तुळशीदास भोईटे / सरळ-स्पष्ट
मध्यंतरी एक छायाचित्र व्हायरल झालं होतं. मुंबईच्या लोकलमध्ये एक प्रवाशी झोपलेला. त्याने तोंड-नाकावर आवश्यक असलेला मास्क चक्क डोळ्यांवर ओढलेला. कष्टकरी किंवा मध्यमवर्गीय असणार तो. थकून घरी परतताना झोपेतही झालं असेल. समर्थन नाही. ते चूकच. पण त्याची चेष्टा झाली. आणि समाजातील हा घटक ज्यांच्याकडे आपले रोलमॉडल म्हणून पाहतो त्या राजकीय नेत्यांनी मात्र आपले मास्क डोळ्यांवरच घातले आहेत. त्या प्रवाशाचा दिसला, यांचे दिसत नाहीत. मात्र, वागण्या-बोलण्यातून नेत्यांच्या डोळ्यांवरचे मास्क जाणवत असतात!
सुरुवात आजच्या पंढरपूरमधील उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या सभेचे पाहा. अजित पवारांनी शिस्तीत मास्क घातला होता. पण समोर असलेल्या गर्दीत मास्क दिसत नव्हते. मते दूर जातील या भीतीने कार्यकर्ते, मतदार मस्त मांडीला मांडी लावून खेटून बसलेले. अजित पवारांच्या मंचापासून ते सभागृहापर्यंत सर्वत्र नियमांचा फज्जा उडवला गेला होता.
हेच अजित पवार मंत्रालयात वावरताना, पुण्यात वावरताना वेगळे असतात. कडक धोरण राबवतात. प्रसंगी वाईटपणा घेऊन फटकारतात. मग पंढरपुरात तेच अजित पवार असे का वागतात. मतांच्या लाचारीतून? की तेथे भाषण देताना त्यांच्या मास्क डोळ्यांवर गेला होता? समोरचे काहीच दिसत नव्हते? असेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे मंत्री जयंत पाटील यांच्या सभेतही झाले. लोकांनी तर सोडा जयंतरावांनीही मास्क काढून ठेवलेला. बहुधा तो नंतर दिसत नव्हता तरी डोळ्यांवरच लावला असावा.
विजय-पराभव होत राहतात. सध्या तर एक जागाही महत्वाची. त्यामुळे पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी-शिवसेना-काँग्रेस आघाडी आणि भाजपाने जोर लावणंही समजू शकतो. पण सर्रास कोरोना नियमांचा भंग करत बेबंद प्रचार करणे हा जनहिताशी केलेला द्रोहच
त्यामुळे आता वाद घातल बसण्यापेक्षा राष्ट्रवादी आणि भाजपाच्या राज्यस्तरावरील नेत्यांनी संवाद साधावा. एक वेगळा प्रयोग करावा. ही पोटनिवडणूक प्रचाराविना होऊ द्यावी. एवढी वर्षे तुम्ही, तुमचे उमेदवार काम करतात. दिसू द्या त्या कामाचे मतदानात प्रतिबिंब!
धक्कादायक निवडणूक आयोगाचे वाटते. स्वायत्त यंत्रणा. निवडणूक ठराविक कालावधीत घेण्याचे नियम समजू शकतो. पण परिस्थितीनुसार अपवाद करणे अशक्य नाही. पण सध्या मास्क तर त्यांच्याही डोळ्यांवर दिसतो.
हे झाले पंढरपूरचे. आता इतर ठिकाणी काय चाललंय?
महाराष्ट्रातील एकही राजकीय पक्ष असं सांगू शकत नाही की आम्ही कोरोना संकट काळात गर्दी जमवली नाही. नियमांचा भंग केला नाही. प्रत्येकानेच केला आहे.
भाजपा विरोधी पक्ष. आंदोलने केलीच पाहिजेत. त्यात गैर नाही. पण कोणत्या किंमतीवर? कोरोनासंसर्ग पसरवून जनतेच्या जीवाशी खेळ करून तसं होऊ नये. एकीकडे सरकार काही करत नाही म्हणायचे दुसरीकडे सरकारने जारी केलेल्या निर्बंधांचा भंग करत आंदोलनं करायची आणि कोरोना संसर्ग वाढेल अशी परिस्थिती निर्माण करायची. ज्या नागपुरात काल भाजपा नेते गिरिष व्यास यांनी व्यापाऱ्यांची गर्दी रस्त्यावर आणली. त्याच नागपुरात मनपाने धाडी घालून अनेक दुकानदार, त्यांचे कर्मचारी यांच्या चाचण्या केल्या, तेव्हा ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले. त्यांना सुपरस्प्रेडर म्हटले गेले. कारवाई करणारी नागपूर मनपा भाजपाची सत्ता असणारी! त्यामुळे कारवाई चुकीची असे भाजपा तरी बोलू शकत नाही. तरीही बोलले जाते कारण मास्क डोळ्यांवर आहेत!
शिवसेनेचे पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुटुंबप्रमुखाच्या जिव्हाळ्याने कठोर निर्बंधांची भूमिका घेतात. लोक मान्यही करतील. पण त्यांच्या पक्षाचे काही स्थानिक नेते निर्बंधांमध्ये बेबंद वागतात. लग्नामध्ये नियमांना गर्दीत चिरडतात. दिसत नाही कधी कारवाई झाल्याचे. कारण नेतृत्व कितीही कठोर भूमिकेत असलं तरी शिवसेनेतही मास्क अनेकांच्या डोळ्यांवर आहेत!
राष्ट्रवादी काँग्रेस आता पंढरपुरातच चुकतेय असं नाही. कोरोना कमी होताच राष्ट्रवादी काँग्रेसने जनता दरबारांमध्ये जी गर्दी जमवण्यास सुरुवात केली होती. ती पक्षवाढीसाठी चांगली होती तरी त्याबरोबर एकावर एक फ्री असा कोरोनाही लोकांना मिळाला असेल तर आश्चर्य वाटणार नाही. पण राष्ट्रवादी नेत्यांनी तसे केले. आज शरद पवारांनी आवाहन केले असतानाही अजित पवारांच्या सभेत बेबंद गर्दी झाली. कारण राष्ट्रवादीतही मास्क अनेकांच्या डोळ्यांवर आहेत, त्यामुळे कोरोना आहे, हेच अनेकांना दिसत नाही.
काँग्रेस पक्ष त्यातल्या त्यात ठिक वागतो असे वाटत होते. पण उत्साही प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या पदग्रहणाच्या दिवशी जी गर्दी रस्त्यांपासून मैदानांपर्यंत तसेच त्यांच्या स्वागतासाठी झाली त्या गर्दीत कोरोना तर नाही पण सुरक्षा नियमच पायदळी चिरडले गेले. आज मालेगावात काँगेसचे नेते एमआयएमप्रमाणेच रस्त्यावर गर्दी जमवत होते. निर्बंधांविरोधात. पुन्हा तेच मास्क प्रत्यक्षात डोळ्यांवर आहेत.
मनसेचे काय सांगणार! राज ठाकरेंनी पत्रकारांना चांगलं झापलं. कोरोना नियमांची अक्कल इतरांना शिकवता, तुम्ही का ते पाळत नाही, असा जाब विचारला. चांगलंच केलं पण तेच राज ठाकरे बाहेर गर्दीत वावरताना मास्क घालत नाही. पुन्हा अभिमानाने तसे सांगतात. पदाधिकाऱ्याने घातलेला मास्कही काढायला लावतात. हा खरं तर जीवाशी खेळ. पुन्हा तेच मास्क जेव्हा तोंड-नाकावर दिसत नाहीत, तेव्हा ते १०० टक्के डोळ्यांवरच असतात!
प्रकाश आंबेडकर. भारिपपासून ते वंचितपर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर मला हा नेता खूप वेगळा वाटायचा. बाकी राजकीय तडजोडी ठिक आहेत. त्या भूमिका घ्याव्या लागतात. पण कोरोना निर्बंध त्यांना सर्वात जास्त नकोसे झाले ते मंदिरं उघडण्यासाठी! आज त्यांचं वक्तव्य ऐकलं. कोरोना वाढण्यासाठी सरकारचा बेजबाबदारपणा जबाबदार आहे. हेही योग्य. पण पुढे दुकाने उघडू देण्याची मागणी. अगदी ग्रामीण भागात जाऊनही आर्थिक प्रश्न समजवून सांगणारा हा नेता आता मात्र तर्कशुद्ध नसणाऱ्या भूमिका घेताना पाहून धक्कादायक वाटते. कुठेतरी मास्क डोळ्यांवरच दिसतो. खुपतो.
