मुक्तपीठ टीम
मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजी छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळपासून कोल्हापुरात मूक आंदोलन सुरु झाले आहे. मराठा आरक्षण कायदा रद्द झाल्यापासून संभाजी छत्रपती आक्रमक झाले आहेत. त्यांनी रायगडावरून आंदोलनाची हाक दिली. त्यांनी जाहीर केल्याप्रमाणे कोल्हापुरातील शाहू समाधी स्थळाच्या ठिकाणी पहिले आंदोलन झाले. कोल्हापुरात आज जोरदार पाऊस पडतोय. कोरोना नियमांचे पालन करत भर पावसात शिस्त आणि संयमाचं दर्शन घडत आहे.
आज सकाळी दहा वाजता आंदोलनाला सुरूवात झाली आहे. दुपारी एक वाजेपर्यंत हे आंदोलन चालणार आहे. मूक आंदोलनात लोकप्रतिनिधी भूमिका मांडणार आहे. संभाजी छत्रपतींनी शाहू महाराजांच्या समाधीस्थळी येऊन दर्शन घेतलं. आंदोलनाला सुरूवात झाल्यानंतर प्रारंभी संभाजीराजे यांनी उपस्थिती समुदायाला आवाहन केलं.
“आजचं आंदोलन मूक असून, फक्त लोकप्रतिनिधीच बोलतील. उपस्थितांपैकी कुणीही लोकप्रतिनिधींना उलट सवाल करू नये. लोकप्रतिनिधींना त्यांची भूमिका मांडू द्या. त्यांचं ऐकून घ्या,” असं आवाहन संभाजी छत्रपतींनी केलं. त्यानंतर लोकप्रतिनिधींनी आपली भूमिका मांडण्यास सुरूवात केली. यावेळी सर्व आंदोलकांनी सरकारचा निषेध करण्यासाठी काळे कपडे काळा पोशाख परिधान केला आहे. तसेच आंदोलकांच्या हातात भगवे झेंडे आहे.
दरम्यान, आंदोलनाला सुरुवात होण्याआधी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील कोल्हापूरातील आंदोलनस्थळी दाखल झाले. आंदोलनस्थळी प्रकाश आंबेडकर आणि चंद्रकांत पाटील यांनी संभाजीराजे यांची भेट घेतली. काँग्रेस नेते आणि पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, शिवसेना खासदार धैर्यशील माने, खासदार संजय मंडलिक यासारख्या सर्व आमदार-खासदारांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.