मुक्तपीठ टीम
आयटी प्रोफेशनल्ससाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. आयटी क्षेत्रात ३ लाख ६० हजार जागांसाठी भरती होण्याची शक्यता आहे. नुकत्याच आलेल्या एका अहवालानुसार, आयटी कंपन्या चालू आर्थिक वर्षात मोठ्या संख्येने फ्रेशर्सची नियुक्ती करण्याचा विचार करत आहेत. कोरोना संकट काळात इतर उद्योगांवर संकट कोसळलं, पण त्याचवेळी आयटी कंपन्यांची मागणी मात्र वाढली. त्यामुळे स्वाभाविकच आयटी कंपन्यांची उलाढालही वाढली. त्यातूनच फायदाही. कोरोनानंतरच्या परिस्थितीतही आयटी कंपन्यांच्या सेवांमध्ये वाढच होत आहे. त्यामुळे आता या कंपन्या नव्याने भरती करत आहे.
भारतीय आयटी मार्केटमध्ये वाढ होणार
- भारतीय आयटी सेवा बाजार २३० अब्ज डॉलर ते २४० अब्ज डॉलर पर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. जे प्रामुख्याने मुख्य १५ ते २० भारतीय आयटी कंपन्यांच्या वाढीमुळे चालते.
- नॅसकॉमच्या ताज्या अहवालात असेही म्हटले आहे की, पुढील आर्थिक वर्ष देखील आयटी क्षेत्रासाठी उत्कृष्ट असेल.
- पुढील वर्षीही डिजिटल मागणी कायम राहील, त्यामुळे हे क्षेत्र वेगाने वाढेल. या उद्योगाचा आकार २०२६ पर्यंत ३५० अब्ज डॉलर होईल.
महसुलात मोठी वाढ होणार
कोरोनाचा प्रादुर्भाव असूनही आयटी क्षेत्राला वेग आहे. म्हणजेच या क्षेत्रावर महामारीचा विशेष प्रभाव नाही. अहवालानुसार, या वर्षी महसुलातही मोठी झेप होईल आणि कंपन्या मोठ्या प्रमाणावर भरती करतील. चालू आर्थिक वर्षात आयटी क्षेत्रासाठी महसूल वाढ १९ ते २१ टक्क्यांच्या श्रेणीत असेल, जी त्याच्या इतिहासातील सर्वोच्च असेल. आर्थिक वर्ष २०२३-२४ पर्यंत ही वाढ कायम राहील, असे त्यात म्हटले आहे.
सहा कंपन्यांमध्ये सर्वाधिक भरती
- नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालात असे म्हटले आहे की मुख्य सहा आयटी कंपन्यांनी आर्थिक वर्ष २०२२ मध्ये कंपनीत २.१५ लाख पदवीधरांना फ्रेशर्स म्हणून नियुक्त केले आहे.
- गेल्या वर्षीची आकडेवारी पाहता, हा आकडा ९९ हजारपेक्षा थोडा जास्त होता.
- अहवालानुसार, कॉग्निझंट, एचसीएल टेक, विप्रो आणि टेक महिंद्रा मिळून येत्या वर्षासाठी १.४ लाख फ्रेशर्सची नियुक्ती करण्याची तयारी करत आहेत.
सध्या नोकरी सोडून देण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे
- अहवालानुसार, चालू आर्थिक वर्षात नोकरी सोडण्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे.
- आयटी क्षेत्रात नोकऱ्या सोडण्याचे प्रमाण तिसऱ्या तिमाहीत म्हणजेच ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान २२ टक्के होते, जे दुसऱ्या तिमाहीत म्णजेच जुलै ते सप्टेंबरमध्ये १९.५ टक्के होते.
- अहवालात असा अंदाज आहे की, चौथ्या तिमाहीत जानेवारी ते मार्चमध्ये हा दर २२ ते २४ टक्क्यांच्या दरम्यान राहील. ही चिंतेची बाब आहे की आयटी क्षेत्रातील पगार सतत वाढत आहेत, तर अॅट्रिशन रेट कमी होत नाहीये.