मुक्तपीठ टीम
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ऊर्जा संवर्धनासाठी आज सर्वोत्कृष्ट कार्य करणाऱ्या शासकीय तसेच खासगी संस्थांना गौरविण्यात आले. यामध्ये विविध श्रेणीत राज्याला राष्ट्रीय पुरस्काराने राष्ट्रपती यांनी सन्मानित केले.
येथील विज्ञान भवनात ‘राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिना’चे औचित्य साधून केंद्रीय ऊर्जा विभागातर्फे राष्ट्रीय पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी केंद्रीय ऊर्जा मंत्री आर.के. सिंह, केंद्रीय राज्य मंत्री कृष्ण पाल, सचिव आलोककुमार व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कार, राष्ट्रीय ऊर्जा कार्यक्षमता नवोन्मेष पुरस्कार विविध श्रेणीत आणि राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेतील पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. यातील काही पुरस्कारांचे वितरण राष्ट्रपती यांच्या हस्ते करण्यात आले, तर काही पुरस्कारांचे वितरण केंद्रीय ऊर्जा मंत्री यांच्या हस्ते झाले. चित्रकला स्पर्धेतील पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांना पदक आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कारार्थींना स्मृती चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
ऊर्जा संवर्धनात लातूरच्या दयानंद विज्ञान महाविद्यालयाला राष्ट्रीय पुरस्कार
राष्ट्रीय ऊर्जा संवर्धनातील इमारत या श्रेणीत लातूर येथील दयानंद विज्ञान महाविद्यालयाला प्रथम क्रमांकाच्या राष्ट्रीय पुरस्काराने राष्ट्रपती श्रीमती मुर्मू यांच्या हस्ते गौरविण्यात आले. हा पुरस्कार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयप्रकाश दरगड आणि डॉ. ललित ठाकरे, नोडल अधिकारी यांनी स्वीकारला. या श्रेणीतील द्वितीय पुरस्कार अहमदनगर येथील लोकपंचायत ग्रामीण तांत्रिक प्रशिक्षण संस्थेला प्रदान करण्यात आला.
ऊर्जा कार्यक्षमता आणि संवर्धन याविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने ऊर्जा मंत्रालयाच्या अखत्यारीतील ऊर्जा कार्यक्षमता ब्युरोच्या वतीने ऊर्जेचा वापर कमी करून ऊर्जा बचत करणाऱ्या शासकीय संस्था, महाविद्यालय, औद्योगिक एकके, संस्था आणि आस्थापना यांना राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते.
कोल्हापूरची सौंदर्या पाटीलला राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक
कोल्हापूरच्या हिराराम गर्ल्स हायस्कूलची नववीत शिकणारी सौंदर्या पाटील या विद्यार्थिनीने राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत तिसरा क्रमांक पटकाविला. राष्ट्रपती श्रीमती मुर्मू यांच्या हस्ते तिचा पदक आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.