मुक्तपीठ टीम
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) परीक्षा सन २०२१ निकाल आज जाहीर करण्यात आला. यावर्षी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा निकाल ९९.६३% लागला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत विद्यार्थ्यांना विषयनिहाय केलेल्या गुणदान व मंडळाच्या धोरणानुसार उत्तीर्णतेचे सर्व निकष विचारात घेऊन उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजे बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.
निकालाची ठळक वैशिष्ट्य
१. या परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून विज्ञान, कला, वाणिज्य व एचएससी व्होकेशनल या शाखांतील एकूण १३१९७५४ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १३१९७५४ विद्यार्थ्यांची संपादणूक उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांकडून प्राप्त झालेली आहे. त्यापैकी १३१४९६५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी ९९.६३ आहे.
२. या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून सर्व शाखांमधून एकूण ६६८७१ पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ६६८६७ विद्यार्थ्यांची संपादणूक उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांकडून प्राप्त झाली आहे. त्यापैकी ६३०६३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यांची एकूण निकालाची टक्केवारी ९४.३१ आहे.
३.सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थ्यांचा कोकण विभागाचा निकाल (९९.८१%) सर्वाधिक असून सर्वात कमी निकाल औरंगाबाद विभागाचा (९९.३४ %) आहे.
४. सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थीनींचा निकाल ९९.७३ % असून विद्यार्थ्यांचा निकाल ९९.५४% आहे. म्हणजेच विद्यार्थीनींच्या निकालाची टक्केवारी विद्यार्थ्यांपेक्षा ०.१९% ने जास्त आहे.
५. दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल ९९.५९% लागला आहे.
६. एकूण १६० विषयांना सुधारित मूल्यमापन कार्यपध्दतीत निश्चित केलेल्या भारांशानुसार गुणदान करण्यात आलेले असून त्यामध्ये ७० विषयांचा निकाल १००% लागला आहे.
शालेय शिक्षण मंत्री प्राध्यापक वर्षा गायकवाड यांनी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.