Tuesday, May 13, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

मराठीचं अपूर्णत्व, खालावलेली वैज्ञानिक पातळी, विज्ञान कथांविषयी सर्व काही! जयंत नारळीकरांचं परखड भाषण!

नाशिकच्या ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष जयंत नारळीकर यांचे भाषण जसं आहे तसं...

December 3, 2021
in featured, घडलं-बिघडलं, विशेष
0
Dr Jayant Naralikar 94th marathi sahitya sammelan nashik

जयंत नारळीकर / अध्यक्ष: अ . भा. मराठी साहित्य संमेलन

सर्वप्रथम आजच्या महत्वाच्या प्रसंगी मला माझे विचार मांडायला संधी दिलीत याबद्दल आपणा सर्वांचे आभार मानतो. तसेच माझे भाषण आपल्या पसंतीस उतरले नाही तर त्याबाबत आधीच दिलगिरी व्यक्त करतो.

कुठल्याही भाषेतले साहित्य ती भाषा वापरणाऱ्या समाजातील घडामोडींनी प्रभावित झालेले असते. साहित्याचा कोणताही विषय असो, ते लिहिणारा त्याच्या भोवतालच्या परिस्थितीपासून अलिप्त राहू शकत नाही. एखाद्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत “ह्या पुस्तकातील घटना व पात्रे काल्पनिक असून त्यांचा प्रत्यक्षाशी काहीही संबंध नाही.” इत्यादी विधाने सापडतात. त्यांनी कायद्याचे समाधान होत असेल, पण लेखकाने आत्मपरीक्षण केल्यास त्याला अशा विधानात तथ्य नसल्याचे आढळून येईल. परंतु याचा अर्थ असा नव्हे की, सामाजिक घडामोडींचे संपूर्ण प्रतिबिंब साहित्यात उमटते. एखादी भाषा पुष्कळ विकसित असेल तर समाजाचे बहुतेक पैलू त्यात उमटतात. परंतु काही महत्वाचे पैलू भाषेकडून उपेक्षिले गेले तर त्या बाबतीत तिला असमृद्ध समजले पाहिजे. अशा मानदंडाद्वारे आपण असे म्हणू शकतो की, इंग्रजी भाषा मराठी भाषेपेक्षा अधिक समृद्ध आहे.

मराठीचे अपूर्णत्व

मराठीचे अपूर्णत्व सर्वांत जास्त जर कुठे जाणवत असेल तर ते विज्ञान-साहित्याबाबतीत. विसावे शतक हे विज्ञानाचे शतक म्हटल्यास चूक ठरणार नाही. आइन्स्टाइनचा सापेक्षतावाद आणि प्लांक-आइन्स्टाइन बोर यांचा पुंजवाद हे दोन महत्वाचे मूलभूत सिद्धान्त ह्या शतकाच्या पहिल्या पंधरा वर्षात भौतिकशास्त्राला मिळाले. अमूर्त गणिताच्या अनेक नव्या शाखा ह्या शतकात चालू झाल्या. वर्षानुवर्षे न सुटू शकणारे प्रश्न चुटकीसरशी सोडवणारी गणकयंत्रे ह्या शतकाच्या उत्तरार्धात निघाली. विश्वाचे विराट दर्शन आणि अणूच्या अंतरंगाचे सूक्ष्म दर्शन मानवाला आज पाहायला मिळत आहे. जीवशास्त्राच्या मुळाशी असलेला डी.एन.ए. रेणू शास्त्रज्ञांना सुमारे सहा दशकांपूर्वी गवसला. विज्ञानाची ही गरुडझेप तंत्रज्ञानाच्या रूपाने मानवीजीवन अधिक प्रगत, विकसित करायला कारणीभूत ठरली.

 

विज्ञानयुग आणि विज्ञानसाहित्य

विज्ञान साहित्य म्हणजे काय? वैज्ञानिक संशोधनाचे प्रबंध किंवा एखाद्या विषयातील पोटशाखेत जागतिक स्तरावरील संशोधनाचा आढावा यांना मी विज्ञान साहित्यात धरत नाही. परंतु एखादा वैज्ञानिक शोध जनसामान्यांपर्यंत पोचवण्यासाठी लिहिलेले लेख मी विज्ञान साहित्यात धरेन. अर्थात एखाद्या वैज्ञानिक कल्पनेला मुळाशी धरून त्याभोवती रचलेली कथा किंवा कादंबरी मी विज्ञान साहित्य म्हणून मानली तर त्याबद्दल कोणाचा आक्षेप असू नये.

 

मराठीतील विज्ञान-साहित्याकडे वळण्यापूर्वी मी इंग्रजी भाषेतील काही उदाहरणे घेतो. केवळ एक अपवाद (पहिलाच!) सोडून! या आधीच्या शतकात विज्ञानयुगाची चाहूल लागली असे म्हणायला हरकत नाही. टेलिग्राफ, टेलिफोन, आगगाड्या, औद्योगिक क्रांती यांचा अनुभव अनेक देशांना आला होता. अशा पार्श्वभूमीवर जुल्स व्हर्न याने ‘ऐशी दिवसांत पृथ्वीप्रदक्षिणा’ अशासारखे पुस्तक लिहिले. त्या कादंबरीतील कथानकात वर नमूद केलेल्या वैज्ञानिक साधनांचा उपयोग होताच, परंतु विज्ञान कादंबरी म्हणता येईल असे त्याच्यात काय होते? पृथ्वीप्रदिक्षणा पूर्वेकडे जात केली तर दिवस-रात्र मिळून २४ तासांहून कमी होतात. आजच्या जेट विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशाला ह्याचा प्रत्यय लगेच येतो. पण जहाजाने हळूहळू प्रवास करताना हे तितकेसे जाणवत नाही. त्यामुळे सबंध पृथ्वीप्रदिक्षिणा करून येणाऱ्याचा एक दिवसाचा कालखंड वाचतो’ ह्या वैज्ञानिक तथ्याचा कथानकात कौशल्याने उपयोग केला आहे म्हणून तिला विज्ञान कादंबरी म्हटले पाहिजे.

