मुक्तपीठ टीम
महाराष्ट्रातील सत्ताकारणाचा वाद अखेर सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. बंडखोर एकनाथ शिंदे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात दोन वेगवेगळ्या याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. शिवसेनेकडून सुरू असलेल्या अपात्रतेच्या कारवाई विरोधात शिंदे गटाकडून याचिका दाखल करण्यात आली असून त्यावर स्थगितीची मागणी केली आहे. तसेच अजय चौधरींच्या गटनेते पदाला आव्हान देणारी याचिकाही शिंदे गटानं दाखल केली आहे. यावर आज सुनावणी होणार आहे.
आज इतर काही नाही झाले तरी किमान विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी दिलेल्या ४८ तासांच्या आज संध्याकाळी ५ वाजता संपणाऱ्या मुदतीला वाढवण्याचा अंतरिम दिलासा मिळवण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न असण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रातील वाद सर्वोच्च न्यायालयात!
- आमदारांच्या अपात्रतेची प्रक्रिया सुरू करण्याच्या नोटिसीला स्थगिती द्यावी, अशी मागणी शिंदे गटाने याचिकेत केली आहे.
- अविश्वास ठराव फेटाळणे आणि विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड या तीनही मुद्द्यांवर सर्वोच्च न्यायालयाने तातडीने हस्तक्षेप करावा.
या खटल्यांची लवकर सुनावणी व्हावी, अशी विनंती त्यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे केली होती. - तसेच एकनाथ शिंदे गटाकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेत अजय चौधरींच्या नियुक्तीविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे.
- एकनाथ शिंदे यांची न्यायालयात बाजू मांडण्यासाठी नामांकित वकील हरीश साळवे तर महाविकास आघाडीच्या बाजूने जेष्ठ वकील कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी असणार आहेत.
- तुम्हाला अपात्र का ठरवू नये, अशी विचारणा करत महाराष्ट्र विधानसभेच्या उपसभापतींनी शिवसेनेच्या अर्जावर १६ आमदारांना नोटीस बजावली आहे.
- त्यांनी २७ जूनच्या संध्याकाळपर्यंत आमदारांना उत्तर देण्यास सांगितले आहे. यापूर्वी उपसभापती नरहरी झिरवाळ यांनीही आपल्याविरुद्धचा अविश्वास प्रस्ताव निनावी मेल आयडीवरून पाठवण्यात आला होता, त्यासाठी आमदारांना पुढे यावे लागेल, असे सांगत फेटाळला होता. शिंदे यांनी न्यायालयात नोटीसची वेळ वाचवण्यासाठी त्यांच्या याचिकेची प्रत महाराष्ट्र सरकारला आधीच पाठवली आहे.