मुक्तपीठ टींम
महाराष्ट्रातील सत्तातंरावर सुरु असलेला सर्वोच्च न्यायालयातील तीढा आजही जैसे थे राहिला. आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली असता उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाकडून युक्तिवाद करण्यात आला. मात्र, न्यायालयाचे सादर करण्यात आलेल्या लेखी निवेदनांनी समाधान झाले नसल्याने, ज्येष्ठ विधिज्ञ हरिष साळवे यांना उद्या नव्यानं ते सादर करण्यास सांगण्यात आले. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी सकाळी हे पहिल्या क्रमांकाचं प्रकरण असेल, असे सांगून आजची सुनावणी आवरती घेतली. सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी आणि न्यायमूर्ती हिमा कोहली या त्रिसदस्यीय पीठापुढे सुनावणी पार पडली.
सर्वोच्च न्यायालयासमोर दोन्ही बाजूंकडून उलट-सुलट मुद्दे!
- आजच्या सुनावणीदरम्यान एकनाथ शिंदे गटाची बाजू हरिश साळवे मांडत असून आजच्या सुनावणीदरम्यान सुरुवातीला उद्धव ठाकरे गटाची बाजू ज्येष्ठ वकील कपील सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी यांनी मांडली. तर राज्यपालांच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी बाजू मांडली.
- शिंदे सरकारच्या वैधतेला, विधानसभा अध्यक्षांच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिका आणि शिंदे गटातील आमदारांना अपात्र ठरविण्याबाबत विधानसभा उपाध्यक्षांनी दिलेल्या नोटिशींना आव्हान देणाऱ्या याचिकांवर आज एकत्रित सुनावणी पार पडली.
- यावेळी उद्धव ठाकरे, शिंदे गट आणि राज्यपालांच्या वतीने युक्तिवाद करण्यात आला.
- सुनावणीदरम्यान शिंदे गटाकडून विधानसभा अध्यक्षांकडे निर्णयाचे अधिकार देण्याची मागणी केली असता सर्वोच्च न्यायालयाने खडसावले.
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील सुनावणी उद्यावर!!
- बंडखोर आमदारांच्या अपात्रतेवरुन सुरु झालेली कायदेशीर लढाई आता शिवसेना कोणाची यावर येऊन पोहोचली.
- आजच्या सुनावणीत मूळ पक्ष कोणता, आमदारांची अपात्रता यावर युक्तिवाद झाला.
- सत्तासंघर्षाची सुनावणी विस्तारित पीठाकडे की, घटनापीठाकडे जाणार? किंवा निवडणूक आयोगाच्या नोटिशीला सर्वोच्च न्यायालय स्थगिती देणार? या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं उद्याच्या सुनावणीत मिळेल, अशी अपेक्षा आहे.