 

द्रष्टेपणासाठी लेखक वैज्ञानिक किंवा तंत्रज्ञ असायला पाहिजे असे नव्हे. ई.एम. फॉर्टर (ज्यांचे पुस्तक ‘पॅसेज टु इंडिया’ जगप्रसिद्ध आहे.) साहित्यिक होते, विचारवंत होते, पण विज्ञानाचे अभ्यासक नव्हते. मात्र विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्या वाढत्या वापरामुळे मानव अधिकाधिक यंत्रावलंबी होत चालला आहे हे त्यांना दिसत होते. सहा दशकांपूर्वी ‘यंत्र थांबते’ ह्या कथेत त्यांनी ज्या यंत्रावर मानवी संस्कृती सर्वस्वी अवलंबून आहे, ते यंत्र थांबल्यावर त्या संस्कृतीचे काय हाल होतील याचे चित्र रंगवले आहे. वीजपुरवठा बंद झाला की, न्यूयॉर्कसारख्या ‘अतिप्रगत’ शहरातील लोकांचे कसे हाल झाले याचे प्रात्यक्षिक पाहून ती कथा अतिरंजित वाटत नाही.

 

परंतु विज्ञानाचे मनोरंजक चित्र समाजापुढे उभे करायचे काम अनेक लेखकांनी केले आहे. विज्ञानाची ओळख जनसामान्यास करून देण्याची प्रथा १९व्या शतकात मायकेल फॅरॅडे याने सुरू केली. फॅरडेने भाषणे, प्रयोग, प्रात्यक्षिके, लेखन आदि करून आपले शोध सोप्या भाषेत समजावून सांगितले. त्या प्रयत्नांतून जन्माला आलेली विज्ञानसंस्था रॉयल इन्स्टिट्यूशन आजही ते काम चोखपणे बजावीत असते.

 

अशा पार्श्वभूमीवर मराठी साहित्याकडे पाहिले की त्यात विज्ञान साहित्य किती अल्प प्रमाणात आहे ते दिसून येईल. विज्ञानकथालेखक केवळ हाताच्या बोटांवर मोजण्याइतके आणि प्रतिष्ठित साहित्यिकांमध्ये विज्ञानाबद्दल (आदर असला तरी) एक प्रकारची भीती दिसून येते. विज्ञान म्हणजे आपल्या आकलनापलीकडले असा बहुतेक साहित्यिकांचा ग्रह झालेला असल्याने ते आपली प्रतिभा विज्ञानाच्या दिशेने चालवायला धजत नाहीत. अनेकदा वाचक किंवा श्रोते देखील आपल्याला वैज्ञानिक तथ्ये समजणारच नाहीत असा ग्रह बाळगतात.

विज्ञान कथालेखकांची ही अवस्था तर विज्ञान समाजापर्यंत मनोरंजक पद्धतीने मांडण्याचे काम किती लोक करतात? सुदैवाने असे लेखन करणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. काही वृत्तपत्रात आठवड्याचा एक दिवस पानभर मजकूर विज्ञानाबद्दल असतो. काही नियतकालिकांत देखील विज्ञानविषयक माहिती सापडते. ‘सृष्टिज्ञान’ सारख्या नियतकालिकाने तर विज्ञानयुगाची चाहूल खूप आधीपासून ओळखली.

 

फलज्योतिषावर मंत्र्याची समर्थनपर भाषणे…समाजाच्या खालावलेल्या वैज्ञानिक पातळीची जाणीव!

तरी देखील अद्यापि समाजात विज्ञानाने पाय रोवलेले नाहीत याची पदोपदी जाणीव होते. खगोलशास्त्र आणि फलज्योतिष यांच्यातला मूलभूत फरक अजून तथाकथित सुशिक्षितांना देखील कळत नाही हे पाहून मन खिन्न होते. ‘तुम्ही फलज्योतिषाला विज्ञान म्हणत नाही याचे कारण तुमची मनोवृत्ती पूर्वग्रहदूषित आहे’ असा आरोप जेव्हा माझ्यासारख्या वैज्ञानिकावर केला जातो तेव्हा हसावे की रडावे हे कळत नाही. विज्ञानाची शाखा म्हणवून घेऊ इच्छिणाऱ्या विषयाला काही कसोट्यांवर उत्तीर्ण व्हावे लागते. त्या कसोट्या फलज्योतिषाला लावून पाहिल्यावर त्यांत तो विषय अनुत्तीर्ण ठरतो. हे अनेक प्रयोगान्ती अनेक वैज्ञानिकांनी सप्रमाण सिद्ध केले आहे. असे असून भारताच्या राजधानीत आंतरराष्ट्रीय मेळाव्यांत फलज्योतिषावर मंत्री लोक समर्थनपर भाषणे देतात यावरून आपल्या समाजाची वैज्ञानिक पातळी किती खालावली आहे याची जाणीव होते.

 

सर्वसामान्य माणसांची (अर्थात भारतातील) एक अशी गोड गैरसमजूत आहे की, आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञान हे आपल्या पूर्वजांना माहीत होते आणि ते वेदादी करून पुरातन वाङ्मयात समाविष्ट आहे. ह्या बाबतीत वस्तुस्थिती काय आहे ते थोडक्यात नमूद करतो.

जर पुरातन समाज वैज्ञानिकदृष्ट्या अतिप्रगत असेल तर त्याचे प्रतिबिंब पुरातन साहित्यात सापडायला पाहिजे. पुष्पक विमान, क्षेपणास्त्रे, दूरदृष्टी इत्यादींची उदाहरणे पुराणात सापडतात. परंतु ती गोष्टीरूपाने आहेत, ज्याला आपण गणितीय विज्ञान वाङ्मय म्हणतो त्या स्वरूपात नाहीत.

 

पुराण कथा लेखकांची कल्पनाशक्ति अचाट, पण…

हा फरक एका आधुनिक उदाहरणाने स्पष्ट करतो. अपोलो ११ ह्या अंतराळ स्वारीत मानवाने चंद्रावर जाऊन दाखविले. ह्या स्वारीचे सविस्तर वर्णन अनेक वृत्तपत्रांतून आणि नियतकालिकातून प्रसिद्ध झाले. अशीच चंद्रावरच्या स्वारीतील हकिगत जूल्स व्हर्नच्या लिखाणात सापडते. समजा, इतर कुठलीही माहिती उपलब्ध नसेल तर ह्या दोन स्वाऱ्यांपैकी वास्तविक कुठली आणि काल्पनिक कुठली ते सांगता येणार नाही. परंतु जर अधिक खोलात शिरलो तर आपल्याला अंतराळ तंत्रज्ञानाला वाहिलेले विज्ञान आणि गणिताच्या भाषेत लिहिलेले अनेक प्रबंध, अहवाल आणि अभिलेख सापडतील ज्यावरून अपोलो ११ चे यान कसे तयार केले, त्याची एकंदर यात्रा कशी आखली गेली, अंतराळवीरांना कुठल्या कुठल्या चाचण्यांतून जावे लागले वगैरे सर्व तांत्रिक माहिती मिळेल. ह्या दुसऱ्या प्रकारच्या माहितीवरून कुठल्याही तंत्रसमृद्ध संस्कृतीला तशी अंतराळयात्रा आखता येईल.

 

पुराणातील वर्णने फार तर पहिल्या प्रकारची आहेत, दुसऱ्या प्रकारची नाहीत. पुष्पक विमान तयार करायची नियमपुस्तिका (मॅन्युअल) अद्याप उपलब्ध नाही. वायव्यास्त्र, अग्नेयास्त्र वगैरे कसे बनवले जाते याची कृती महाभारतात सापडत नाही. सध्या उपलब्ध पौराणिक वाययातून केवळ इतकेच निदान करता येते की, ते लिहिणाऱ्यांची कल्पनाशक्ती अचाट होती. परंतु त्यापलीकडे जायला हवा असलेला पुरावा सध्यातरी उपलब्ध नाही.

 

हा पुरावा का उपलब्ध नाही? याचे कारण बरेच वेळा असे सांगण्यात येते की, आपल्या पूर्वजांनी ती माहिती सांकेतिक भाषेत लिहून ठेवली आहे किंवा ती माहिती नष्ट झाली. अर्थात अशी विधाने तपासून पाहता येत नसल्याने त्यांना वैज्ञानिक तपासणीत काही महत्व राहत नाही. तो केवळ ज्याच्या त्याच्या विश्वासाचा प्रश्न उरतो. तसेच असे विधान जर कोणी केले, जर पुराणात ही वर्णने आहेत तर ती कल्पनाशक्ती निर्माण व्हायला खरी वस्तुस्थिती तशी नसणार काय? तर त्या विधानाला उत्तर म्हणून असे म्हणता येईल. त्या विधानांप्रमाणेच ‘स्टार वॉर्स’ सारखे चित्रपट तशी संस्कृती पृथ्वीवर आहे असे सांगतात. वास्तविक हे चित्रपट पूर्णतः काल्पनिक असून त्यातील वैज्ञानिक भाग जवळ जवळ शून्य आहे.

 

महाभारत काळात आधुनिक सोयी नव्हत्या…

महाभारतीय युद्धांत एक घटना सांगितली आहे. गांधारीने दुर्योधनाला सांगितले की सकाळी अंघोळ करून मला भेटायला ये, पण पूर्ण नग्नावस्थेत. तिच्या डोळ्यातली शक्ती वापरून तिला दुर्योधनाला न्याहाळायचे होते. त्याचे सर्वांग अमर्त्य करायचे होते. त्याप्रमाणे तो येत असताना वाटेत श्रीकृष्ण भेटला. त्याने त्याची नग्नावस्था पाहून हेटाळणी केली. ‘वडीलमंडळींना भेटायला जाताना असा कसा जातोस’, असे म्हणून कृष्णाने, निदान लंगोट तरी घाल’ असे सुचवले.

तो गांधारीपुढे आला आणि तिने डोळ्यावरची पट्टी काढून त्याला न्याहाळले. फक्त लंगोटाने झाकलेला भाग सोडून बाकीचे शरीर मजबूत झाले. पण अखेर गदायुद्धात भीमाने त्याच भागावर गदा मारून दुर्योधनाला मारले.

जर हस्तिनापुरात निदान राजवाड्यात तरी बाथरूम, शॉवर इ. सोयी असत्या तर दुर्योधनाला वाटेत कृष्ण भेटला नसता! नळ, धावते पाणी आणि वीज यांची सोय नव्हती याचे हे उदाहरण नव्हे का? आधुनिक काळात आपण सुखसोयींमध्ये नळातून वाहते पाणी, विजेचे दिवे या गोष्टी आवश्यक समजतो.

 

विज्ञानकथा का लिहाव्यात?

विज्ञानकथा लिहिताना लेखकासमोर एक विशिष्ट हेतू असू शकेल. त्याला एखादी मनोवेधक वैज्ञानिक कल्पना वाचकांपर्यंत आणायची असेल; पण एखाद्या पाठ्यपुस्तकाच्या शैलीत नव्हे. उलट, ती कल्पना गोष्टीरूपाने मांडता आली तर वाचक ती सहजगत्या आत्मसात करू शकेल, अशी भावना लेखकाला प्रेरित करू शकेल. एखादी कडू गोळी गिळायला त्रास होतो; पण ती साखरेच्या आवरणात रंगीबेरंगी करून दिली तर सहजगत्या घशाखाली उतरते. हे उदाहरण देण्यामागे विज्ञानाला ‘कुरूप’, ‘कडू’ म्हणण्याचा उद्देश नाही, तर त्याकडे पाहण्याचा सामान्यांचा दृष्टिकोन कसा असतो, त्यावर भर देण्याचा आहे. शाळेत ज्या अनाकर्षक त-हेने गणित आणि विज्ञान हे विषय शिकवले जातात, त्यामुळे विज्ञानाबद्दल सामान्य जनमानसात एक प्रकारची भीती वा अनास्था निर्माण झाली आहे.

काही समीक्षकांच्या मते असा एखादा दृष्टिकोन पुढे ठेवून केलेले लिखाण म्हणजे चांगले साहित्य नव्हे. मी अशा समीक्षकांना विचारतो की, एका दृष्टिकोनातून लिहिलेल्या साहित्याला आपण साहित्य मानावयास तयार नसाल, तर मग तुलसीदासाचे ‘रामचरित मानस’ किंवा महाराष्ट्रातील संतवाङ्मय यांना काय म्हणणार आहात? या साहित्याला तुम्ही चांगले साहित्य म्हणणार नसाल, तर चांगल्या साहित्यासाठी तुमचे वेगळे मानदंड कोणते? पुढे जाऊन पूर्णपणे निर्हेतुक असे साहित्य असते का?

