मुक्तपीठ टीम
कोकणात वादळामुळे झालेल्या नुकसानीची सरकारी यंत्रणांकडून चुकीची माहिती दिली गेल्यामुळे कोकणवासीयांना शासनाकडून भरीव भरपाई मिळणार नाही. ज्या कोकणाने शिवसेनेला भरभरून साथ दिली त्याच कोकणच्या जनतेची शिवसेनेच्या सरकारने केलेली उपेक्षा निषेधार्ह आहे , असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी शनिवारी केले. रत्नागिरी जिल्ह्यातील पत्रकारांशी ऑनलाईन संवाद साधताना भांडारी बोलत होते. रत्नागिरी जिल्हा भाजपा अध्यक्ष दीपक पटवर्धन या वेळी उपस्थित होते.
भांडारी यांनी सांगितले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी कोकणचा धावता दौरा केला. या दौऱ्यात शासकीय यंत्रणेकडून मुख्यमंत्र्यांना वादळामुळे झालेल्या नुकसानीची चुकीची माहिती दिल्याचे दिसत आहे. नुकसानीचा शासकीय यंत्रणेचा अहवाल कोकणवासीयांची क्रूर थट्टा करणारा आहे. अशा माहितीवर विसंबून सरकारकडून भरपाईची रक्कम जाहीर केली जाणार असेल तर वादळग्रस्तांची फसवणूक होण्याची शक्यता आहे. रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या वादळामुळे नुकसान झालेल्या शेतीच्या क्षेत्राच्या आकडेवारीत मोठी विसंगती आहे. अशा चुकीच्या माहितीवर विसंबून राहून राज्य सरकारने नुकसान भरपाईची रक्कम ठरवू नये.
वादळाने कोकणातील आंबे, काजू आणि मासळीचा हंगाम वाया गेला आहे. या नुकसानीचे वास्तव चित्र शासकीय यंत्रणेने तयार केलेल्या अहवालात दिसण्याची शक्यता नाही. वर्षभरापूर्वी झालेल्या निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्यांना आघाडी सरकारकडून अद्याप भरपाई मिळाली नसल्याचे भांडारी यांनी निदर्शनास आणून दिले.
दोन वर्षांपूर्वी पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या अवकाळी पावसानंतर उद्धव ठाकरे यांनी, ‘पंचनामे वगैरे बाजूला राहू द्या, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ५० हजारांची भरपाई द्या’ अशी मागणी केली होती. मात्र सत्तेवर येताच उद्धव ठाकरे,’ कोकणातील नुकसानीचे पंचनामे झाल्यानंतर भरपाई जाहीर करू, ‘ असे बोलू लागले आहेत. सत्तेवर येताच उद्धव ठाकरे यांची संवेदनशिलता संपली का, असा सवालही भांडारी यांनी केला.
यावेळी भांडारी यांनी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी नुकसानीबाबत सादर केलेल्या अहवालातील विसंगती उघड केली.