मुक्तपीठ टीम
सरकारी नोकऱ्यांच्या स्पर्धा परीक्षांमध्ये गैरव्यवहार कसा होतो ते दाखवणारं सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) च्या परीक्षा केंद्रावरील हे फुटेज असल्याचा दावा करण्यात आला आहे. ‘साम’ या मराठी न्यूज चॅनलने म्हाडा परीक्षा सीसीटीव्ही फुटेज उघड केले आहे. औरंगाबादच्या एका परीक्षा केंद्रावरील मालकाशी संगनमत करून ऑनलाईन परीक्षा होणाऱ्या कॉम्प्युटर्सच्या प्रणालीत फेरफार केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत असल्याचा आरोप होत आहे. एमपीएससी समन्वय समितीनेही ट्विटरवर या विषयावर सरकारचे लक्ष वेधत गुणवत्ताधारकांच्या भविष्याशी चालणारा खेळ थांबवण्याची मागणी केली आहे.
म्हाडा परीक्षेत घोटाळा कसा झाला घोटाळा.थेट विद्यार्थ्याशेजारीच बसलाय सुपरवायझर- सीसीटिव्ही कॅमेऱाला दिसतंय ते सरकार पाहणार का? @saamTVnews @Mpsc_Andolan @PuneCityPolice @Awhadspeaks . https://t.co/NZav947Ghi pic.twitter.com/ab8BwFR4O2
— Prachee PS (@prachee_ps) March 30, 2022
सीसीटीव्ही फुटेजमध्ये नेमकं काय?
- ‘साम’ या मराठी न्यूज चॅनलने म्हाडा परीक्षा सीसीटीव्ही फुटेजची बातमी सर्वप्रथम चालवली.
- त्यानंतर एमपीएससी समन्वय समितीनेही ट्विटरवर या विषयावर सरकारचे लक्ष वेधले आहे.
- समन्वय समितीच्या हँडलवरून काही सीसीटीव्ही फुटेजही मांडण्यात आले.
- औरंगाबाद परीक्षा केंद्रातील सीसीटीव्ही फुटेज धक्कादायक आहे.
- समोर आलेल्या फुटेजनुसार, परीक्षेच्या आदल्या दिवशी परीक्षा केंद्राचा मालक, सुपरवाझर आणि काही उमेदवार केंद्रामध्ये शिरताना दिसत आहेत.
- परीक्षेच्या आधीच ते परीक्षा केंद्रात जाताना दिसत आहे.
- त्यांनी ऑनलाईन परीक्षा होणाऱ्या कॉम्प्युटर्सची छेडछाड केल्याचं स्पष्टपणे दिसतं आहे.
- खरंतर नियमांनुसार परीक्षेच्या आधी परीक्षा केंद्र एजन्सीच्या ताब्यात असतं तरीही औरंगाबादच्या ‘मौर्य इन्फोटेक’ या परीक्षा केंद्रावर हे घोटाळेबाज कसे घुसले? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
- परीक्षा केंद्रात घुसलेल्या या लोकांनीच पेपरही लीक केल्याचा आरोप केला जात आहे.
- धक्कादायक बाब म्हणजे या केंद्रावर सुपरवाझर उमेदवाराच्या शेजारी बसून त्याला परीक्षेची उत्तरं सांगताना दिसतो आहे.
म्हाडा भरती घोटाळा व्हिडिओ : पहिला
विद्यार्थ्याची परीक्षा ९ तारखेला आहे तरीही तो ५ तारखेला अनधिकृत रित्या परीक्षा केंद्रात जाताना आपण बघू शकतो.@Awhadspeaks@CMOMaharashtra @DGPMaharashtra
— Mpsc समन्वय समिती महाराष्ट्र राज्य (@Mpsc_Andolan) March 30, 2022
आता तरी परीक्षा खऱ्याखुऱ्या फुलप्रूफ होणार का?
- या संपूर्ण प्रकरणानंतर म्हाडा आणि अन्य स्पर्धा परीक्षा अशाच घेतल्या जाणार का, असा प्रश्न ट्विटरवर विचारला जात आहे.
- गुणवंतांच्या भविष्याचे निकाल लावणाऱ्या अशा परीक्षा घेवू नयेत, सुरक्षित पद्धत आवश्यक, असं मत व्यक्त होत आहे.
- एमपीएससी समन्वय समितीनं गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना तसे प्रश्नही केले आहेत.
- म्हाडाची परीक्षा व्हायच्या एक दिवस आधी इथल्या पेपरफुटीची माहिती मिळाल्यानंतर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी परीक्षा अचानक रद्द केल्याची घोषणा केली होती.
- ऐनवेळी पेपर रद्द झाल्यानं उमेदवारांना थोडासा त्रास सहन करावा लागेल पण यापुढे जी परीक्षा होईल ती फुलप्रुफ असेल असा दावाही करण्यात आला होता.
- आता त्यांचे ते शब्द प्रत्यक्षात आणणारी परीक्षा पद्धती अस्तित्वात यावी, अशी अपेक्षा तरुणाईकडून व्यक्त होत आहे.