मुक्तपीठ टीम
शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक, माजी आमदार विनायक मेटे यांचे अपघाती निधन अत्यंत धक्कादायक आणि वेदना देणारे आहे. त्यांच्या निधनाने मराठा आरक्षणासह, सामाजिक चळवळीचा बुलंद आवाज, धडाडीचे नेतृत्व हरपले अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विनायक मेटे यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण केली आहे.
मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात,मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी मी आजच मुंबई येथे बैठक बोलावली होती. त्या बैठकीला मेटे उपस्थित राहणार होते. या बैठकीपुर्वीच काळाने त्यांना आपल्यातून हिरावून नेले. त्यांच्या निधनाने मराठा आरक्षण चळवळीचे न भरून निघणारे नुकसान झाले आहे. अरबी समुद्रातील शिवस्मारक आणि मराठा आरक्षणाच्या मुद्यावर तळमळीने बोलायचे. या स्मारकाच्या कामासाठी राजकीय इच्छाशक्ती निर्माण करून निधीची तरतूद करून घेण्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला.
मराठा आरक्षणासाठी झालेल्या आंदोलनात जीव गमवावा लागलेल्या तरुणांच्या कुटूंबियांना शासकीय नोकरी मिळावी, त्यांचं योग्य पुनर्वसन व्हावे तसेच आंदोलन करताना दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावे यासाठी त्यांनी प्रयत्न केले. शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, कामगार, गरीब लोकांना त्यांचे हक्क आणि न्याय मिळवून देण्यासाठी ते कायम लढत राहिले. मेटे यांच्या निधनाने मराठा समाजाचा एक बुलंद आवाज आज हरपला आहे. या धक्क्यातून सावरण्याचे बळ मेटे कुटुंबियांना मिळो, अशी ईश्वर चरणी प्रार्थना. माजी आमदार विनायक मेटे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
राज्यपालांची विनायक मेटे यांना श्रद्धांजली
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या अपघाती निधनाचे वृत्त अत्यंत धक्कादायक आहे. त्यांचे सामाजिक कार्य तसेच उपेक्षित समाज घटकांच्या विकासातील योगदान मोठे आहे. दिवंगत श्री. मेटे यांना भावपूर्ण श्रद्धांजली, असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.