मुक्तपीठ टीम
शिवसेना नेते एकनाथ शिंदेंच्या बंडाखोरीमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदेंनी आपल्यासोबत जवळपास ४० आमदार असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकारचं अस्तित्व धोक्यात आलं आहे. मात्र असं काही तरी चालू असल्याची माहिती राज्य गुप्तचर विभागाने (एसआयडी) गृहमंत्रालयाला दोन महिन्यांपूर्वीच दिली होती. परंतु त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही, असा दावा संबंधित घडामोडींशी संबंधित जाणकारांनी केला आहे.
SIDनं सरकारला दोन महिन्यांपूर्वीच दिलेली बंडखोरीची कल्पना!
- शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांच्यासह आठ ते दहा आमदार विरोधी पक्षाच्या संपर्कात होते, अशी गोपनीय माहिती एसआयडीच्या अधिकाऱ्यांनी दोन महिन्यांपूर्वीच दिली आहे.
- अशा परिस्थितीत एसआयडीच्या मदतीने काहीतरी पावलं उचलायला हवी होती.
- अनेक वेळा राजकारण्यांचे विशेष सुरक्षारक्षक म्हणून नियुक्त केलेल्या पोलीस अधिकार्यांकडून राज्य पोलिसांना गुप्तचर माहिती देखील मिळते.
राज्य गुप्तचर विभाग काय करतो?
- राज्यातील संभाव्य घडामोडींवर लक्ष ठेवणे, गुन्हे तसेच समाजकंटक, दहशतवादी आणि माओवादी कारवायाबद्दल तसेच राजकीय घडामोडी आणि हालचालींवरही लक्ष ठेवत आगाऊ सूचना देणे हे एसआयडीचं काम आहे.
- महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी राज्य गुप्तचर विभागाची स्थापना केली.
- राजकीय घडामोडींची माहिती अनेकदा सरकारला तोंडी दिली जाते.
- शिवसेनेतील बंडाची चाहूल लागत असल्याचं पोलिसांनी कळवलं होतं.
गृह मंत्रालयाचं अपयश?
परंतु एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीचा अंदाज घेण्यात शिवसेनेसह महाविकास आघाडी सरकारचं गृहखातं अयशस्वी ठरलं आहे. किंवा कदाचित मिळालेल्या माहितीची संवेदनशीलता सरकारमधील संबंधितांना लक्षात न आल्यामुळे दुर्लक्ष झालं की काहींनी जाणीवपूर्वक ती माहिती आघाडीच्या ज्येष्ठ नेत्यांकडून दडवली, हाही आता चर्चेचा मुद्दा झाला आहे.
शरद पवारांनी केली विचारणा
- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनीही याबद्दल गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे विचारणा केली आहे.
- राज्याच्या मंत्रिमंडळातील एवढे मंत्री, आमदार महाराष्ट्रातून रातोरात निघून गेले तरी कसं कळलं नाही, असा प्रश्न शरद पवार यांनी गृहमंत्री वळसे पाटलांना केला आहे.