मुक्तपीठ टीम
मुंबईकरांनो रविवारी लोकलने कुठे फिरायचा, कुठे जायचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. पश्चिम-मध्य-हार्बर मुंबईच्या तीन रेल्वेमार्गांवर रविवारी अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी मेगा ब्लॉक असणार आहे. माटुंगा मुलुंड अप – डाउन धीम्या मार्गावर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल/बेलापूर/वाशी दरम्यान मेगा ब्लॉक असणार आहे. हार्बर रेल्वेच्या कुर्ला आणि वाशी अप-डाऊन मार्गावर तसेच पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते मुंबई सेंट्रलदरम्यान अप-डाऊन जलद मार्गावर ब्लॉक असणार आहे.
मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन धीमा मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.०५ वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. परिणामी माटुंगा ते मुलुंडदरम्यान धावणाऱ्या अप आणि डाऊन धीम्या लोकल जलद मार्गावर वळविण्यात येणार आहेत. दरम्यान लोकल १५ मिनिटे विलंबाने धावणार आहेत.
हार्बर रेल्वेच्या सीएसएमटी ते पनवेल/बेलापूर/वाशी अप आणि डाऊन मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. परिणामी सीएसएमटी ते पनवेल/बेलापूर/वाशीदरम्यान धावणाऱ्या अप आणि डाऊन धीम्या लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत. तर सीएसएमटी-कुर्ला-सीएसएमटी आणि पनवेल-वाशी-पनवेलदरम्यान विशेष लोकल फेऱ्या चालवण्यात येणार आहेत.
पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट ते मुंबई सेंट्रल अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी १०.३५ ते दुपारी ३. ३५ वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. परिणामी अप आणि डाऊन जलद मार्गावरील लोकल फेऱ्या धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहेत. यामुळे काही लोकल फेऱ्या विलंबाने धावणार असून काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत.