मुक्तपीठ टीम
मराठा आरक्षण मुद्दयावरून राज्यातील राजकारण तापलं आहे. दरम्यान आज सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारने पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली आहे, अशी माहिती संभाजी छत्रपती यांनी ट्विट करून दिली आहे.
संभाजी छत्रपती यांनी ट्विट करत सांगितले की, “मराठा आरक्षण बाबत आम्ही शासनाकडे पुनर्विचार याचिका दाखल करण्याची केलेली प्रमुख मागणी मान्य करण्यात आली असून, आज सर्वोच्च न्यायालयात राज्य शासनातर्फे ही याचिका दाखल करण्यात आली.”
पुढे ते म्हणाले “माझ्या मागणीनुसार या याचिकेमध्ये गायकवाड आयोगाच्या अहवालातील उर्वरीत परिशिष्टे देखील भाषांतरीत करण्यात येतील, असे नमूद केले आहे.”
#मराठा_आरक्षण बाबत आम्ही शासनाकडे पुनर्विचार याचिका दाखल करण्याची प्रमुख मागणी मान्य करण्यात आली असून, आज सर्वोच्च न्यायालयात राज्य शासनातर्फे ही याचिका दाखल करण्यात आली.
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) June 22, 2021
मराठा समाजातील निवडक लोकांची एक समिती नेमून त्याच्या माध्यमातून अन्य मागण्या तातडीने सोडविण्याची ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी संभाजी छत्रपती आणि सकल मराठा समाजाला दिली होती. संभाजी छत्रपतींनी मराठा संघटनांसोबत राज्यभरात मराठा मूक आंदोलन आयोजित केलं होतं. कोल्हापूर आणि नाशिकमध्ये मूक आंदोलन यशस्वीरित्या पार पडलं. कोल्हापुरातील मूक आंदोलनानंतर मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात बैठक घेतली. त्यावेळी झालेल्या बैठकीत सरकार मराठा समाजाच्या सहा मागण्यांवर सकारात्मक असल्याची माहिती संभाजी छत्रपतींनी दिली होती.