 

‘पंचतंत्र’ ह्या संस्कृत ग्रंथात नीतीने जगण्यास आवश्यक असे शिक्षण रोचक कथांच्या माध्यमातून दिले आहे. विष्णुशर्मा नावाच्या पंडिताने आपल्या काही नाठाळ शिष्यांना शहाणे करण्यासाठी ह्या उद्बोधक कथा सांगितल्या. हे विद्यार्थी सामान्य शालेय शिक्षणास अपात्र ठरले होते; पण ह्या कथामाध्यमातून बरेच काही शिकले. त्याचप्रमाणे विज्ञानाशी फटकून वागणारा सामान्य वाचक विज्ञानकथा माध्यमातून विज्ञानाशी जवळीक साधू शकेल.

 

अवास्तव वाटणाऱ्या वैज्ञानिक कल्पनेतून विज्ञानकथा!

फ्रेड हॉयेल ह्या सुप्रसिद्ध खगोलवैज्ञानिकाने विज्ञानकथा लिहायला सुरुवात केली त्यामागे एक वेगळेच कारण घडले! १९५०-६० च्या दशकात आरंभिक भागात हॉयेलना एक कल्पना सुचली. अंतराळात तारांदरम्यान असलेला विशाल प्रदेश हायड्रोजन अणूने व्याप्त आहे असा एक सर्वमान्य समज होता. हायड्रोजन अणूतील संक्रमणामुळे त्यातून २१ सेंटिमीटर लांबीच्या लहरी निघतात व अशा लहरी रेडिओ दुर्बिणीतून प्रत्यक्ष सापडल्या होत्या. त्यापलीकडे जाऊन हॉयेल यांनी असा तर्क उपस्थित केला की, ह्या प्रदेशात विविध रेणूंनी व्याप्त मेघपण आहेत. त्यामागची वैज्ञानिक बैठक मांडणारा संशोधनप्रबंध त्यांनी लिहिला; पण तो प्रसिद्ध करायला कोणी नियतकालिक तयार नव्हते.

 

कारण बहुतेक शास्त्रज्ञांना ही कल्पना अवास्तव वाटत होती. तेव्हा वैतागून हॉयेल यांनी ही कल्पना एका विज्ञानकथेत घातली व ती ‘द ब्लॅक क्लाऊड’ (कृष्णमेघ) ह्या कादंबरीच्या रूपाने प्रसिद्ध केली. ती कादंबरी कमालीची लोकप्रिय झाली. पुढे १९६० नंतर मिलिमीटर वेव्हलेंग्थच्या लहरींचे टेलिस्कोप प्रचारात आले आणि खगोलशास्त्रज्ञांना अंतराळात रेणूंचे मेघ सापडू लागले – कारण अशा रेणूंतून मिलिमीटरच्या आसपास लांबीच्या लहरी निघतात.

 

विज्ञानकथा आणि वास्तविकता फ्रेड हॉयेलचे उदाहरण अशा विरळ उदाहरणांपैकी आहे, जिथे विज्ञानकथा भविष्यदर्शी ठरली. एच. जी. वेल्स, आर्थर सी क्लार्क, रे बॅडबरी आणि आयझक अॅसीमॉव्ह यांची नावे विज्ञानकथांच्या संदर्भात घेण्यात येतात. कारण त्यांच्या लिखाणात भविष्यातील वास्तवतेचे द्रष्टेपण होते. एका वैज्ञानिक लेखात १९४५ मध्ये क्लार्क यांनी कल्पना मांडली, की पृथ्वीवरील विषुववृत्तावर सुमारे ३८५०० कि.मी. उंचीवर पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरणारा कृत्रिम उपग्रह विषुववृत्तावरून पाहताना डोक्यावर स्थिर असेल व त्याचा उपयोग दळणवळणासाठी करता येईल. आज जे ‘माहिती तंत्रज्ञाना’चे अफाट साम्राज्य पसरलेले दिसते, त्यामागे हीच कल्पना आहे. क्लार्कच्या कल्पनेनंतर तर २-३ दशकांत ही कल्पना वास्तविक प्रयोगात रूपांतरित झाली.

 

धुमकेतू कथेतील कल्पना पुढे प्रत्यक्षात आली…

याहून माफक स्तरावरचे माझे वैयक्तिक उदाहरण नमूद करतो. १९७६ मध्ये मी एक गोष्ट लिहिली होती (धूमकेतू), ज्यात पृथ्वीशी एका धूमकेतूची टक्कर होण्याची संभावना चर्चिली होती. वर्षभरात होणाऱ्या टकरीतून पृथ्वीला व पृथ्वीवासीयांना कसे वाचवायचे? जागतिक स्तरावर वैज्ञानिक एकत्र येऊन धुमकेतूवर अण्वस्त्र धाडायची कल्पना साकार करतात. हे अण्वस्त्र एका अंतराळयानातून धूमकेतूजवळ धाडले जाते व तेथे त्यातून अणुस्फोट घडवून आणला जातो. स्फोटामुळे धूमकेतूला धक्का बसून त्याची दिशा बदलते आणि पृथ्वीवरचे अरिष्ट टळते. त्यानंतर सुमारे १२-१३ वर्षांनी नासापुढे असा प्रश्न आला होता की, जर एखाद्या लघुग्रहांची किंवा धूमकेतूची टक्कर पुढे संभवत असेल तर त्या अरिष्टापासून पृथ्वीचे रक्षण कसे करावे? तेव्हा नासातील शास्त्रज्ञ-तंत्रज्ञ यांनी सुचवलेला उपाय वरील गोष्टीत वापरल्याबरहुकूम होता. इतकेच नव्हे तर काही वर्षांतच अमेरिकन शास्त्रज्ञांनी ‘स्पेसवॉच’ नावाचा प्रकल्प चालू केला, ज्यात सौरमालेतील छोट्या मोठ्या वस्तूंची (अशनी, लघुग्रह, धूमकेतू आदि) निरीक्षणे घेऊन त्यांच्या कक्षा ठरवण्यात येतात. उद्देश हा की, जर त्यापैकी एखादी वस्तू पुढेमागे केव्हातरी पृथ्वीवर आपटणार असेल तर त्या संकटाचे निवारण वेळीच करायला वरील मार्ग अवलंबिता येईल.

 

कोरोनात कर्मकांडे कुचकामी, वैज्ञानिक मार्गच उपाय देणारा!

गेले वर्षभर सगळ्या जगात कोविडच्या व्हायरसने थैमान घातले आणि बरेच नुकसान केले. एक प्रकारे आपण विज्ञानकथेत वर्णन केलेली स्थिती अनुभवत आहोत. वैज्ञानिक मार्गाने वैद्यकीय लस शोधणे हाच सर्वमान्य उपाय ठरला. कोणत्याही धर्माची कर्मकांडे, फलज्योतिष यांचा उपयोग झाला नाही.

 

उत्तम आणि निकृष्ट विज्ञानकथा कशा ओळखाव्यात?

या प्रश्नाचे उत्तर देताना आपल्याला विज्ञानकथेच्या दर्जाचे भान ठेवले पाहिजे. सर्वच विज्ञानकथा भविष्यद्रष्ट्या नसतात. उत्कृष्टतेचे वेगवेगळे निकष लावले तर फारच कमी कथा त्यात उतरतील. आपण अशा काही निकषांवर दृष्टिक्षेप टाकू या.

 

उत्तम विज्ञानकथेच्या गाभ्यात जे काही विज्ञान असते, ते सध्याच्या माहितीप्रमाणे बिनचूक तर असतेच; पण भविष्यात ते कुठे गेलेले असेल याची पण माहिती देणारे असते. अर्थात हे भविष्याचे आडाखे बिनचूक असतीलच असे नाही. पण ते सध्याच्या माहितीशी विसंगत नसावे. हे आडाखे कितपत बिनचूक होते, ते भविष्यकाळ वर्तमानात पोचला की ठरवेलच.

 

माझ्या लेखी विज्ञानकथेची क्षमता विज्ञान आणि समाज यांच्यातील परस्परसंबंधांवर ती किती भाष्य करते यावरदेखील अवलंबून असावी. आज असे अनेक वैज्ञानिक विषय आहेत. स्टेम सेल संशोधन, उपग्रहांतून टेहळणी, क्लोनिंग, अणुइंधनाचा वापर/ गैरवापर इत्यादी. त्यांचा समाजाशी घनिष्ट संबंध असतो. भविष्यातील चित्रे रेखाटताना विज्ञानकथाकार समाजाला काही वैज्ञानिक संशोधनातून उद्भवणाऱ्या धोक्यांपासून सावध करू शकतो. मी १९७५-७७ दरम्यान ‘पुत्रवती भव’ ही गोष्ट लिहिली होती. त्या गोष्टीत गर्भाचे लिंग ठरवता येण्याची क्षमता मिळाली तर काय गोंधळ उडेल याचे वर्णन केले होते. गर्भलिंग निदानामुळे तशीच परिस्थिती उद्भवलेली आपण पाहतो. गर्भ कन्येचा असल्यास तो पाडण्याचे क्रूर काम होऊ नये म्हणून कायदा करावा लागला

 

‘स्टार वॉर्स’ सारख्या फिल्म्स वैज्ञानिक नाही, सामान्य ‘वेस्टर्न’ फिल्म!

आपले दैनंदिन व्यवहार मिनिट-तास-दिवस-महिना-वर्ष अशा कालमापकांवर चालतात; पण विश्वातील घटना याहून दीर्घ कालावधीच्या असतात. विज्ञानकथांद्वारे हे फरक व्यक्त करता येतील. माझ्या एका गोष्टीत (अंतराळातील स्फोट) एक सुपरनोवा म्हणजे स्फोट होणारा तारा दाखवला आहे. स्फोटानंतर त्यातील बहिर्भागातील कण पृथ्वीपर्यंत पोचायला तीन सहस्रके लागू शकतात. वैश्विक कालमापनात सुपरनोवा ‘क्षणभंगुर’ असला तरी स्फोटाच्या घटनेमध्ये मानवाचे दीर्घ कालखंड मावतात, हे त्या गोष्टीतून स्पष्ट होते.

 

आता थोडक्यात, निकृष्ट दर्जाच्या विज्ञानकथा कशा असतात ते पाहू. विज्ञानकथेतले विज्ञान आजच्या विज्ञानाच्या कांकणभर पुढेच गेले असले तरी चालते, हे आधीच मान्य केले आहे; पण असे ‘पुढे’ गेलेले विज्ञान गोष्टीच्या कथानकात चर्चिले गेले असावे. म्हणजे ह्या ‘नव्या’ विज्ञानाची पार्श्वभूमी लेखकाच्या दृष्टिकोनातून वाचकांपर्यंत पोचते; पण पुष्कळ विज्ञानकथात विज्ञानाचे मूळ नियम कारण न देता हवे तसे बदलण्यात येतात. अशा प्रकारचे एक उदाहरण पहा

 

एका अमेरिकन विज्ञानकादंबरीत अंतराळयाने काही वर्षांत आपल्या आकाशगंगेच्या एका टोकाकडून दसऱ्या टोकापर्यंत जाताना दाखवली आहेत. भौतिकशास्त्राच्या सापेक्षतावाद सिध्दान्ताप्रमाणे जगात जास्तीत जास्त वेगाने धावू शकतो तो प्रकाश. प्रकाशकिरणे आकाशगंगेच्या चकतीवजा आकाराला त्याच्या व्यासाइतके अंतर ओलांडायला एक लाख वर्षे घेतात! याचा अर्थ विज्ञानकथेतील याने प्रकाशाच्या हजार-दहा हजार पटीने अधिक वेगाने धावू शकतात. इतकी वेगवान याने बनवण्याचे तंत्रज्ञान कोणते? त्यांना सापेक्षतेचा वरील नियम मोडणे शक्य कसे झाले, त्यातून प्रवास करणाऱ्या लोकांच्या शरीरधर्मावर इतक्या वेगाचा काय परिणाम होतो, इत्यादी प्रश्नांना लेखकाने पूर्णपणे बगल दिली आहे. अशी ही गोष्ट वाचताना आपण विज्ञानकथा न वाचता परीकथा वाचतोय असे वाटते. परीकथेत एखादी परी राजपुत्राला जादूचे बूट देते, जे घालून तो क्षणार्धात कितीही लांब जाऊ शकतो.

 

याच कारणास्तव मला ‘स्टार वॉर्स’ सारख्या फिल्म्सना विज्ञानकथाधारित म्हणावेसे वाटत नाही. त्यातील अंतराळयाने, विचित्र जीवजंतू, महाभयंकर शस्त्रास्त्रे यांचा मुलामा काढला तर राहते ती सामान्य ‘वेस्टर्न’ फिल्म!

 

निकृष्ट विज्ञानकथा वास्तवात भयकथा!

