मुक्तपीठ टीम
गोव्याचे माजी मुख्यमंत्री लुइझिन्हो फालेरो यांनी सोमवारी पश्चिम बंगालमधील आगामी राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल केला. त्यांना त्यांच्या नवीन पक्षातून म्हणजेच तृणमूल काँग्रेसमधून राज्यसभेची संधी मिळाली आहे. अनेक दशके काँग्रेसमध्ये राहिल्यानंतर फालेरो यांनी गेल्या सप्टेंबरमध्ये तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. ममता बॅनर्जींच्य या चालीमुळे त्यांची मिशन इंडियाची इच्छा प्रबळ असल्याचे मानले जाते.
We are delighted to announce that Mr. @luizinhofaleiro has filed his nomination for Rajya Sabha today. Together we will usher in a New Dawn In Goa.#GoenchiNaviSakal pic.twitter.com/vfxKkZsRW5
— AITC Goa (@AITC4Goa) November 15, 2021
काँग्रेसचा हात सोडला, तृणमूलची खासदारकी!
- लुइझिन्हो फालेरो हे गेली अनेक दशक काँग्रेस मध्ये होते.
- गेल्या सप्टेंबर मध्ये त्यांनी तृणमूल काँग्रेस मध्ये प्रवेश केला.
- त्यांना गेल्या ऑक्टोबरमध्ये तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बनवण्यात आले होते.
- २९ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी टीएमसीने शनिवारी फालेरो यांना उमेदवारी जाहीर केली.
“मला ही संधी दिल्याबद्दल मी माझ्या पक्षाच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा आभारी आहे,” असे फालेरो यांनी उमेदवारी दाखल केल्यानंतर पत्रकारांना सांगितले. लोकांचे प्रश्न मी संसदेत मांडणार आहे. ममता बॅनर्जी सध्या देशातील सर्वात मजबूत विरोधी पक्षाचा आवाज आहेत असे मत त्यांनी मांडले.
तृणमूल खासदार अर्पिता घोष यांनी राज्यसभेतून राजीनामा दिल्यामुळे राज्यसभेच्या जागेसाठी २९ नोव्हेंबर रोजी पोटनिवडणूक होणार आहे. बंगालमधील मुख्य विरोधी पक्ष भाजपने अद्याप पोटनिवडणुकीसाठी उमेदवार जाहीर केलेला नाही. या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत प्रचंड विजय मिळवल्यानंतर ममता बॅनर्जी भाजपशासित गोवा आणि त्रिपुरामध्ये आपले वर्चस्व वाढवण्याचा प्रयत्न करत आहे.
गोव्यावर ममतांचं खास लक्ष!
- गोवा विधानसभेच्या ४० सदस्यीय निवडणुका पुढील वर्षाच्या सुरुवातीला होण्याची शक्यता आहे.
- मनोहर पर्रीकरांनंतर भाजपाकडे प्रभावी नेता नाही.
- त्यातच कोरोना संकटाच्या हाताळणीत विद्यमान सरकारने केलेल्या चुकांमुळे स्थानिक मतदारांमध्ये नाराजी आहे.
- गोव्यात एकेकाळी प्रबळ असलेल्या काँग्रेसच्या नेत्यांचे मतभेद आणि केंद्रीय नेत्यांचे दुर्लक्ष यामुळे तिथं निर्माण झालेल्या पोकळीत अरविंद केजरीवालाच्या आपनेही प्रवेश करुन प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न केला.
- आता ममता बॅनर्जीही त्याच प्रयत्नात आहेत.
- त्यात त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री लुइझिन्हो फालेरो यांना तृणमूलमध्ये आणून आणि आता खासदारकीचे बळ देऊन चांगली चाल चालल्याचं मानलं जातं.