मुक्तपीठ टीम
आजची तरुणाई म्हणजे केवळ लेटेस्ट ट्रेंडची फॅशन मिरवत भन्नाट वेगानं बाइक, कार पळवणं, वाट्टेल तसं जगणं असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुमचं चुकतंय. आजची तरुणाई उरात जपते तेच मराठीपण, फक्त अभिमानच बाळगत नाही आपल्या ऐतिहासिक वारशाचा तर त्याच्या संवर्धनासाठीही धडपडते. आता मुंबईचा रोहन अशोक काळे आणि त्याच्यासोबतच्या लोणावळ्याचा मनोज सिनकर या दोन तरूणांचेच पाहा. त्यांचा श्वास आणि ध्यास सध्या एकच आहे. तो आहे, ऐतिहासिक पाणी पुरवठ्याचा आपल्या मातीतील देखणा इतिहास संवर्धनाचा. त्यासाठीच त्यांची महाराष्ट्र बारव मोहीम अथक, निरंतर सुरु आहे.
हे तरुण महाराष्ट्रातील पांडवकालीन, शिवकालीन, पेशवेकालीन आणि आहिल्याबाई होळकर यांच्या काळातील बारवांचा शोध घेत आहेत. त्यांनी गुजरात आणि राजस्थानातील स्वच्छ आणि सुंदर बारव पाहिल्या. त्यानंतर महाराष्ट्रातील बारव शोधण्याचा आणि संवर्धनाचा ध्यास त्यांनी घेतला. यासाठी ते नोकरीत १ वर्षाचा ब्रेक घेऊन बारव शोधण्यासाठी ते दोघं गावं पालथी घालत आहेत. महाराष्ट्रातील दुर्लक्षित बारवांचा शोध घेऊन ते लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करत आहेत.
बारव म्हणजे पायऱ्यांच्या बावड्या म्हणजेच विहीरी. नैसर्गिक झऱ्यांभोवती या बारव सुंदर देखणं दगडी स्थापत्यातून उभारल्या आहेत. त्यामागचा उद्देश प्रत्येक गाव पाणी पुरवठ्याच्याबाबतीत स्वावलंबी असावं हा होता. काळाच्या ओघात दुर्लक्ष झालं किंवा केलं गेलं आणि बारव खरोखरच धुळ खात पडल्या. त्यांचे शुद्ध पाण्याचे नैसर्गिक जलस्त्रोत बुजण्याची वेळ आली. पाणी दुषित झाले. ते अधिकच दुर्लक्षित झाले. या दोन तरुणांनी मात्र आतापर्यंत कोकणातील १०४, पश्चिम महाराष्ट्रातील १८० आणि इतर ठिकाणी असलेल्या बारवां भेट दिली आहे. ते त्यांची नोंदणी www.indianstepwells.com या आपल्या अधिकृत वेबसाइटवर करत आहेत. त्यामुळे सरकार दरबारी दखल घेतली जाईल आणि हा देखणा आणि लोकोपयोगी ऐतिहासिक ठेवा पुन्हा एकदा लोकांच्या उपयोगी येईल. पाणी स्वावलंबनाचे सुराज्य पुन्हा गावोगावी अवतरेल. रोहन काळे आणि त्याचा सहकारी मनोज सिनकरच्या महाराष्ट्र बारव मोहिमेला मुक्तपीठच्या शुभेच्छा.
महाराष्ट्र बारव मोहिमे अंतर्गत मोटरसायकलवर ते महाराष्ट्रात सर्वत्र फिरत आहेत. रोहन काळे या मुंबईकराने आतापर्यंत शेकडो बारवांचा शोध घेतलेला आहे. महाराष्ट्रातील अनेक बारवांचा वापर वारकरी वारीदरम्यान करीत असतात. रोहन याने असे सांगितले की, “महाराष्ट्र बारव मोहिमे अंतर्गत संवर्धनासाठी लोकांनी आपले जलस्त्रोताचे जतन करावे हे या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट आहे.”
मागील लॉकडाउननंतर महाराष्ट्रभरातील साधारण ३५० हून अधिक बारवांची या दोघं मित्रांनी पाहणी केली. “जल हेच जीवन” या संकल्पनेतून बारवांचे महत्त्व लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला. ही मोहीम एकाच वेळी दीडशे ते दोनशे ठिकाणी पार पाडता येणार असून याची पूर्व तयारी करण्यात येणार आहे. साफसफाई करून तेथे दिवे लावून रांगोळी, फुलांनी सजवून कार्यक्रम आयेजित करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. सध्या रोहन या बारवांची रीतसर नोंदणी करण्यासाठी मराठवाडा आणि विदर्भ दौरा करत आहे.
आतापर्यंत या दोघांनी अनेक गावांत झाडा-झुडपांत लुप्त पावलेल्या जवळपास २०० बारव शोधल्या आहेत. त्याच्या संवर्धनासाठी ग्रामस्थांना ते आवाहन करत आहेत. या बारवांना पर्यटन स्थळे म्हणून विकसित करण्याच्या प्रयत्नात आहेत..
पाहा व्हिडीओ: