मुक्तपीठ टीम
शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील संभाव्य आघाडी हा राजकारणात शून्य अस्तित्व असलेल्या आणि जनाधार गमावलेल्या नेत्यांचा केवळ बातमीत राहण्यापुरता केविलवाणा प्रयत्न असून अशी कितीही शून्ये एकत्र केली तरी त्यातून एक पूर्णांक तयार होत नसल्याने नवा हास्यास्पद प्रयोग यापलीकडे त्यातून काही निष्पन्न होणार नाही, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
भांडारी म्हणाले की, पवार आणि प्रशांत किशोर यांच्या बैठका आणि, त्यानंतर राष्ट्रीय राजकारणात आपले अस्तित्व दाखविण्याची पवार यांची धडपड यांमुळे अगोदर अस्तित्वात असलेली युपीए आघाडी अधिक मोडकळीस आली आहे. पहिल्या आघाडीचा अस्त होत असताना त्यातून बाहेर पडणाऱ्या नेत्यांचा नव्या आघाडीचा प्रयत्न हे त्यांच्या राजकीय नैराश्याचे प्रतिबिंब आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात जनाधाराची थट्टा करून, विश्वासघाताने आघाडी करणाऱ्या पवार यांना राष्ट्रीय राजकारणात आपले अस्तित्व दाखविण्याची अखेरची संधी आहे, एवढेच या धडपडीतून स्पष्ट होते.
शरद पवार यांची युपीएचे नेतृत्व करण्याची इच्छा लपून राहिलेली नाही. त्याचा उच्चार ते आपल्या समर्थकांकरवी वारंवार करत असतात. त्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमधील वितुष्ट टोकाला गेले असून नवी आघाडी हा काँग्रेसला शह देण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळेच सोनिया गांधी अस्वस्थ झाल्याने या बैठकीस काँग्रेसचा सहभाग नाही हे स्पष्ट झाले आहे. भाजपविरोधात आघाडी स्थापन करण्याचे भासविले जात असले तरी प्रत्यक्षात काँग्रेसला नामोहरम करण्याचाच तो डाव असल्याने इतर क्षुल्लक पक्षांची मोट बांधून तो अमलात आणण्याची योजना आहे. त्यामुळे अशा प्रयत्नांचा भाजपच्या भक्कम जनाधारावर कोणताही परिणाम होणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.
ते म्हणाले की, पवार यांच्या बैठकीस त्यांच्या विश्वासू शिवसेनेनेही दांडी मारण्याचे ठरविले आहे. त्या बैठकीस हजेरी लावून सोनिया गांधींची नाराजी ओढवून घेण्याची शिवसेनेची हिंमत नाही हेच यातून स्पष्ट झाले आहे. शिवसेना हा विश्वासू पक्ष आहे असे प्रशस्तीपत्र देणाऱ्या पवार यांना शिवसेनेने धोबीपछाड देऊन आपल्या विश्वासपात्रतेचा पुरावा दिला आहे.
राज्यात आढळलेल्या कोरोनाशी संबंधित डेल्टा व्हेरिएंट च्या रुग्णांची वेळीच दखल घेऊन त्या मागच्या कारणांचा शोध घ्यावा, अशी मागणीही भांडारी यांनी केली.