राजकारण्यांच्या डोळ्यांवरील मास्कचे सर्वात मोठे उदाहरण लसीकरणावरून सुरु झालेल्या राजकारणाचे! महत्वाचे काय? लसीकरण की राजकारण? त्यातूनच कळते की मास्क सर्वांच्याच डोळ्यांवर आहेत.
थोडं आमच्याविषयी. पत्रकारांविषयी. आम्ही कसे वागतो. राजकारण्यांसारखेच! केसस्टडी म्हणून कोणत्याही मराठी माध्यमाला अभ्यासले तर धक्क्यावर धक्के बसतात. प्रशासनाने जेव्हा थोडे निर्बंध आणण्यास सुरुवात केली तेव्हा एक वाक्य ऐकलेले. एवढे महिने निर्बंध होते तरी काय झाले. आता पुन्हा का कारवाई करावी लागतेय? पुन्हा दादर बाजारातील फेरीवाल्यांना चिथावणारे प्रश्न. तुम्ही येथून दुसरीकडे जाणे तुम्हाला मान्य आहे का? नंतर त्याच ठिकाणची गर्दी दाखवत कसे निर्बंध पाळण्यात प्रशासन कमी पडत आहे. हे एक उदाहरण! निर्बंधांचा उपदेश जनतेला करताना आव आणला जातो कोरोनासाठी आपण किती सतर्क आहोत त्याचा आणि प्रत्यक्षात गर्दीत रिपोर्टरला पाठवताना, न्यूजरुममध्ये गर्दी होऊ देताना लक्षात येतं मास्क तर आम्हा पत्रकारांच्याही डोळ्यांवर आहेत.
सामान्यांचं काय सांगणार. त्यांच्यातील अनेकांची मजबुरी मला समजू शकते. मी रस्त्यावर फेरीचा धंदाही केला आहे. चाळीत राहिलो आहे. सार्वजनिक शौचालय वापरलंय. मात्र, तरीही किमान गर्दी न करणे, जास्त लगट न करणे, मास्क घालणे अशक्य नाही. आज लसीकरण समजवताना लक्षात येतं लोकांना बिघडवणारे जास्त आवडतात. पटतात. नंतर जेव्हा लसटंचाईच्या बातम्या येतात तेव्हा लसीसाठी धावतात. यात सुशिक्षितांचाही अपवाद नाही. उलट हा वर्ग जास्त पॉलिश्ड पद्धतीने, आपापल्या राजकीय संस्कारांनुसार शिताफीने अफवा पसरवतो. मास्क डोळ्यांवर यांच्याही आहेत!
सर्वात शेवटी प्रशासनावर येतो. कारण कितीही काही झाले तरी आता गेले वर्षभर तेच कोरोनाशी थेट लढत असतात. त्यासाठी सलामच! पण कोरोना निर्बंधाची अंमलबजावणीचे अधिकार असतानाही त्यात होणारी हयगय ही बऱ्याचदा संशयास्पद असते. धोरणं खरंतर हेच ठरवतात. हेच राबवतातही. राजकारणी तर टेम्पररी. पण मग कंत्राटी पद्धत आणायची, कर्मचारीऐवजी सेवक असा गोंडस शब्द आणून शोषण करायचं. वेळेत वेतन जारी करायचे नाही. वेळेत तयारी ठेवायची नाही. लॉकडाऊनमध्ये जनतेचे हाल होतील, जगणे अशक्य होईल अशी परिस्थिती निर्माण होते. तरीही मुळात तशा निर्बंधाची वेळ येऊ नये यासाठी पहिल्या टप्प्यातच पावले उचलायची नाहीत सुस्तावून राहायचं. उलट वेळ आली तर राजकारण्यांच्याच नावाने बोंबा ठोकत हात वर करायचे. नेहमीचेच खेळ. जीव यांचेही जातात. आपलीच माणसं. तरी असे वागतात. कारण मास्क यांच्या डोळ्यांवर तर कायमच असतात!
एकूणच राजकारणीच नाहीत, तर आपल्या सर्वांचेच चुकत आहे. कारण आपल्याला वास्तव आवडत नाही. आपण मास्क डोळ्यांवर घालतो. पण आवडो न आवडो जीव राहिला तरच सर्व असेल. त्यामुळे आतातरी डोळ्यांवरचे मास्क काढा!
(तुळशीदास भोईटे हे मुक्तपीठ www.muktpeeth.com माध्यम उपक्रमाचे संपादक आहेत. संपर्क 9833794961 ट्विटर @TulsidasBhoite)