मुक्तपीठ टीम
ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने मुलाच्या विवाहाचा स्वागत समारंभ रद्द केल्यानंतर आता अन्य नेतेही तसाच संयम दाखवत आहेत. मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांन्या ‘मी जबाबदार’ या मोहिमेला प्रतिसाद देत शिवसेना नेते डॉ.विनोद घोसाळकर यांनी आपल्या मुलाचा लग्नसोहळा अत्यंत साधेपणाने पार पाडण्याचा निर्णय घेतला आहे.
विनोद घोसाळकर यांचे चिरंजीव सौरभ यांचा विलेपार्ले पूर्व येथील सहारा स्टार हॉटेलमध्ये २८ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. या विवाह सोहळ्यास मुख्यमंत्र्यांसोबत अनेक मंत्री, नेतेमंडळी उपस्थित राहणार होते. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत हा लग्नसोहळा आता मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडेल.
विनोद घोसाळकर यांनी मंगळवारी वर्षा निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्र्यांना हा निर्णय कळवला. मुख्यमंत्र्यांनी देखील त्यांच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. मुख्यमंत्र्यांनी नितीन राऊतांच्या निर्णयाचीही जाहीर प्रशंसा केली होती. शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनीही आपला वाढदिवस सोहळा न करता कोरोना योद्ध्यांच्या सत्काराने साजरा केला होता.