मुक्तपीठ टीम
भाजप आता ममता बॅनर्जींच्या तृणनूल काँग्रेस पक्षानंतर त्यांच्या घरातच कमळ फुलवून फूट पाडण्याच्या प्रयत्नात आहे. काही दिवसांपूर्वी भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांनी दावा केला तेव्हा लोकाना ते हास्यास्पद वाटले. ते म्हणाले, लवकरच ममता बॅनर्जींचं कुटुंब राहत असलेल्या हरीश मुखर्जी रोड येथेही भाजपचे कमळ फुलेल. आता घडतंही तसंच आहे. ममता बॅनर्जी यांचे बंधू कार्तिक बॅनर्जी यांनी ममतांविरोधात सूर आळवले आहेत.
ममतांच्या बंधूंनी बंगालमधील घराणेशाहीचे राजकारण संपवायचा मनोदय जाहीररीत्या व्यक्त केला आहे. त्यांच्या वक्तव्यानुसार, ते अशा राजकारण्यांना वैतागले आहेत, जे लोकांचे जीवन सुधारण्याच्या बाता मारतात, पण सुधारतात ते फक्त स्वत:च्या कुटुंबियांचे जीवन! कार्तिक बॅनर्जी यांच्या वक्तव्यानंतर त्यांचे भाजपमध्ये प्रवेश करण्याविषयीचा मनोदय उघड झाला आहे, अशी चर्चा आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वीच तृणमूल कॉंग्रेसमध्ये वातावरण तापले आहे. आतापर्यंत अनेक नेते तृणमूल सोडून भाजपमध्ये दाखल झाले आहेत. तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी त्यांचा पुतण्या अभिषेक बॅनर्जीला मोठे केले आहे. त्यांनी घराणेशाहीच्या राजकारणाला प्रोत्साहन दिल्याचा आरोप भाजप सातत्याने करीत आहे. भाजप नेते त्यांच्यावर सातत्याने टीका करत आहेत. अशा वेळी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाजवळ आयोजित एका जाहीर कार्यक्रमात ममता बॅनर्जी यांचे बंधू कार्तिक बॅनर्जी यांनी थेट बंडखोरीची भाषा वापरली.
कार्तिक बॅनर्जी यांच्या विधानामुळे बंगालच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, याबद्दल विचारले असता कार्तिक बॅनर्जी स्पष्ट उत्तर देत नाहीत. कार्तिक बॅनर्जी यांच्या दाव्यानुसार त्यांचे विधान कुणाला उद्देशून नव्हते. ते प्रचलित राजकारणातील ढोंगीपणाविरूद्ध बोलत आहेत.
विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच तृणमूलमधून भाजपमध्ये गेलेल्या माजी मंत्री सुवेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांचे वडिलोपार्जित घर असलेल्या हरीश मुखर्जी मार्गावर कमळ फुलवण्याचा दावा केला होता. कार्तिक बॅनर्जी तृणमूल कॉंग्रेसच्या कार्यातही भाग घेत नाहीत. कुटुंबातील आपला पुतण्या अभिषेक बॅनर्जी यांचे पक्षात महत्त्व वाढवल्यामुळे ते नाराज आहेत, असं म्हटले जाते. अर्थात ममताना आव्हान देऊन त्यांच्या घरात फूट पाडणे तेवढे सोपे नाही. तसे झाले तर ममता नावाची बंगाली वाघिण अधिकच चवताळून उठेल.