक्रमी बूट त्यांनी राष्ट्रीय खेळ संग्रहालयाला दान केले आहेत.
(जगदिश ओहोळ (जगदिशब्द) हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्याख्याते आहेत. संपर्क 9921878801 )