काही निकृष्ट विज्ञानकथा वास्तवात भयकथा असतात. अशा कथा खरोखर विज्ञानकथावृक्षाला मारकच म्हटल्या पाहिजेत. कारण त्या वाचताना विज्ञान एक अनाकलनीय पण भीतीदायक विषय आहे असे वाचकाला वाटते. वास्तवातल्या जगात संहारक शस्त्रास्त्रे आहेत. त्यांच्यापासून मानवतेला असलेला धोका स्पष्ट करणारी उत्तम विज्ञानकथा असू शकते. तशा अनेक कथा-कादंबऱ्या आहेत; पण अशांच्या कथानकात तर्कशून्य भीतीला वाव नसतो. तसेच काही भुताखेतांच्या भयकथातून अंधविश्वासांना खतपाणी घातले जाते.

 

अंतराळयुगातल्या अंधविश्वासांना खतपाणी घालणाऱ्याही काही कथा असतात. ‘बर्मुडा त्रिकोण’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या भूप्रदेशात अनाकलनीय असे काही घडत नाही, हे सप्रमाण सिद्ध झाले आहे; तरी इथे काहीतरी गूढ शक्ती आहे किंवा इथे परकीय जीव पृथ्वीवर ढवळाढवळ करण्यासाठी लपून बसले आहेत, अशा कथानकांचा सुळसुळाट दिसतो. त्यात भर पडते उडत्या तबकड्यांची. अशा यानातून परकीय जीव येऊन पृथीवर लहानमोठी संकटे आणतात ही भावना कुठलाही पुरावा नसताना जनमानसात घर करून राहिली आहे. तिला दुजोरा देण्याचे काम अशा विज्ञानकथा करतात.

 

विज्ञानकथेतही साहित्यिक गुण आवश्यक!

शेवटी आणखी एक मुद्दा! एखादी विज्ञानकथा व कादंबरी उत्तम वैज्ञानिक कल्पनेवर आधारित असूनही साहित्यिक गुणांच्या अभावामुळे (वाईट लेखनशैली, अपूर्ण स्वभावचित्र इत्यादी) निकृष्ट ठरेल. त्याउलट, विज्ञानात नापास झालेली कादंबरी साहित्यिक गुणांमुळे वाचनीय वाटेल. अशा स्थितीतही विज्ञानकथेचे निकष लावल्यास मी पहिल्या रचनेला दुसरीपेक्षा अव्वल स्थान देईन. (ऐतिहासिक कादंबऱ्यांच्या बाबतीतही मी असेच परीक्षण करेन. जरी साहित्यरचना म्हणून एखादी कादंबरी गाजली असेल, पण तिने इतिहासाशी प्रतारणा केली असेल तर ऐतिहासिक कादंबरी म्हणून तिला कमी लेखले पाहिजे.) थोडक्यात, आपण जेव्हा विज्ञानसाहित्याचे मूल्यमापन करतो तेव्हा ज्या विज्ञानावर ते आधारलेले आहे ते पण तपासले पाहिजे.

 

विज्ञानकथा लेखनाच्या शुभारंभाची गोष्ट…

विज्ञानकथा आणि मी तो दिवस मला चांगला आठवतो, जेव्हा मला विज्ञानकथा लिहिण्याची ऊर्मी आली. १९७४ साली अहमदाबाद येथे एक परिसंवाद होता. एका नामवंत वैज्ञानिक संस्थेने त्या परिसंवादाचे आयोजन केले होते. परिसंवादातील वक्ता श्रोत्यांना झोप आणण्याचे काम चोख बजावत होता. अगदी थोडे श्रोते व्याख्यान ऐकण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होते. मी मात्र त्या व्याख्यानाचा नाद केव्हाच सोडून दिला होता. पण मग वेळ कसा घालवायचा?

नेमक्या अशाच एका क्षणी मला असे वाटले, आता आपण कथालेखन का सुरू करू नये? परिसंवादाच्या संयोजकांनी पुरविलेले कागद मी पुढे ओढले आणि लिहिण्यास सुरुवात केली. त्यावेळी वक्त्याचा गोड गैरसमज झाला असेल की मी त्याच्या लेक्चरच्या नोट्स उतरवत आहे.

 

‘कृष्णविवर’ ही कथा प्रकाशात आली ती अशी. विज्ञानकथा लिहिण्याचा तो माझा पहिलाच प्रयत्न होता. ही कथा मी मराठीत लिहिली. मराठी विज्ञान परिषद, मुंबई या संस्थेने आयोजित केलेल्या विज्ञानकथा स्पर्धेसाठी कथा पाठवावी, असा विचार माझ्या मनात घोळत होता.

 

पहिली पुरस्कारप्राप्त कथा…टोपण नावाने!

स्पर्धेच्या संयोजकांनी कथेच्या लांबीबद्दल, शब्दसंख्येबद्द्ल ज्या अटी घातल्या होत्या, त्यामध्ये माझी ही कथा बसत होती. मी प्रवेशपत्रिका भरली ती मात्र कचरतच. ‘नारायण विनायक जगताप’ या नावाने मी प्रवेशपत्रिका भरली. मी धारण केलेल्या नावाची आद्याक्षरे माझ्या खऱ्या नावाच्या आद्याक्षरांच्या बरोबर उलट्या क्रमाने होती. मराठी विज्ञान परिषदेचे पदाधिकारी माझे नावच काय तर हस्ताक्षर ओळखतील, अशी भीती वाटल्याने मी ती कथा माझ्या पत्नीस लिहून काढण्यास सांगितली व स्पर्धेसाठी एका वेगळ्या पत्त्यावरून पाठवून दिली.

 

माझ्या त्या कथेला प्रथम पारितोषिक मिळाले हे जेव्हा मला समजले तेव्हा मला सुखद धक्का बसला. मी विज्ञानकथा लिहू शकतो, याचे समाधान झाल्यामुळे मी त्यापुढे आणखी कथालेखन करण्याचा विचार फार गांभीर्याने न करता तेथेच थांबणार होतो. पण मला अनपेक्षित अशी एक घटना घडली.

 

श्रीमती दुर्गाबाई भागवत यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आपल्या अध्यक्षीय भाषणातून माझ्या लिखाणाचा गौरव केला. पुढे तर श्री. मुकुंदराव किर्लोस्कर यांनी भविष्यवाणी केली की, पुढे-मागे मी मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थान भूषवीन.

 

महान व्यक्तींनी खास प्रसंगी केलेल्या वक्तव्यामुळे नवे प्रवाह निर्माण होण्यास मदत होते. मग विज्ञानकथा यापासून अलिप्त कशी राहील?

