मुक्तपीठ टीम
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मराठा समाजाला इतर कोणाचेही काढून आरक्षण नको, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे ५० टक्क्यांच्या मर्यादेतील सुरक्षित आरक्षणासाठी ते ओबीसी प्रवर्गातून मिळण्यासाठी लढणाऱ्या मराठा आंदोलकांनी संताप व्यक्त केला आहे. “कुणाचे काढून मराठा समाजाला नको” असे त्या बोलत आहेत. पण मराठा समाज कुणाचे काढायला सांगत नसून हक्काचे गायकवाड वर्गाने शिफारस केलेले ओबीसी प्रवर्गातील आरक्षण मागत असल्याने त्यांचे वक्तव्य हे चुकीचे असल्याचं मत मराठा आंदोलकांनी व्यक्त केले असून त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना त्यांच्या आजवरच्या भूमिकांची आठवण करून देणारे खुलं पत्र लिहिलं आहे.
मराठा आंदोलकांनी शरद पवारांना लिहिलेलं पत्र
माननीय शरदचंद्र पवार साहेब,
विषय:- मराठ्यांना ओबीसी मधूनच आरक्षण मिळाले पाहिजे, तसेच आपण मुख्यमंत्री असताना काढलेल्या, 23 मार्च 1994 च्या ‘जी आर’ ची श्वेत पत्रिका काढणे बाबत.
परम आदरणीय
आम्ही आपल्याला केवळ मराठ्यांचे नेता आहात असे मानत नाही. तुमच्या राजकारणाचा इतिहास अभ्यासल्यास जाहीर रित्या आपण एकदाही मराठा समाजाची बाजू घेतलेली नाही. परंतु महाराष्ट्रातील नव सरंजामदार असलेल्या काही मराठा घरण्यांना जवळ करत राहिल्याने, जास्तीत जास्त मराठ्यांना असे वाटत असे की तुम्ही आज ना उद्या आमचे भले करणार. तुम्ही आमच्या जातीचे आहात केवळ या एकाच गोष्टीचा अभिमान आम्ही बाळगला. तुमचे कारखानदार, बँकर, गुत्तेदार मार्गे तयार झालेले आमदार, खासदार आणि नातेवाईक आम्हाला या आशेच्या मृगजळ मधून बाहेरच येऊ देत नसत. त्यामुळे आमच्यासाठी प्रत्यक्ष काहीही न करता तुम्ही मराठा समाजाचे सर्वात जवळचे नेता होता.
असो, आपण जुलै, 1978 मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री बनला. आपल्या राज्यारोहनानंतर केवळ चारच वर्षा मध्ये मराठ्यांचे क्रांतिसूर्य अण्णासाहेब पाटील यांना बलिदान द्यावे लागले. गरीब मराठ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे ही प्रमुख मागणी त्यांची होती.
मंडल आयोग आला त्यावेळी तुम्ही अत्यंत अभ्यासू आणि शक्तिशाली नेता म्हणून उदयाला आले होते. तेंव्हा तुम्ही मराठा समाजाचा समावेश ओबीसी आरक्षण मध्ये व्हावा यासाठी नेमके काय केले? एखादे निवेदन अथवा आंदोलन केले का? मंडल चे महत्व कमंडल वाल्यांपेक्षा तुम्हाला जास्त माहिती होते. आम्हा गरीब, विस्थापित मराठ्यांच्या येणाऱ्या पिढ्या त्या आरक्षणाचा लाभ घेऊनच सुरक्षित राहतील असे आपल्याला वाटले नाही?
तेही सोडा, मंडल आयोग लागू झाला. इंद्रा साहनी निकालाने ते कायदेशीर आरक्षण कसे बसे टिकले. पण पुन्हा आपण पायापूर्ते पाहिले. 23 मार्च 1994 चा जी आर काढला आणि आमच्या शव पेटीवर अंतिम खीळा ठोकला. अहो साहेब मंडल ने राज्यात ओबीसींना सर्व जातींना मिळून केवळ 14% च आरक्षण दिले होते. ते थेट 16% नी वाढवून आपण 30% केले. तिथेच आपण मोठी चूक केली असे आज आम्हा मराठा तरुणांना वाटते. ती चूक आपण आपल्या बारामती चे राजकारण सुरक्षित करण्यासाठी केले असेलही. पण आम्ही मराठे पुरते भरडून निघालो.
साहेब तुमच्या त्या एका निर्णयामुळे मराठा समाजाचे आरक्षणाचे दरवाजे बंद केले गेले. ओबीसी नेते आणि मराठा नेते सर्वांनी मिळून नंतर एक नवी मांडणी पुढे आणली. ती अशी की, आता 50% ची मर्यादा पूर्ण झाली (13% SC+07% ST + 30% OBC = 50%) आता यापुढे कोणालाही आम्ही ओबीसी आरक्षण मध्ये येऊ देणार नाही. नंतर 2% एक्स्टरा आरक्षण SBC दिले गेले. किरकोळ अपवाद असतीलही.
पण मराठा समाजाला वेगळे आरक्षण पाहिजे असे काही लोक बोलू लागले. आणि त्यातच घात होत राहिला. 50% च्या वरचे आरक्षण टिकत नाही. 2014 चे आणि 2018 चे दोन्ही अनुभव समोर आहेत. हे अजमावून घेण्यासाठी आम्हाला पुन्हा 48 बांधव गमवावे लागले.
आता साहेब आमच्याही नाका तोंडात पाणी गेले. पिपा मधल्या माकडीनी प्रमाणे आम्ही सुद्धा आपल्याला खांद्यावरचे किंवा डोक्यावरचे पायाखाली घेण्याचा विचार करत आहोत. वेळीच चूक सुधारणा करण्यासाठी पुढाकार घ्या. आमच्या ओबीसी मधल्या आरक्षणाचा मूळ वाटा आम्हाला परत मिळवून देण्यासाठी सहकार्य करा. त्याचे मार्ग तुम्हाला आम्ही सांगण्याची गरज नाही. ते झाले तर आम्ही आपली हत्ती वरून मिरवणूक काढू.
जर का आमच्या ओबीसी समावेश करण्याला विरोधी पक्षाने विरोध केला. तर त्यांची तिरडी उचलण्याची जबाबदारी आम्ही घेऊ. त्यामुळे तुम्ही संकोच न बाळगता निर्णय घ्या. समाज सोबत राहील. निर्णय नाही घेतला तर तुमच्या पिढ्या सुखाने खाऊ शकणार नाहीत. तुम्ही आमच्या पिढ्या बरबाद केल्या आम्ही तुमच्या कश्या सोडून देऊ?
कळावे आपला
सकल मराठा समाज
मराठा क्रांती मोर्चा
मराठा क्रांती ठोक मोर्चा
योगेश केदार 9823620666
प्रतापसिंह कांचन पाटील – +91 91757 36003
सुनील नाग्णे – 0866-9253078