मुक्तपीठ टीम
मीरा भाईंदर महापालिकेने ऑक्सिजनचा टँकर भाडे तत्वावर घेत मीनाताई ठाकरे सभागृहात १६५ ऑक्सिजन खाटांची अतिरिक्त सुविधा उपलब्ध केली आहे. शिवाय १८ खासगी रुग्णालयांना सुद्धा कोरोना रुग्णांवर उपचार करण्यास परवानगी दिल्याने कोरोना रुग्णांना उपचारासाठी आणखी खाटा उपलब्ध होऊन दिलासा मिळाला आहे. पालिकेने आणखी २२०० खाटा सुरु करण्याची तयारी केली असल्याचे महापालिका आयुक्त दिलीप ढोले म्हणाले.
मीरा भाईंदर महापालिकेचे आयुक्त दिलीप ढोले यांनी कोरोना रुग्णांना सोयीसुविधा देण्यासाठी विविध उपाययोजना सुरु केल्या आहेत. ऑक्सिजनची कमतरता असल्याने आणखी खाटा सुरु करता येत नव्हत्या. त्यामुळे आयुक्तांनी ऑक्सिजन वाहतूक करणारा टँकरच भाड्याने घेतला आहे. ऑक्सिजन अभावी सुरु करता येत नसलेल्या मीनाताई ठाकरे कोरोना उपचार केंद्रातील १६५ ऑक्सिजन सुविधा असलेल्या खाटा पालिकेने आता सुरु केल्याने रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. अप्पासाहेब धर्माधिकारी सभागृहात आणखी १०० ऑक्सिजन खाटांची सेवा सुरु केली जाणार आहे.
महापालिकेने भीमसेन जोशी रुग्णालयात २५०, प्रमोद महाजन उपचार केंद्रात २०६ तर धर्माधिकारी सभागृहात ९५ ऑक्सिजन व आयसीयू खाटांची सुविधा सुरुवाती पासूनच उपलब्ध करून दिलेली आहे. रामदेव पार्क येथील समृद्धी कोरोना केअरमध्ये कोरोना रुग्ण आहेत. याशिवाय महापालिकेने नया नगरच्या हैदरी चौक पालिका सभागृहात १५० खाटा तर भाईंदरच्या माहेश्वरी भवन येथे १५० अश्या २५० खाटांची सुविधा येत्या काही दिवसात कोरोना रुग्णांसाठी सुरु केली जाणार आहे. याशिवाय डेल्टा गार्डन येथे ८६२, न्यू गोल्डन नेस्ट आर-२ या इमारतीत ९५२ तसेच काशिमिरा येथे खासगी इमारतीत ३२० असे २ हजार १३४ सर्वसाधारण खाटांची तयारी पालिकेने चालवली आहे.
शहरात ह्या आधी २५ खासगी रुग्णालयांना कोरोना रुग्णांवर उपचार करण्याची परवानगी दिलेली होती. आता आयुक्तांनी आणखी १८ खासगी रुग्णालयांना सुद्धा कोरोना उपचाराची परवानगी दिली आहे. तर दोन रुग्णालयांना खाटांची संख्या वाढवून दिली आहे. ह्यामुळे कोरोना रुग्णांना खासगी रुग्णालयात आणखी खाटांची उपलब्धता झाली आहे. जेणे करून रुग्णांना खाटांची कमतरता भासू नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या आधी ५ ते ६ खासगी कोरोना रूग्णालयांना ऑक्सिजनचे ६० जम्बो सिलिंडर्स वेळेत उपलब्ध करून तेथील रूग्णांचे प्राण वाचविण्याची महत्वाची भुमिका पालिका प्रशासनाने बजावली आहे.