मुक्तपीठ टीम
रत्नागिरी जिल्ह्याच्या उत्तर भागात शेकडो गावांना पाण्याने विळखा घातला असून अडकलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी राज्य सरकारने आणि जिल्हा प्रशासनाने तातडीने हालचाली करण्याची गरज आहे. या कामी जिल्हा प्रशासनाला भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार आहेत, असे भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
भांडारी यांनी म्हटले आहे की, रत्नागिरी जिल्ह्याच्या उत्तर भागाला गुरुवारी पहाटेपासून पावसाने अक्षरश: झोडपले आहे. ढगफुटी झाल्यासारखी स्थिती या भागात आहे. २००५ च्या महापुरापेक्षाही भीषण स्थिती या भागात आहे. चिपळूणला पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. चिपळूण शहर पूर्णतः बुडाले आहे.
चिपळूणचा जगाशी संपर्क तुटला आहे. सर्व रस्ते बंद झाले असल्याने तेथे मदत पोहचवणे अत्यंत अवघड झाले आहे. चिपळूण, खेड, गुहागर, संगमेश्वर या ४ तालुक्यातील शेकडो गावे महापुराच्या विळख्यात अडकली आहेत. दुर्दैवाने भरती असल्याने पाणी ओसरण्यास वेळ लागणार आहे. घरात अडकून पडलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी प्रशासनाशी संपर्क साधला आहे. या संदर्भात केंद्र सरकारशीही संपर्क साधण्यात आला आहे.
एनडीआरएफची तुकडी पावसाचा फटका बसलेल्या भागात पोहोचू शकेल आणि संकटात सापडलेल्यांना मदत मिळेल अशी आशा आहे. अडकलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी जिल्हा प्रशासनाने त्वरेने पावले टाकली पाहिजेत.