मुक्तपीठ टीम
एमडी ड्रग्ज तस्करीप्रकरणी दोन अभिलेखावरील आरोपींना मंगळवारी नागपाडा आणि ताडदेव परिसरातून वरळी युनिटी अमली पदार्थ विरोधी पथकाच्या अधिकार्यांनी अटक केली. मोहम्मद आरिफ अब्दुल गफार शेख आणि कामरान जावेद शेख अशी या दोघांची नावे असून ते दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्यांच्याविरुद्ध ड्रग्ज तस्करीसह खंडणी, मारामारीच्या अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहेत. या दोघांकडून पोलिसांनी १ किलो १६५ ग्रॅम वजनाचा एमडी ड्रग्जचा साठा जप्त केला असून या एमडीची किंमत एक कोटी सोळा लाख ५० हजार रुपये आहे.
अटकेनंतर या दोघांनाही स्थानिक महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्यांना बुधवार २७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या दोघांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु असून या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
मुंबई शहरात ड्रग्जची विक्री करणारे, पुरवठा आणि साठा करणार्याविरुद्ध मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने विशेष मोहीम सुरु केली होती. ही मोहीम सुरु असतानाच ताडदेव आणि नागपाडा परिसरात काहीजण एमडी ड्रग्जची विक्रीसाठी येणार आहेत. या माहितीनंतर सहपोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, अतिरिक्त पोलीस आयुक्त विरेश प्रभू, पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र चिखले यांच्या मार्गदर्शखाली प्रभारी पोलीस निरीक्षक दिपक चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेक खवळे, सुदर्शन चव्हाण, अमर मराठे, सहाय्यक फौजदार रणदिवे, चांदे, डोंब, पोलीस हवालदार पाटील, कदम, मते, पोलीस नाईक चव्हाण, तडवी, शेलार, गायकवाड, माळी यांचे दोन विशेष पथक तयार करण्यात आले होते. एका पथकाला नागपाडा तर दुसर्या पथकाला ताडदेव परिसरात पाठविण्यात आले होते. मंगळवारी सायंकाळी चार वाजता ताडदेव येथील साने गुरुजी मार्ग, तुळशीवाडी पोस्ट ऑफिसच्या बाजूला पोलिसांना एक तरुण संशयास्पद दिसून आला. त्याची हालचाल संशयास्पद वाटताच त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत त्याने स्वतचे नाव मोहम्मद आरिफ अब्दुल गफार शेख असल्याचे सांगून तो जे. जे मार्ग परिसरात राहतो असे सांगितले. त्याच्याकडे पोलिसांना एक प्लास्टिक बॅग सापडली. त्याची तपासणी केल्यानंतर या पथकाला त्यात १ किलो १०५ ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज सापडले. या ड्रग्जची किंमत एक कोटी दहा लाख ५० हजार रुपये इतकी होती. त्यानंतर त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा नोंदवून पोलिसांनी त्याला अटक केली. या कारवाईनंतर दुसर्या पथकाने नागपाडा येथील दोनटाकी, सरवर स्क्रॅप दुकानासमोरुन कामरान शेख याला ताब्यात घेतले. यावेळी त्याच्याकडे पोलिसांना ६० ग्रॅम वजनाचे ड्रग्ज सापडले, दोन्ही कारवाईत पोलिसांनी १ कोटी १० लाख ५० हजार रुपयांचा १ किलो १६५ ग्रॅम वजनाचा एमडी ड्रग्ज जप्त केले आहेत. त्याच्याविरुद्धही नंतर एनडीपीएस कलमांतर्गत कारवाई करण्यात आली होती. अटकेनंतर बुधवारी दुपारी या दोघांनाही पोलीस बंदोबस्तात हजर करण्यात आले होते. यावेळी त्यांना न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
कामरान आणि मोहम्मद आरिफ हे दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. कामरानविरुद्ध मरिनड्राईव्ह, डोंगरी, अंमली पदार्थ विरोधी पथक, वडाळा टी टी, व्ही पी रोड पोलीस ठाण्यात पाच ड्रग्ज तस्करीचे तर डोंगरी पोलीस ठाण्यात चार मारामारीचे गुन्हे दाखल आहेत. मोहम्मद आरिफविरुद्ध खंडणीसह मारामारीचे नागपाडा आणि जे जे मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याचे पोलीस निरीक्षक दिपक चव्हाण यांनी सांगितले. सध्या ते दोघेही पोलीस कोठडीत असून त्यांची कसून चौकशी सुरु आहे. त्यांना ते ड्रग्ज कोणी दिले, ते ड्रग्ज कोणाला देण्यासाठी आले होते याचा तपास सुरु आहे.