त्या संमेलनानंतर विज्ञानकथा हे मराठी साहित्याचे एक अंग बनले. विज्ञानकथा हवीच, असे नियतकालिकांच्या संपादकांना वाटू लागले. दिवाळी अंकाचे संपादक विज्ञानकथेसाठी विचारणा करू लागले. दररोज अनेक पत्रे येऊ लागली. हे सर्वच मला सर्वस्वी अनपेक्षित होते.

याबाबत एक मुद्दा स्पष्ट करणे मला आवश्यक वाटते. मी विज्ञानकथा लिहिण्यापूर्वी मराठीमध्ये विज्ञानकथा लिहिल्या गेल्या आहेत. अगदी १९१५ मध्ये ‘मनोरंजन’ मासिकात श्रीधर बाळकृष्ण रानडे यांची विज्ञानकथा प्रकाशित झाली होती. त्यानंतर त्या शतकाच्या पाचव्या आणि सहाव्या दशकात बरेच विज्ञानकथाकार तयार झाले. काहींनी स्वतःचे साहित्य निर्माण केले, तर काहींनी भाषांतरे केली होती. द.पां. खांबेटे, नारायण धारप, भा.रा. भागवत ही काही यातील नावे आहेत. सर्वच लेखकांची नावे मी देऊ शकत नाही. पण मराठीत विज्ञानकथेच्या उगमाबाबतची वस्तुस्थिती स्पष्ट केली आहे, असे मला वाटते.

 

विज्ञानकथा लिहिण्यास मी का प्रवृत्त झालो?

मला असे वाटते, मी खगोलशास्त्राचा विद्यार्थी असल्याने सत्य काय आहे आणि कथा-कादंबऱ्यांमध्ये काय सांगितले जाते याची मला जाणीव आहे. पृथ्वीवरचे आपले अस्तित्व ध्यानात घेतले तर हे समजते की, माणूस इवलासा आहे आणि त्याभोवतीचे विश्व अफाट आहे. हे सारे विश्व समजून घेणे तसे खूप अवघड आहे. आपण समजतो, त्यापेक्षा हे विश्व अधिक गूढ आहे. इतकेच काय आम्ही समजू शकू, त्यापेक्षाही ते अधिक गूढ आहे. असे जे.बी.एस. हॉल्डेन म्हणतो.

जे स्वत: शास्त्रज्ञ आहेत आणि विज्ञानकथा लिहितात, त्यांना एक फायदा मात्र नेहमी होतो. एखाद्या वैज्ञानिक प्रश्नाविषयी त्यांना जे वाटते, ते आपल्या कथेमध्ये अधिक प्रभावीपणे सांगू शकतात. असे करण्याची मुभा त्यांना या विषयासंबंधीचा शोधनिबंध प्रसिद्ध करताना नसते. शोधनिबंधात तथ्यांवर भर दिला जातो व अटकळींना दुय्यम स्थान असते.

 

मी विज्ञानकथा का लिहितो?

दररोजच्या संशोधनाच्या कामातून विरंगुळा मिळावा म्हणून. सामान्य वाचकाला वैज्ञानिक विश्वातील एखादा थरारक अनुभव द्यावा म्हणून. विज्ञानाचे महत्व आणि वैज्ञानिक दृष्टिकोन समाजाला मिळावा यासाठी.

 

कथांमध्ये इंग्रजी का?

काही समीक्षक अशी तक्रार करतात की, माझ्या कथेतील पात्रे खूपदा इंग्रजी शब्दांचा वापर करतात. या समीक्षकांना माझे उत्तर असे की, इंग्रजी शब्दाचा उच्चार न करता त्यांनी दिवसभर मराठी बोलून दाखवावे. त्यांना कळेल की, काही इंग्रजी शब्द हे दैनंदिन जीवनात अगदी रूढ झाले आहेत. इतर भाषांतील शब्द आपल्या भाषेत आल्यामुळे भाषा विकसित होते, समृद्ध होते असे मला सुचवायचे आहे. आज शुद्ध समजले जाणारे बरेच शब्द कधीकाळी बाहेरूनच आले होते, हे विसरून चालणार नाही.

 

इंग्रजी भाषा विज्ञानाची भाषा म्हणून मान्यता पावलेली भाषा आहे. जगभर ती वापरली जाते आणि म्हणून टी.व्ही., टेलिफोन, फॅक्स, रडार, रॉकेट हे इंग्रजी शब्द कथांमधून वापरले जाणे स्वाभाविक आहे. तज्ज्ञ लोकांच्या समित्या या इंग्रजी शब्दांचे कृत्रिम मराठी भाषांतर देऊ शकतील. पण सामान्य वाचक जर अशा शब्दांना स्वीकारू इच्छित असेल, तर ते शब्द वापरण्यावर बंदी का असावी?

 

मूळ कथा न वाचताच समीक्षकी टीका!

माझ्या धूमकेतूवरील कथेवर टीका करताना एका समीक्षकाने गंमतच केली! त्याच्या मते – ती कथा फ्रेड हॉयेल यांच्या ऑक्टोबर द फर्स्ट इज टू लेट’ या कादंबरीची नक्कल आहे. या टीकेने चकित होऊन मी हॉयेल यांची मूळ कादंबरी लक्षपूर्वक वाचली. माझे कथानक आणि हॉयेलची वैज्ञानिक कल्पना याबाबत कोठे साम्य आहे का, हे तपासून पहिले. माझी कथा आणि फ्रेड हॉयेल यांची कादंबरी यामध्ये एकच साम्य होते, ते म्हणजे ऑक्टोबरची पहिली तारीख October the first!

 

त्या समीक्षकाला भेटण्याचा योग आला. मी त्याला विचारले, ‘आपण फ्रेड हॉयेल यांची मूळ कादंबरी वाचली आहे काय? वाचली असल्यास मी माझ्या कथेचे कथानक त्या कादंबरीतून घेतले हे कशावरून ते आपण सांगू शकाल काय?’ त्यांनी हे मान्य केले की, कादंबरी त्यांनी वाचलीच नव्हती. कादंबरीच्या नावावरूनच त्यांनी असा तर्क केला होता!

