मुक्तपीठ टीम
कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणामध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आहे. राज्यातील ८० लाखाहून अधिक नागरिकांचे लसीकरण झाले आहे. राज्यात वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता लसीकरणाला अधिक वेग येण्यासाठी केंद्र शासनाकडे लसींचा अधिकाधिक पुरवठा करण्यासाठी पाठपुरावा करावा, अशी सूचना मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी केली आहे.
महाराष्ट्राला सुमारे एक कोटी सहा लाख डोसेस मिळाले आहेत. त्यापैकी ८८ लाख डोसेसचा वापर झाला आहे. महाराष्ट्रात डोस वाया जाण्याचे प्रमाण तीन टक्के आहे. ते अत्यंत कमी असून राष्ट्रीय सरासरीच्या देखील निम्मे आहे. पाच एप्रिलपर्यंत महाराष्ट्रात ८१ लाख २१ हजार ३३२ नागरिकांना लसीकरण करण्यात आले. राज्यात दररोज ४ लाख नागरिकांना लसीकरण केले जात आहे.
राज्यातील ८० लाखाहून अधिक लोकांना लसीकरण करुन महाराष्ट्राने देशात अग्रक्रमात सातत्य राखल्याबद्दल मुख्य सचिवांनी लसीकरण यंत्रणेचे कौतुक केले. त्याचवेळी त्यांनी लसीकरणाचा वेग अधिक वाढविण्याच्या सूचना केल्या. ८५ वर्षावरील नागरिकांच्या लसीकरणाची राज्य सरासरी १२.३ टक्के असून राज्यातील भंडारा, कोल्हापूर, नागपूर, मुंबई, पुणे, सांगली, गोंदिया, वाशिम आणि वर्धा या जिल्ह्यांनी राज्य सरासरीपेक्षा अधिक लसीकरण केले आहे. औरंगाबाद, पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, ठाणे या सहा जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या जास्त असून येथे प्राधान्याने ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी यंत्रणेने प्रयत्न करावेत. राज्यातील लसीकरणाचा वेग पाहता केंद्र शासनाकडून जास्तीचा लस पुरवठा होण्याकरीता पाठपुरावा करण्यात येईल असे मुख्य सचिवांनी सांगितले.
पाहा व्हिडीओ: