मुक्तपीठ टीम
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बुधवारी होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. स्पाईन शस्त्रक्रिया झाल्यानंतर प्रथमच मुख्यमंत्री ठाकरे सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. जवळजवळ अडीच महिन्यांनंतर मुख्यमंत्री २६ जानेवारीच्या प्रजासत्ताक दिन सोहळयाला शिवाजी पार्क मैदानावर उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाचं ध्वजारोहण होईल.
अडीच महिन्यानंतर मुख्यमंत्री सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थित राहणार
- जवळपास अडीच महिन्यांच्या कालावधीनंतर पहिल्यांदाच प्रत्यक्ष कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
- १२ नोव्हेंबरला झालेल्या स्पाईन सर्जरीनंतर ते आतापर्यंत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठका, कार्यक्रमांना उपस्थित राहत होते.
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर एच. एन. रिलायन्स रुग्णालयात शस्त्रक्रिया झाली होती.
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती पाहता यंदाचे विधीमंडळ अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत आयोजित करण्यात आले होते.
- या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री सभागृहात उपस्थित राहतील असे म्हटले जात होते. मात्र, हे अधिवेशन मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत पार पडले होते.
- आता प्रजासत्ताक दिनानिमित्त शिवाजी पार्क इथं होणाऱ्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
मुंबई मनपाकडून जोरदार तयारी
- दोनच दिवसांपूर्वी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून शिवसैनिकांना संबोधले. दरम्यान, मुंबई मनपा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना सतर्क झाली आहे.
- त्या दृष्टीने प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी शिवाजी पार्कवर मुंबई मनपाकडून तयारी करण्यात येत आहे.
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती पाहता मनपाकडून विशेष दक्षता घेण्यात येत आहे.
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थित राहत आहेत या निर्णयाचं भाजपच्यावतीनं स्वागत करण्यात आलं आहे.