मुक्तपीठ टीम
शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदे तर पक्ष प्रतोदपदी भरत गोगावले यांची निवड योग्य ठरवतानाच विधानसभेचे नवे अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी शिवसेनेचे पूर्वीचे प्रतोद सुनील प्रभू आणि नवे गटनेते अजय चौधरी यांची नियुक्ती रद्द केली आहे. त्यामुळे शिवसेनेला दोन मोठे धक्के बसले आहेत. बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून विधिमंडळ शिवसेनेला ताब्यात ठेवण्याच्या भाजपाच्या प्रयत्नांना यश आल्यानंतर आता शिवसेना न्यायालयीन लढाई लढणार आहे. पण खरं आव्हान आता शिवसेना पक्ष संघटनेला ताब्यात घेण्याचा प्रयत्न झाल्यास तो हाणून पाडायचं असणार आहे.
शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत ३९ आमदारांना घेऊन भाजपसोबत सरकार स्थापन केलं. त्यांनी मुख्यमंत्रीपदाची तर भाजपाच्या देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर शिवसेनेपुढची आव्हानं वाढू लागली आहेत.
व्हिपच्या मुद्द्यावरून वाद!
- सभापती निवडीबाबत शिवसेनेकडून व्हीप जारी करण्यात आला.
- शिंदे गट आणि ठाकरे गट या दोन्ही पक्षांनी आपल्या आमदारांबाबत व्हीप जारी केला होता.
- आता व्हिपच्या मुद्द्यावरून वाद निर्माण झाला असून हा वाद निवडणूक आयोगापर्यंत पोहोचू शकतो.
- शिवसेना खासदार अरविंद सावंत म्हणाले की, ३९ आमदारांनी सभापती निवडीसाठी आमचा व्हीप पाळला नाही.
शिंदे गटाकडे ३९ आमदार आहेत. - उद्धव ठाकरेंसोबत आदित्य यांच्यासह १६ आमदार आहेत.
- शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटानेही शिंदे यांच्यासह त्यांच्यासोबत असलेल्या सर्व आमदारांना अपात्र ठरवण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे.
- मात्र, विधानसभेच्या नव्या अध्यक्षांनी शिंदे गटाच्या गटनेते आणि प्रतोदपदाला मान्यता दिल्याने शिवसेनेचे पक्ष प्रतोद सुनिल प्रभू यांनी जारी केलेला व्हिप अध्यक्ष किती महत्व देतील, याबद्दल शंकाच आहे.
- ते शिंदे गटाच्या व्हिपलाच महत्व देत शिवसेनेच्या १६ निष्ठावंतांवरच कारवाई करण्याची शक्यता आहे.
शिवसेनेला मोठा धक्का!
- विश्वास दर्शक ठरावाच्या एक दिवस आधी, महाराष्ट्र विधानसभेच्या नवनियुक्त अध्यक्षांनी रविवारी रात्री शिवसेनेचे आमदार अजय चौधरी यांना पक्षाच्या विधिमंडळ पक्षनेतेपदावरुन हटवले.
- सभापती राहुल नार्वेकर यांच्या कार्यालयाने जारी केलेल्या पत्रकात शिंदे यांची सेनेच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली असून ठाकरे गटातील सुनील प्रभू यांच्या जागी भरत गोगावले यांची शिवसेनेच्या मुख्य प्रतोदपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
- शिवसेनेचे नेते खासदार अरविंद सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेना अध्यक्षांच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान देणार आहे.