मुक्तपीठ टीम
बंगालच्या राजकारणात सध्या वेगळाच मुद्दा तापताना दिसत आहे. हा मुद्दा आहे बंगालची फाळणी करून आणखी एक वेगळं राज्य स्थापन करण्याचा. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बंगालच्या फाळणीवरून पुन्हा एकदा भाजपाला सुनावले आहे. बंगालची फाळणी करून वेगळे राज्य निर्माण करण्याचा भाजपाच्या काही नेत्यांचा प्रयत्न आहे. पण आम्ही तसे होऊ देणार नाही. यासाठी गरज पडल्यास आपण रक्त सांडण्यास तयार आहोत, असंही त्या म्हणाल्या.
भाजपा फूट पाडण्याचा प्रयत्न करतेय…
- ममता बॅनर्जी उत्तर बंगालच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत.
- अलीपूरद्वार जिल्ह्यात पोहोचलेल्या ममता यांनी भाजपावर एक गंभीर आरोप केला आहे.
- २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी राज्यात फुटीरतावाद वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप ममता बॅनर्जींनी केला.
- उत्तर बंगालमधील सर्व समुदायांचे लोक अनेक दशकांपासून एकत्र राहत आहेत, परंतु भाजप लोकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे.
- लोकसभा निवडणुका जवळ आल्याने, भाजपा वेगळ्या राज्याच्या मागणीला खतपाणी घालत आहे.
- कधी भाजपा गोरखालँडची मागणी करत आहे, तर कधी वेगळ्या उत्तर बंगालची मागणी करत आहे.
- गरज पडल्यास मी माझे रक्त सांडायला तयार आहे, पण राज्याचे विभाजन कधीच होऊ देणार नाही.
बंगालची फाळणी होऊ दिली नाही तर जीवे मारण्याची धमकी!!
कामतापूर लिबरेशन ऑर्गनायझेशनचे नेते जीवन सिंघा यांनी कामतापूरची मागणी पूर्ण न केल्यास मुख्यमंत्र्यांना रक्तपात करण्याची धमकी दिल्याच्या कथित व्हिडिओचा संदर्भ देत बॅनर्जी म्हणाल्या की मी अशा धमक्यांना घाबरत नाही. मला याआधीही अनेक धोक्यांचा सामना करावा लागला होता. “काही लोक मला धमक्या देत आहेत. बंगालची फाळणी होऊ दिली नाही तर ते मला मारतील, असे ते म्हणत आहेत. मला त्याची पर्वा नाही. अशा धमक्यांना मी घाबरत नाही.”
भाजपा नेत्यांकडून वेगळ्या राज्याची मागणी
मतिगारा-नक्षलबारी मतदारसंघातील भाजप आमदार आनंदमय बर्मन, डबग्राम-फुलबारी मतदारसंघातील भाजपा आमदार शिखा चॅटर्जी यांनी उत्तर बंगाल केंद्रशासित प्रदेश बनवण्याची मागणी घेतली तर कुर्सियांगचे भाजप आमदार विष्णुप्रसाद शर्मा यांनी दार्जिलिंग बंगालपासून वेगळे करण्याची मागणी केली.
उत्तर बंगालचा भाग देशासाठी संरक्षणदृष्ट्या महत्वाचा!
आठ जिल्ह्यांपैकी उत्तर बंगाल हा पश्चिम बंगालसाठी आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे कारण त्यात चहाच्या बागा, लाकूड आणि पर्यटन उद्योग आहेत, तसाच देशासाठीही संरक्षणदृष्ट्या महत्वाचा आहे.
- हा प्रदेश नेपाळ, भूतान आणि बांगलादेशच्या सीमेवर आहे आणि सिलीगुडी विभागामुळे देशासाठी महत्त्वपूर्ण आहे.
- हा अरुंद रुंदीचा कॉरिडॉर ईशान्येकडील राज्यांना भारताच्या मुख्य भूभागाशी जोडतो आणि त्याला ‘चिकन नेक’ म्हणतात.
- १९८० पासून गोरखा, राजवंशी, कोच, कामतापुरी समुदायांसारख्या जातीय गटांद्वारे अनेक वेगळ्या राज्य हिंसक चळवळी झाल्या आहेत.
- त्यामुळे राजकारणासाठी तेथे असंतोष भडकणं देशाच्या हिताचे मानले जात नाही.