 

समीक्षणात अशा प्रकारच्या खूप चुका होत गेल्या आहेत. त्यातून विनोदही निर्माण झाला आहे. एका विद्वानाने विज्ञानकथा या विषयावर प्रबंध लिहिला. या प्रबंधाला एका विद्यापीठाने डॉक्टरेटही बहाल केली. या विद्वानाने पूर्वीच्या समीक्षकांसारखीच चूक केली आहे. मूळ लिखाण वाचण्याचे कष्ट न घेता, ‘भारतीय विज्ञानकथा लेखक इंग्रजी विज्ञानकथांमधून कथानक उचलतात!’ असे ठोकून दिले आहे. याचे त्यांनी दिलेले उदाहरण पहा.

 

कॉनन डॉयलच्या शेरलॉक होम्स कथांचा मी खूप चाहता आहे. गंमत म्हणून मी एक प्रयोग केला. होम्स आणि वॉटसन यांना पात्रे म्हणून घेऊन मी विज्ञानकथा लिहिली. मराठी धर्तीवर कथा लिहिताना शैली मात्र कॉनन डॉयलची राहील याची काळजी मी घेतली. अनेक वाचकांना वाटले, मी हे भाषांतरच केले आहे. काही वाचकांनी पत्रे पाठवून मूळ कथेबाबत विचारणादेखील केली.

 

आमच्या समीक्षक विद्वानाने तर कमालच केली. इतर वाचकांपेक्षा त्यांनी एक पाऊल पुढेच टाकले. ती माझी कथा कॉनन डॉयलच्या ‘ओपल टियारा’ या कथेवरून मी घेतली आहे असे जाहीर केले. कॉनन डॉयल यांनी या नावाची कथाच लिहिलेली नसताना त्यांनी हा शोध कसा लावला, हे त्यांनाच ठाऊक. माझी कथा स्पेशल रिलेटिव्हिटी या तत्त्वावर बेतलेली आहे. कॉनन डॉयल तर या विषयावर काहीच लिखाण करू शकला नसता. कारण त्याकाळी आइन्स्टाइनचा सापेक्षतेचा सिध्दान्त प्रचारात नव्हता आणि पुढे देखील हा विषय फार निवडक शास्त्रज्ञांनाच समजत असे.

 

मी वूडहाऊस यांचासुद्धा खूप चाहता आहे. एक कथा मी वूडहाऊस यांच्या शैलीत सादर केली. अनेकांची येथेसुद्धा फसगत झाली. वूडहाऊस यांच्या ‘बर्टी बुस्टर’ व ‘जीव्ज’च्या एका कथेचेच मी भाषांतर केले आहे, असे अनेकांना वाटले. अनेकांनी पूर्वीप्रमाणेच मूळ कथानकाबाबत विचारणादेखील केली. वूडहाऊस यांनी अशी कथाच लिहिलेली नाही, हे समजल्यावर त्यांनी माझ्या प्रयत्नांची प्रशंसा केली.

 

विज्ञानकथा लिखाण हा माझा विरंगुळा!

काहीजण विचारतात, तुम्हाला विज्ञानकथा लिहायला वेळ कसा मिळतो? विचारणाऱ्याचा सूर असा असतो की, “संशोधनाचे काम सोडून तुम्ही हे काय करीत आहात?’ माझे त्यांना सांगणे आहे की, विज्ञानकथा लिखाण हा माझा विरंगुळा आहे.

विज्ञानकथा लिहिण्यासाठी वेळ कसा मिळवायचा, हा देखील एक मुद्दा आहेच. दिवसाच्या चोवीस तासांतील प्रमुख वेळ आपल्या नोकरीच्या किंवा व्यवसायाच्या कामासाठी द्यावा लागतो. शिवाय झोप आणि जेवण्यासाठी व इतर आवश्यक गोष्टींसाठी वेळ देणे आवश्यक आहे. त्यातून थोडा वेळ मिळतो, तो मात्र आपण तसाच घालवतो.

 

लहान कामे, मोठी कामे आणि वेळेचे नियोजन!

एका व्यवस्थापन विषयावरील व्याख्यानाची सुरुवात करताना अध्यापकाने बरोबर आणलेल्या बादलीत मोठे दगडधोंडे भरायला सुरुवात केली. जेव्हा आता जास्त दगड मावत नाहीत हे त्याच्या लक्षात आले; तेव्हा त्याने क्लासला विचारले, ‘काय, बादली भरली?’ क्लास उत्तरला, ‘होय’. तेव्हा अध्यापक उत्तरला, ‘चूक!’ आणि त्याने बरोबर आणलेली वाळू बादलीत ओतली. त्याने विचारले, ‘काय, बादली भरली?’ ‘नाही.’ क्लास उत्तरला. बरोबर,’ असे म्हणून त्याने बादलीत पाणी ओतून दाखवले. यातून काय बोध घ्यायचा?’ त्याने विचारले. क्लास म्हणाला, ‘तुमची मोठी कामे उरकली की, त्या दरम्यान असलेला मोकळा वेळ लहान कामासाठी वापरावा.’ पुढे अध्यापकाने दुसऱ्या बादलीत आधी वाळू आणि पाणी भरले, तेव्हा त्यात दगडधोंड्यासाठी जागा राहिली नाही! तात्पर्य, तुमची लहान कामे उरकण्यात वेळ गेला, तर मोठी कामे करणार कधी? तेव्हा वेळेचे नियोजन महत्वाचे!

 

कधी कधी असेपण होते. आपण विमानतळावर बसलेलो असतो आणि जाहीर करण्यात येते की, विमान सुटावयास दोन तासांचा उशीर आहे. यावेळी त्रागा करून घेऊ नका. माझा सल्ला आठवा. वही समोर ओढा आणि लिहायला लागा.

आपणही विज्ञानकथा लिहू शकाल…


Tags: Dr Jayant Naralikarmarathimarathi litrature festnasikडॉ.जयंत नारळीकरनाशिकमराठीसाहित्य संमेलन
Previous Post

शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम आठ दिवसात जमा न करणाऱ्या विमा कंपन्यांवर गुन्हे!

Next Post

राज्यात ६६४ नवे रुग्ण, ९१५ रुग्ण बरे होऊन घरी! ओमायक्रॉन सर्वेक्षणात ३० नमुने जनुकीय तपासणीसाठी!

Next Post
MCR 4-8-21

राज्यात ६६४ नवे रुग्ण, ९१५ रुग्ण बरे होऊन घरी! ओमायक्रॉन सर्वेक्षणात ३० नमुने जनुकीय तपासणीसाठी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!