मुक्तपीठ टीम
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनद्वारे (मुं.मे.रे.कॉ) कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-३ मार्गावरील महालक्ष्मी मेट्रो स्थानकावर भुयारीकरणाचा ४०वा टप्पा यशस्वीरित्या पार पडला. तानसा-१ या रॉबिन्स बनावटीच्या टनेल बोरिंग मशीनद्वारे सायन्स म्यूझियम मेट्रो स्थानक ते महालक्ष्मी मेट्रो स्थानक हा डाऊन-लाईन मार्गाचा ११३५.५ मी. भुयारीकरणाचा टप्पा एकूण ७५७ रिंग्सच्या साहाय्याने ३२५ दिवसात पूर्ण करण्यात आला.
“सायन्स म्युझियम ते महालक्ष्मी स्थानका दरम्यान भुयारीकरण करणे अतिशय आव्हानात्मक होते. या टप्प्यातील भुयारीकरण पश्चिम रेल्वे मार्गावरील महालक्ष्मी आणि लोअर परेल रेल्वे स्थानकांच्या दरम्यान थेट रेल्वेमार्गाच्या खालून करण्यात आले आहे. याशिवाय हे बोगदे जेकब सर्कल येथील महानगर पालिकेच्या १७ मीटर खोल भूमिगत गटार (sewer) पंपिंग स्टेशनच्या जवळ आहेत. त्यामुळे येथे भुयारीकरण करणे जिकिरीचे होते मात्र हे शिवधनुष्य आमच्या टीमने यशस्वीरीत्या पेलले,” असे मुं.मे.रे.कॉचे व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंह देओल यांनी सांगितले.
मेट्रो-३ मार्गिकेतील पॅकेज-३ मध्ये पाच स्थानके असून हा या मार्गिकेतील सर्वात लांब टप्पा आहे. या अंतर्गत मुंबई सेंट्रल, महालक्ष्मी, सायन्स म्यूझियम, आचार्य अत्रे चौक आणि वरळी मेट्रो स्थानकांचा समावेश आहे. आतापर्यंत या पॅकेज अंतर्गत चार भुयारीकरणाचे टप्पे पूर्ण झाले आहेत.
पॅकेज-३ च्या भुयारीकरणाचा तपशील पुढील प्रमाणे
१) सायन्स म्यूझियम ते वरळी (अप लाईन- २०७२ मी, डाऊन लाईन- २०५७ मी)
२) सायन्स म्यूझियम ते महालक्ष्मी (अप लाईन- १११७.५ मी, डाऊन लाईन-११३५.५ मी)
मेट्रो-३ प्रकल्पाचे आतापर्यंत एकूण ५३ कीमी म्हणजेच ९७% भुयारीकरण पूर्ण झाले आहे.