मुक्तपीठ टीम
काही माध्यमांनी महाराष्ट्रात मास्क सक्ती रद्द होणार असल्याच्या बातम्या दिल्या असल्या तरी तसा कसलाच विचार नाही, असे राज्यातील महत्वाच्या मंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मास्कमुक्तीची नजिकच्या भविष्यात तरी मुळीच शक्यता नसल्याचं स्पष्ट झालं आहे. जोपर्यंत कोरोनाची साथ संपली असं WHOसारख्या आरोग्य संस्था अधिकृत जाहीर करत नाहीत, तोपर्यंत मास्कमुक्ती अवघडच असल्याचा सूर सत्ताधारी नेत्यांच्या बोलण्यातून उमटत आहे.
मास्कमुक्ती त्यांनाच लखलाभ – अजित पवार
इंग्लंडसारख्या काही देशांनी मास्कमुक्ती केली असेल, तो त्यांना लखलाभ. त्याबद्दल मला बोलायचं नाही. राज्याच्या मंत्रिमंडळात तशा प्रकारची काही चर्चाही नाही. तसा निर्णय झालेला नाही.
माध्यमांनी व्यवस्थित माहिती घेवूनच बातम्या दिल्या पाहिजेत. आपल्या राज्यात अशी चर्चाही झालेली नसताना अशा मास्कमुक्तीच्या बातम्या देवून लोकांमध्ये गैरसमज पसरवू नये, असं आवाहन अजित पवारांनी केले आहे.
मास्कसक्तीपासून मुक्ती हा गैरसमज! – आदित्य ठाकरे
पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनीही मास्कमुक्ती होणार असल्याच्या बातम्या या चुकीच्या असल्याचं स्पष्ट केलं आहे.
आपण हा गैरसमज दूर केला पाहिजे की मास्क सक्ती हटवण्यात येईल. आत्तापर्यंत सरकारने जे काही निर्णय घेतलेत ते सगळे डॉक्टर्स, तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार घेतले आहेत. WHOने करोनाची साथ संपली, असे जाहीर केलेलं नाही. ओमायक्रॉनचा कोणताही व्हेरिएंट हा सौम्य किंवा गंभीर आहे असेही सांगितलेलं नाही. कारण व्हेरिएंट हा व्हेरिएंट असतो. मी एकच सांगू शकेन की जर आपल्याला स्वत:ला वाचवायचं असेल, तर आत्तापर्यंतचं सर्वात चांगलं शस्त्र हे मास्क आहे.