मुक्तपीठ टीम
राज्यातील खाद्यसंस्कृती आणि पाककलेला चालना आणि देश-विदेशातील पर्यटकांना महाराष्ट्राकडे आकर्षित करण्यासाठी नेहमीच प्रयत्न सुरु असतात. त्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून महाराष्ट्र राज्य पर्यटन संचालनालयाच्या वतीने ‘महाराष्ट्राचे मास्टरशेफ’ या रेसीपी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती पर्यटन संचालक डॉ. धनंजय सावळकर यांनी दिली आहे. ही स्पर्धा ऑनलाईन असणार आहे.
स्पर्धेतील १५ सर्वोत्कृष्ट रेसीपींना प्रत्येकी १० हजार रुपये, ४० रेसीपींना प्रत्येकी ५ हजार रुपये तर उत्कृष्ट १०० रेसीपींना प्रत्येकी २ हजार रुपयांची बक्षीसे दिली जातील. शिवाय स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांना महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाकडून सहभागाचे प्रमाणपत्र दिले जाणार आहे. स्पर्धेत सहभागासाठी www.maharashtratourism.gov.in या संकेतस्थळावर इत्यंभूत माहिती उपलब्ध आहे. https://bit.ly/MaharashtracheMasterchef या लिंकवर माहिती तसेच अर्ज उपलब्ध आहे.
We are excited to announce ‘Maharashtrache Masterchef’ a recipe contest for everyone to show their culinary skills & win* prizes upto Rs. 10,000/-
Click on the link to know morehttps://t.co/b7eSwVHHM1
*T&C applied pic.twitter.com/sIfuaH9soG
— Maharashtra Tourism (@maha_tourism) July 12, 2021
महाराष्ट्राची खाद्य संस्कृती ही देश आणि जगभरात लोकप्रीय आहे. राज्याच्या विविध भागातील मालवणी, आग्री-कोळी, खान्देशी, कोल्हापुरी, वह्राडी अशा विविध खाद्यसंस्कृती लोकप्रीय आहेत. पर्यटक महाराष्ट्रात आल्यानंतर स्थानिक खाद्यपदार्थांचा आवर्जून आस्वाद घेतात. आता महाराष्ट्रातील अशा विविध रेसीपी देश आणि जगभरातील पर्यटकांपर्यंत पोहोचवून त्यांना चालना देण्यात येणार आहे. यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असून त्याअनुषंगानेच या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यात राज्याच्या विविध भागातील पाककला प्रेमींनी सहभागी होऊन महाराष्ट्राचे मास्टरशेफ बनावे, असे आवाहन संचालक डॉ. सावळकर यांनी केले आहे.
स्पर्धेत सहभागासाठी आपल्या आवडत्या महाराष्ट्रीय डिशची व्हिडीओ रेसीपी ऑनलाईन सबमिट करावयाची आहे. ११ जुलै ते १० ऑगस्ट दरम्यान ही स्पर्धा असेल. व्हिडिओ किमान ३० सेकंद आणि कमाल १५ मिनिटांचा असणे आवश्यक आहे. व्हिडीओचा आकार १०० एमबीपर्यंत असावा. व्हिडीओ रेसीपीसह त्यातील घटक आणि पद्धतीची माहिती लिखीत स्वरुपातही सोबत सादर करणे आवश्यक आहे. अभिनव शूटिंग शैली, अन्नाचे सादरीकरण, प्रादेशिक महाराष्ट्रीय रेसीपी, महाराष्ट्रीय पदार्थांचा वापर, अन्नपदार्थ स्वच्छ, आरोग्यदायी ठेवण्यासाठी काळजी आदी बाबींच्या आधारे विजेत्यांची निवड केली जाईल. मजकूर, संभाषण किंवा व्हॉईस-ओवर हा मराठी किंवा इंग्रजी भाषेत वापरला जाऊ शकतो. व्हिडीओंना कोणताही वॉटरमार्क नसावा, असे व्हिडिओ अपात्र ठरविले जातील. तज्ज्ञ शेफ्सच्या समितीमार्फत विजेत्यांची निवड केली जाईल.