मुक्तपीठ टीम
छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती दिन. शिवजयंती. स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडासाठी ही शिवजयंती वेगळी आहे. कारण महाराजांचा रायगड नेत्रदीपक रोषणाईनं उजळून निघाला आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकारामुळे प्रत्येक शिवप्रेमीची इच्छा पूर्ण झाली आहे. एवढंच नाही, खासदार शिंदेंच्यावतीने रायगडला रोज पुष्पहार अर्पण केले जात आहे.
छत्रपती शिवरायांच्या ३९१ व्या जयंतीनिमित्त राजधानी किल्ले रायगडवर नेत्रदीपक रोषणाई करण्यात येणार आहे. राज सदरेसह रायगडावरील विविध वास्तू उजळून निघणार आहेत. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सोमवारी किल्ले रायगडाला भेट दिली होती. यावेळी किल्ल्यावरील महत्वपूर्ण वास्तू, छत्रपती शिवरायांची मूर्ती अंधारात असल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी तातडीने त्यांनी पुरातत्व विभागाचे राजेंद्र यादव यांच्याशी मोबाइलवरून संपर्क साधला. रायगडावर विद्युत रोषणाईची व्यवस्था करण्यासाठी मागणी केली. त्यावेळी विद्युत रोषणाई करण्यासाठी आवश्यक निधी नसल्याचे यादव यांनी सांगितले. त्यावेळी श्रीकांत शिंदे यांनी जो ही निधी लागेल मी देतो, मात्र रायगड अंधारात ठेवू नका अशा सूचना केल्या. त्यानुसार मागणीचे पत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पुरातत्व विभागाला दिले. या मागणीवर पुरातत्व विभागाने तातडीने मंजुरी दिली. त्यानुसार शिवजयंतीला किल्ले रायगडावरील वास्तू नेत्रदीपक रोषणाईने उजळली आहे. यापुढे किल्ले रायगड अंधारात राहणार नाही, असे अभिवचन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना पुरातत्त्व विभागाने दिले आहे.
छत्रपती शिवरायांची राजधानी किल्ले रायगडवरील राजसदर व होळीचा माळ येथील शिवरायांचा पुतळा आणि समाधी स्थळाला रोज पुष्पहार अर्पण करण्याचा संकल्प खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केला आहे. संकल्पाचा शुभारंभ शिवजयंतीच्या शुभ मुहूर्तावर होत आहे.
पाहा व्हिडीओ: