मुक्तपीठ टीम
चाचा विधायक है हमारे…एक वेब सिरीज मात्र सहजच भारतातील व्हीआयपी कल्चर आणि त्यातून नेते, सभोतालचे यांच्या मनातील स्वत:बद्दलची मोठेपणाची भावना दाखवते. त्याचवेळी आपल्याच देशातील एका नेत्याने मात्र वेगळा आदर्श घालून दिला आहे. एका ते वर-वधूंसोबत विनामास्क असल्याचे छायाचित्र प्रसारीत होताच त्यांनी स्वत:च सार्वजनिक ठिकाणी मास्कविना वावरण्यासाठी असलेला ५०० रुपयांचा दंड भरला. आणि पुन्हा कोरोना सुरक्षा नियम मोडण्याची चूक करणार नाही, अशी ग्वाहीही दिली.
नेते महोदयांनी स्वत:च दंड भरण्याची ही घटना आपल्याच देशातील राजस्थानात घडली आहे. ते नेते म्हणजे राजस्थानमधील काँग्रेसचे विधानसभा प्रतोद महेश जोशी. नुकतेच कॉंग्रेसचे नगरसेवक मनोज मुद्गल यांच्या मुलाच्या लग्नानंतरच्या आशीर्वाद समारंभाची छायाचित्र व्हायरल झालीत. त्यात राज्यातील काही नेते वधू-वरांसोबत मास्कविना होते. त्यांच्यातील एक छायाचित्र काँग्रेसचे प्रतोद महेश जोशी यांचेही होते. ते छायाचित्र व्हायरल होताच, महेश जोशी यांनी मास्क न घालण्यासाठी असलेला ५०० रुपयांचा दंड जयपूर महापालिकेत जमा केला. त्याची त्यांनी रितसर पावतीही घेतली. मग त्यांनी उसळलेल्या वादावर स्पष्टीकरण दिले. त्यांनी आपण अशा कोणत्याही सोहळ्यात सहभागी झालो नव्हतो, असा दावा केला.
मात्र, वर-वधूंना त्यांच्या घरी भेटल्यावर मुद्गल कुटुंबीयांच्या आग्रहावरून छायाचित्रासाठी मास्क काढला होता, असं त्यांनी मान्य केले आहे. तसेच त्याबद्दलचा दंड म्हणून ५०० रुपयांचा दंड भरल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे. पुन्हा कोणत्याही शासकीय मार्गदर्शक तत्त्वाचे उल्लंघन होणार नाही याची काळजी आपण घेणार आहोत, असेही ते म्हणाले. तसेच त्या चुकीकडे लक्ष वेधल्याबद्दल जोशी यांनी वृत्तपत्रांचे आभार मानले.
विवाह सोहळ्यामध्ये महापौर मुनेश गुर्जर, परिवहन मंत्री प्रतापसिंग खाचरियावास, चीफ व्हिप जोशी, नगरसेवक मनोज मुद्गल यांचे बिना मास्क घातलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत वारंवार लोकांना मास्क घालायला सांगत आहेत, परंतु सत्ताधारी पक्षाचे नेते सरकारच्या नियमांचे दुर्लक्ष करताना दिसतात. अशा परिस्थितीत महेश जोशी यांनी घालून दिलेला आदर्श हा सर्व राजकारण्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा मानावा लागेल.
पाहा व्हिडीओ: