मुक्तपीठ टीम
महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा आकडा खाली गेला असला तरी दुसऱ्या लाटेचा धोका आहे व ही लाट सुनामीसारखी असण्याची शक्यता आहे, असा अचूक अंदाज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नोव्हेंबर २०२० मध्ये जाहीररित्या वर्तवला होता पण या लाटेला तोंड देण्यासाठी त्यांनी गेल्या पाच महिन्यात तयारी काय केली, हे सांगितले पाहिजे, असे भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी शुक्रवारी सांगितले.
माधव भांडारी म्हणाले की, गेल्या वर्षी राज्यात कोरोनाच्या सक्रीय रुग्णांची संख्या कमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २२ नोव्हेंबर २०२० रोजी फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधला होता. त्यावेळी ते म्हणाले होते की, जनतेने सहकार्य केले म्हणून कोरोना रुग्णांचा फुगत चाललेला आकडा जरूर खाली आणला पण कोरोनाचे संकट संपले असू समजू नका. पाश्चात्य देशांचा विचार केला तर दुसरी तिसरी लाट येते आहे. पहिल्या लाटेशी तुलना केली तर ही लाट सुनामी आहे की काय, अशी भीती वाटते. मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलेली भीती पाच महिन्यांनी महाराष्ट्रात शब्दशः खरी ठरल्याचे दिसते. त्याचप्रमाणे दोन महिन्यांपूर्वी २२ फेब्रुवारी २०२१ च्या फेसबुक लाईव्हमध्ये मुख्यमंत्र्यांनी राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली का हे आठ दहा दिवसात कळेल, असे म्हटले होते.
माधव भांडारी यांनी सांगितले की, दुसऱ्या लाटेबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अचूक अंदाज होता हे त्यांच्या वक्तव्यांवरून दिसते. त्यामुळेच, इतकी पूर्व कल्पना असताना गेल्या पाच महिन्यात राज्य सरकारने दुसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी काय तयारी केली याची माहिती आता जनतेला दिली पाहिजे. नोव्हेंबर महिन्यातच राज्यातील सर्व सार्वजनिक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन प्लँटचे काम सुरू केले असते तर आज संकटाच्या वेळी ऑक्सिजनसाठी अशी तडफड करावी लागली नसती आणि इतर राज्यांसमोर हातही पसरावा लागला नसता. कोरोनावरील उपचारात रेमडेसिविरचा उपयोग होतो हे गेल्या वर्षी पहिल्या लाटेतच ध्यानात आले होते. हे ध्यानात घेऊन पाच महिन्यात रेमडिसिवर उपलब्ध करून घेण्यासाठीही पुरेशी तयारी करता आली असती.