मुक्तपीठ टीम
राज्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण पुन्हा वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जिल्ह्यांमध्ये यासंदर्भातील निर्बंध आदेश जारी करण्यात आले आहेत. अकोला जिल्ह्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी दर रविवार संपूर्ण तर रात्रीही संचारबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. यवतमाळ जिल्ह्यातही संचारबंदी लागू करण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यात कोरोना रुग्ण तपासणीचा वेग वाढविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचे आदेश
राज्यभरात मास्कची सक्ती कडकपणे अंमलात आणण्यासाठी प्रशासन कार्यरत झाले आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे टाळणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्वत: रेल्वे स्थानकांवर जाऊन प्रवाशांशी संवाद साधला. रेल्वे सेवा चालू राहण्यासाठी कोरोना संसर्ग टाळणे आवश्यक आहे. तुम्ही मास्क वापराच, असे आवाहन त्यांनी केले.
सिंधुदुर्गनगरी जिल्ह्यात सर्व नगरपालिका, पंचायत व ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत. मास्क न वापरणाऱ्यांना २०० रुपये दंड आकारण्यात येईल तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांना एक हजार रुपये दंड आकारण्यात येणार असल्याचे आदेशही जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत.