मुक्तपीठ टीम
‘एक भारत श्रेष्ठ भारत’ अंतर्गत देशातील विविधतेनं नटलेला सांस्कृतिक वारसा जगासमोर अभिमानानं मांडली जात आहेत. महाराष्ट्र आणि ओडिशा या दोन राज्यातील विविध संस्कृतीचे दर्शन आता मुंबईत घडणार आहे. मुंबईतील साहित्य संघ मंदिरात आंतरराज्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. येत्या २९ ते ३१ जुलै २०२२ या कालावधी दरम्यान ही कार्यक्रम मुंबईत आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये ओडिशा राज्यातील तीन कला समूह व महाराष्ट्रातील तीन कला समूह सादरीकरण करणार आहेत. भक्ती संस्कृती, शास्त्रीय संगीत नृत्य व लोककला या तीन प्रकारातील लोकोत्सव आंतरराज्य महोत्सवात प्रेक्षकांना पहावयास मिळतील.
आंतरराज्यीय सांस्कृतिक देवाणघेवाण व्हावी आणि त्यातून एकात्मता जपली जावी यासाठी “एक भारत श्रेष्ठ भारत” हा उपक्रम देशभरात साजरा केला जातो. या उपक्रमांतर्गतच महाराष्ट्र आणि ओडिशा या दोन राज्यांची आंतरराज्य सांस्कृतिक देवाणघेवाण होण्यासाठी केंद्र शासनाच्या सूचनेनुसार जोडी निश्चित केलेली आहे.
‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या उपक्रमाचा एक भाग म्हणून ओडिशा व महाराष्ट्र राज्याची उच्च व समृद्ध संस्कृती दर्शविणाऱ्या लोकोत्सव सांस्कृतिक कार्यक्रमाचे दि. २९ जुलै २०२२ ते ३१ जुलै २०२२ या कालावधीत साहित्य संघ मंदिर, गिरगाव, मुंबई येथे सायंकाळी ६ ते रात्रौ १० या वेळेत आयोजन करण्यात आलेले आहे.
लोककला, लोकपरंपरा तसेच सांस्कृतिक वारसा दर्शविणाऱ्या लोकोत्सव या तीन दिवसीय महोत्सवाच्या माध्यमातून ओडिशा व महाराष्ट्र राज्यातील विविध नृत्य, संगीत, लोककला प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहेत.
महाराष्ट्र व ओडिशा राज्यांची लोकसंस्कृती, लोककला, प्रथा-परंपरा यामध्ये बरेच साम्य आहे. या राज्यांमधील संस्कृतीची ओळख व्हावी या उद्देशाने लोकोत्सव या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या तीन दिवसीय कार्यक्रमांच्या माध्यमातून महाराष्ट्र व ओडिशा राज्यांची समृद्ध अशी लोकपरंपरा, भक्ति संगीत व शास्त्रीय नृत्यांची जोपासना करणाऱ्या कलापथकाचे सादरीकरण होणार आहे. लोकोत्सव या सांस्कृतिक कार्यक्रमात दि. २९ जुलै २०२२ रोजी सायंकाळी ६.०० वाजता ओडिशा लोककलेचे प्रसिद्ध कलाकार डॉ. मोहित कुमार स्वाइन आणि सहकलाकार यांची ओडिशा लोककला व शास्त्रीय नृत्यांच्या महाराष्ट्रातील प्रसिद्ध नृत्यांगणा शुभदा वराडकर आणि संघ यांचे शास्त्रीय नृत्य सादर होणार आहे. दि. ३० जुलै २०२२ रोजी ओडिशा भक्तीसंगीत, मनोजकुमार पांडा व सहकलाकार आणि संजीवनी बेलांडे आणि सहकलाकार, यांच्या भक्तिगीतांचा कार्यक्रम होणार आहे. ३१ जुलै २०२२ रोजी राकेश शिर्के आणि सहकलाकार यांच्या लोककला व ओडिशा येथील प्रसिद्ध शास्त्रीय नृत्य कलाकार बसंतकुमार प्रदा आणि सहकलाकर आपली कला सादर करणार आहेत.
‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या उपक्रमांतर्गत महाराष्ट्र आणि ओडिशा या आंतरराज्यातील लोकोत्सव हा सांस्कृतिक कार्यक्रम सर्व-रसिक प्रेक्षकांना विनामूल्य असून जास्तीत जास्त रसिकांनी या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाने केले आहे.