मुक्तपीठ टीम
भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांच्या पडवे येथील लाईफ टाईम मेडिकल कॉलेजचे उद्घाटन भाजपाचे दिग्गज नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते रविवारी दुपारी करण्यात आले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने अमित शहा यांनी सिंधुदुर्गच्या भूमीवरून ठाकरे सरकारवर जोरदार प्रहार केला. महाराष्ट्रातील जनतेने नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांना जनादेश दिला होता. मात्र सत्तेच्या मोहात उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे सिद्धांत तापी नदीत बुडवून ऑटो रिक्षावालं तीन चाकांचं सरकार बनवलं. मात्र ही तिन्ही चाकं वेगवेगळ्या दिशेने धावत असल्याची टीका अमित शहा यांनी केली. यावेळी नारायण राणे यांच्या कार्याचं अमित शहा यांच्यासह सर्वच मान्यवर नेत्यांनी कौतुक केलं.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कसाल पडवे येथील माळरानावर सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळ संचलित लाईफ टाईम हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजची उभारणी करण्यात आली आहे. या मेडिकल कॉलेजचा उदघाटन सोहळा रविवारी दुपारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी नारायण राणे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, सौ. नीलमताई राणे, माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे, माजी मंत्री विनोद तावडे, रवींद्र चव्हाण, राजन तेली, आ. निरंजन डावखरे, काँग्रेस नेते कृपाशंकर सिंह, आमदार प्रसाद लाड, कालिदास कोळंबकर यांच्यासह मान्यवर नेते उपस्थित होते. यावेळी अमित शहा यांनी राणेंवर स्तुतीसुमने उधळताना ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.